Friday, 28 August 2020

अंगूर...

 अंगूर...

'विलियम शेक्सपियर', हे नाव सर्वांनाच ज्ञात आहे. त्यांच्याच अप्रतीम लेखणीतून साकारलं होतं एक सुंदर नाटक, ज्याचं नाव होतं, "Comedy of errors". या नाटकावर बेतली होती ईश्वरचंद्र विद्यासागर यांची, "भ्रांतीबिलास" ही कादंबरी. याच कथेवर आधारित दोन चित्रपट उदयाला आले. एक होता १९६८चा किशोर कुमार अभिनीत, "दो दुनी चार" आणि दुसरा होता संजीव कुमार व देवेन वर्मा अभिनीत, १९८२ सालचा, "अंगूर..."

"अंगूर" या चित्रपटाला कथा अशी नव्हती. तो होता दीड दिवसाचा, दोन समान दिसणाऱ्या जोड्यांच्या एकत्रित आल्याने झालेला गोंधळ. अशोक (संजीव कुमार) आणि बहादुर (देवेन वर्मा) कामानिमित्त शहरात येतात. त्याच शहरात दुसरा अशोक (संजीव कुमार) आणि दुसरा बहादुर (देवेन वर्मा) राहत असतात. हे चौघंही वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकांना व इतर शहर वासियांना भेटत राहतात आणि हलके-फुलके विनोद निर्माण होत राहतात...

चित्रपटाचा गाभा आहे चारही व्यक्तिरेखांच्या आपापसात भेटण्याच्या प्रसंगांमधला विनोदी गोंधळ आणि तो गोंधळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली गेलेली एक खास धुन. चित्रपट जसा पुढे सरकत जातो, तसं आपल्याला समजत जातं, की ही धुन वाजली म्हणजे अशोक किंवा बहादुर बदलले. मुख्य कलावंतांखेरीज मौशमी चॅटर्जी, दिप्ती नवल, अरुणा इराणी, पद्मा चौव्हाण, यूसुफ परवेज, त्रिलोक कपूर, सी. एस. दूबे, टी. पी. जान, या कलावंतांनीही कथेला छान साथ दिली आहे...

चित्रपटातल्या दोन गोष्टी मला जरा खटकल्या. पहिली गोष्ट म्हणजे राम मोहन यांनी साकारलेला टॅक्सी चालक. संपूर्ण चित्रपटात, टॅक्सी चालकाच्या या व्यक्तिरेखेचा कथेशी किंवा कथेतील पात्रांशी काहीच संबंध येत नाही. केवळ एक साधन म्हणून त्या टॅक्सीचा वापर झाला आहे. टॅक्सीसोबतसुद्धा जर एखादा प्रसंग दाखवता आला असता तर कदाचित एकाच कलाकाराच्या सतत समोर येण्याला आधार मिळाला असता. अर्थात, परत परत भेटूनही अशोकचं मन आणि बुद्धी त्या टॅक्सी चालकावर विश्वास ठेवत नाही हे दाखवण्याचं प्रयोजन असावं बहुतेक...

मला खटकलेली दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटातील गाणी. चित्रपटात तीनच गाणी आहेत. गुल्ज़ार साहेबांच्या शब्दांना पंचमदांनी अप्रतीम संगीत दिलं आहे आणि आशाताईंनी आपल्या स्वरांनी गाण्यांना चार चाँद लावले आहेत. "रोज़ रोज़ डाली डाली..." हे गाणं प्रासंगिक आहे, पण "होठों पे बीती बात..." आणि "प्रीतम आन मिलो..." ही दोन गाणी, मात्र चित्रपटाची फक्त लांबी वाढवतात असं माझं मत आहे. गाण्यांऐवजी एखादा विनोदी प्रसंग छान जमून गेला असता...

चित्रपटातल्या चारही मुख्य व्यक्तिरेखांना वेगवेगळे स्वभाव दिले गेले आहेत. बाहेरून आलेला अशोक चांगलाच संशयी, सिग्रेट पिणारा आणि सावधपणे वागणारा आहे तर शहरातला अशोक दारू पिणारा व थोडा तापट डोक्याचा दाखवला आहे. बाहेरून आलेला बहादुर भांग पिणारा आणि थोडा चलाख आहे तर शहरातला बहादुर थोडासा भोळा आणि भावनिक आहे. संजीव कुमार व देवेन वर्मा या दोघांनीही चारही व्यक्तिरेखांमधील फरक खूपच छान रंगवला आहे...

