माणसाच्या अंगी जिद्द असेल, ध्येयप्राप्तीसाठी लढा देण्याची तयारी असेल तर कुठलेही आव्हान असो, संकट असो, ते आपल्यासमोर पाणी भरेल... हा मोलाचा संदेश दृकश्राव्य स्वरूपात देणारा चित्रपट म्हणजे राजदत्त दिग्दर्शित, "सर्जा..."
औरंगज़ेब आणि शिवाजी महाराज (रविंद्र महाजनी) यांच्यात झालेल्या तहानुसार काही किल्ले मुग़ल साम्राज्यात विलीन केले जातात. त्यातल्याच एका किल्ल्याच्या पायथ्याशी कस्तुरा (पूजा पवार) डोंबारीण आपल्या आईसोबत (सीमा देव) राहत असते. दोरीवरचे खेळ करून आपली गुजरण चालवणाऱ्या कुस्तुरावर किल्ल्याच्या मुग़ल सरदाराची (कुलदीप पवार) वाईट नजर पडते आणि तिला मिळवण्यासाठी तो सरदार रुस्तम (निळू फुले) नावाच्या एका गावकऱ्याची मदत घेतो. रुस्तम व त्या मुग़ल सरदारापासून वाचण्यासाठी कस्तुरा महाराजांच्या राज्यातल्या तिच्या नातेवाईकाकडे आसरा घेते. त्याच नातेवाईकाचा मुलगा असतो सर्जा (अजिंक्य देव), ज्याच्याशी कस्तुराचे लहानपणीच लग्न ठरलेले असते...
दोघांमध्ये निर्माण होत असलेल्या हळुवार नात्याचं रूपांतर लग्नात होतं. त्यांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडतो आणि तो मुग़ल सरदार कस्तुराला शोधून काढतो. गावकऱ्यांच्या मदतीने सर्जा कस्तुराला वाचवतो आणि या घटनेने व्यथित झाल्याने महाराजांच्या सैन्यात सामील होण्यासाठी महाराजांची, "मुख्य दरवाजा सोडून इतर मार्गाने गड चढून येणाऱ्यास बक्षीस दिले जाईल..." ही पैज मोठ्या हिमतीने पूर्ण करतो. औरंगज़ेबने महाराजांना नामोहरम करण्यासाठी पाठवलेल्या तोफा निकामी करण्याचं काम बिहीरजी नाईक (रमेश देव) स्वत:च्या शिरावर घेतात आणि सर्जा व कस्तुरा त्यांना मदत करून तोफा तर निकामी करतातच पण किल्लाही परत मिळवतात...
बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'शेलार खिंड' या पुस्तकावर बेतलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे राजदत्त यांनी तर पटकथा लिहीली आहे यशवंत राजनकर यांनी. कथेचा ऐतिहासिक बाज जराही न ढळू देता पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी चित्रपटाला अप्रतीम संगीत दिलं आहे. चित्रपटाच्या सर्व गाण्यांमध्ये विशेष लक्षात राहतं, लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांनी गायलेलं, "चिंब पावसानं रान झालं आबादानी..."
चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे सर्व कलावंतांची अप्रतीम अदाकारी. निळू फुले, कुलदीप पवार, रमेश देव, सीमा देव असे ताकदीचे कलावंत समोर असतानाही अजिंक्य देव यांनी आपल्या अदाकारीने एक वेगळीच छाप सोडली. इतक्या सर्व मातब्बर कलावंतांसमोर अजिंक्य देव यांनी ठामपणे उभे राहत सुंदर अभिनय सादर केला. चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातली साहसदृष्य.
सर्व युद्धाच्या व चकमकींच्या दृष्यांमध्ये दोन दृष्य अतिशय रंजक ठरली. पहिलं दृष्य आहे सर्जाचं रायगढ चढून जाण्याचं आणि दुसरं आहे सर्जाला सोडवताना मुग़ल सैनिकांचं लक्ष सर्जावरून व तोफांवरून हटवण्यासाठी कस्तुरानं केलेली दोरीवरची कसरत. तोंडात बोटं घालायला लावणारी ही दोन्ही साहसदृष्य खरंतर चित्रपटाचा मुख्य U.S.P. आहे...
एकंदरीत शिवकालीन इतिहास, व्यक्तिरेखा, गनिमी कावे यांचं जवळून दर्शन घडवणारी अभिजात कलाकृती म्हणजेच सीमा देव निर्मित "सर्जा..."
@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:
Post a Comment