एकंदरीत, विलियम शेक्सपियर यांच्या, "Comedy of errors" या नाटकाशी साधर्म्य असलेला पण तरीही वेगळा वाटणारा गुल्ज़ार साहेबांचा "अंगूर" हा, डोक्याला शॉट न देणारा, हलका-फुलका विनोदी चित्रपट आहे हे नक्की...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 6 August 2020

उदासीचा संगीतमय सुगंध...


"खुशी के गाने बिलकुल फुलझड़ियों की तरह होते हैं, जलतेही बुझ जाते हैं | लेकिन उदासी, उदासी तो अगरबत्ती की तरह देर तक जलती है, और बुझने के बाद भी महकती रहती है |" बावर्ची चित्रपटातला राजेश खन्ना यांनी म्हटलेला हा संवाद ऐकला आणि sad songsबद्दलचा माझा दृष्टीकोन बदलला. आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अनेक sad songs माझ्या ऐकण्यात आली पण त्यातही, 'दिल को छू जाए...' असं एक सुंदर गाणं आहे...

"नाराज़ सवेरा है..." - संघर्ष...


रीत ओबेरॉय जेव्हा अमन वर्मा नावाच्या कैद्याला भेटायला जेलमध्ये जाते, तेव्हा भेट होण्याआधी अमनच्या तोंडी हे गाणं दिलं गेलं आहे. पोलीस स्टेशनच्या कार्यालयापासून कोठड्यांपर्यंतच्या अंधाराला घाबरणाऱ्या रीतच्या प्रवासात हे गाणं सुरू राहतं. गाण्याचे बोलही किती अर्थपूर्ण आहेत बघा...


नाराज़ सवेरा है... हर ओर अंधेरा है...
कोई किरन तो आए कहींसे... आए... आए...

अमनच्या रूपात गीतकार म्हणतो, "आज कुठे आहे मी... सकाळ मला दुरावलेली आहे. प्रकाश कुठे दिसत नाही. कधीतरी आशेची एक किरण तरी येऊ देत जवळ... एखादा कवडसा तरी दिसू देत मला..." मुखड़ा ऐकत ऐकत आपण पहिल्या कडवाजवळ येतो...

ज़िंदगी तनहाइयों का... दर्द है नाम है...
हर खुशी ढलती हुई... दुखभरी शाम है...
साँसों के खजानों का... यह वक्त लुटेरा है...

म्हणजे, "मी इथे एकटाच माझं आयुष्य वेचतो आहे. माझ्यासाठी आयुष्याचं दुसरं नावच एकटेपणा झालं आहे. माझ्याकडे अमाप श्वास आहेत, पण ही वेळ हळुहळू ते घेऊन जात आहे आणि मी मात्र ते पाहत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाही..." पहिलं कडवं संपता संपता रीत कोठड्यांपर्यंत पोहोचते. कुठल्या कोठडीत अमनला ठेवलं आहे हा विचार करतानाच कोपऱ्यातल्या कोठडीची सळी पकडायला एक हात येतो आणि दुसरं कडवं सुरू होतं...


रात की ख़ामोशियों में... अनसुना शोर है...
खींचती बाँधे बिना ही... कौनसी यह डोर है...
बेजान सलाखों ने... मेरी रूह को घेरा है...

ख़ामोशी म्हणजे शांतता आणि शोर म्हणजे आवाज. गीतकार म्हणतो, "या शांततेत आवाज तर येत आहे, पण तो इतर कोणालाच नाही, तर फक्त मलाच ऐकू येत आहे आणि त्या आवाजाकडे मी ओढला जात आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे, पण या शरीराच्या तुरुंगात मी कैद झालो आहे..." कोठडीभर अमनची सावली वावरत राहते आणि तिसऱ्या व शेवटच्या कडव्याला सुरुवात होते...

वह मेरे बचपन का मौसम... वह ज़माना खो गया...
मौत के साये में रहकर... बेज़ुबान मैं हो गया...
ज़ख्मों की ज़मीनोंपर... ज़ुल्मों का बसेरा है...

काय म्हणतो पहा गीतकार, "लहानपाणीचे ते दिवस कुठल्याकुठे विरून गेलेत. सतत अवती-भोवती घोंघावणारा मृत्यू पाहता पाहता माझे शब्दही गोठलेत. इतके अत्याचार झाले या मनावर की तिथे आघातांचं एक नवं जगच तयार झालं आहे..." चित्रपट जेव्हाही दाखवला गेला, तेव्हा हे तिसरं कडवं मला ऐकता आलं नाही पण बालमनावर किती जुलूम झाले असावेत याची ग्वाही हे शब्द नक्कीच देतात...


समीर साहेबांच्या या सुंदर शब्दांना जतीन-ललित या जोडगोळीने संगीतबद्ध केलं आणि कुमार सानू यांनी त्यांच्या सुरेल स्वरांनी तर या गीताला चार चाँदच लावले. धीम्या गतीने सादर होणाऱ्या या गीताचं चित्रिकरणही तितकंच सुरेख झालं आहे. Dim lights व सावल्यांचा सुंदर वापर यात दिसतो. काहीतरी मागणारा तो अमनचा हात आणि गाणं संपेपर्यंत जागोजागी दिसणारी त्याची सावली, यांमुळे गाण्याला वेगळाच रंग चढला...

उदासवाणं असतानाही कितीही वेळा ऐकून कमीच असं, "संघर्ष" या चित्रपटातलं, "नाराज़ सवेरा है..." हे, ऐकल्यानंतरही उदबत्तीसारखं दरवळणारं गाणं, अत्यंत सुंदर आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

https://www.youtube.com/watch?v=KMOM9mGbc_w&feature=share

Tuesday, 4 August 2020

शिवकालीन सर्जा...


माणसाच्या अंगी जिद्द असेल, ध्येयप्राप्तीसाठी लढा देण्याची तयारी असेल तर कुठलेही आव्हान असो, संकट असो, ते आपल्यासमोर पाणी भरेल... हा मोलाचा संदेश दृकश्राव्य स्वरूपात देणारा चित्रपट म्हणजे राजदत्त दिग्दर्शित, "सर्जा..."

औरंगज़ेब आणि शिवाजी महाराज (रविंद्र महाजनी) यांच्यात झालेल्या तहानुसार काही किल्ले मुग़ल साम्राज्यात विलीन केले जातात. त्यातल्याच एका किल्ल्याच्या पायथ्याशी कस्तुरा (पूजा पवार) डोंबारीण आपल्या आईसोबत (सीमा देव) राहत असते. दोरीवरचे खेळ करून आपली गुजरण चालवणाऱ्या कुस्तुरावर किल्ल्याच्या मुग़ल सरदाराची (कुलदीप पवार) वाईट नजर पडते आणि तिला मिळवण्यासाठी तो सरदार रुस्तम (निळू फुले) नावाच्या एका गावकऱ्याची मदत घेतो. रुस्तम व त्या मुग़ल सरदारापासून  वाचण्यासाठी कस्तुरा महाराजांच्या राज्यातल्या तिच्या नातेवाईकाकडे आसरा घेते. त्याच नातेवाईकाचा मुलगा असतो सर्जा (अजिंक्य देव), ज्याच्याशी कस्तुराचे लहानपणीच लग्न ठरलेले असते...

दोघांमध्ये निर्माण होत असलेल्या हळुवार नात्याचं रूपांतर लग्नात होतं. त्यांच्या आयुष्यात मिठाचा खडा पडतो आणि तो मुग़ल सरदार कस्तुराला शोधून काढतो. गावकऱ्यांच्या मदतीने सर्जा कस्तुराला वाचवतो आणि या घटनेने व्यथित झाल्याने महाराजांच्या सैन्यात सामील होण्यासाठी महाराजांची, "मुख्य दरवाजा सोडून इतर मार्गाने गड चढून येणाऱ्यास बक्षीस दिले जाईल..." ही पैज मोठ्या हिमतीने पूर्ण करतो. औरंगज़ेबने महाराजांना नामोहरम करण्यासाठी पाठवलेल्या तोफा निकामी करण्याचं काम बिहीरजी नाईक (रमेश देव) स्वत:च्या शिरावर घेतात आणि सर्जा व कस्तुरा त्यांना मदत करून तोफा तर निकामी करतातच पण किल्लाही परत मिळवतात...

बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'शेलार खिंड' या पुस्तकावर बेतलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे राजदत्त यांनी तर पटकथा लिहीली आहे यशवंत राजनकर यांनी. कथेचा ऐतिहासिक बाज जराही न ढळू देता पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी चित्रपटाला अप्रतीम संगीत दिलं आहे. चित्रपटाच्या सर्व गाण्यांमध्ये विशेष लक्षात राहतं, लता मंगेशकर व सुरेश वाडकर यांनी गायलेलं, "चिंब पावसानं रान झालं आबादानी..."

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे सर्व कलावंतांची अप्रतीम अदाकारी. निळू फुले, कुलदीप पवार, रमेश देव, सीमा देव असे ताकदीचे कलावंत समोर असतानाही अजिंक्य देव यांनी आपल्या अदाकारीने एक वेगळीच छाप सोडली. इतक्या सर्व मातब्बर कलावंतांसमोर अजिंक्य देव यांनी ठामपणे उभे राहत सुंदर अभिनय सादर केला. चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रपटातली साहसदृष्य.

सर्व युद्धाच्या व चकमकींच्या दृष्यांमध्ये दोन दृष्य अतिशय रंजक ठरली. पहिलं दृष्य आहे सर्जाचं रायगढ चढून जाण्याचं आणि दुसरं आहे सर्जाला सोडवताना मुग़ल सैनिकांचं लक्ष सर्जावरून व तोफांवरून हटवण्यासाठी कस्तुरानं केलेली दोरीवरची कसरत. तोंडात बोटं घालायला लावणारी ही दोन्ही साहसदृष्य खरंतर चित्रपटाचा मुख्य U.S.P. आहे...

एकंदरीत शिवकालीन इतिहास, व्यक्तिरेखा, गनिमी कावे यांचं जवळून दर्शन घडवणारी अभिजात कलाकृती म्हणजेच सीमा देव निर्मित "सर्जा..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 2 August 2020

पाणावलेले सुखांत...


असं म्हणतात, की चित्रपटात किंवा नाटकात कथा कितीही दु:खद असली, तरी कथेचा शेवट हा गोडच होत असतो. शेवट जर दु:खी करणारा असेल, तर तो फारसा रुचत नाही. पण काही शेवट हे इतके सुंदर असतात, की ते पाहताना नकळतच डोळ्यात पाणी येतं आणि तरीही ते सुखांतच असतात...

तारे ज़मीन पर...


इशान त्याच्या आई, बाबा व मोठ्या भावासोबत सुट्ट्यांसाठी घरी परत जात असतो. गाडीचं दार उघडतं आणि आत जाण्याआधी इशान मागे वळून पाहतो. आपल्याला टाटा करणाऱ्या आपल्या टीचरला म्हणजे राम शंकर निकुंभला पाहून इशान त्याच्याकडे धाव घेतो. राम इशानला धरून हवेत उडवतो आणि कॅमेरा फ्रीझ होतो. "मी आता हवेत ऊंच भरारी घ्यायला सज्ज आहे..." हे दर्शवणारा इशान आणि "काहीही झालं तरी मी तुला खाली पडू देणार नाही..." हे दाखवणारा राम... हे दृष्य पाहून मन प्रसन्न होतं...

ब्लॅक...

बाहेर पाऊस पडत असतो. खोलीत एकट्याच असलेल्या आपल्या टीचरला ग्रॅजूएशन ड्रेस दाखवायला मिशेल येते. काळा ड्रेस परिधान केलेल्या मिशेलला थरथरत्या हातांनी चाचपडून टीचर नाचायला लागतो. टीचरचा हात आपल्या हातात घेत मिशेल खिडकीबाहेर पाण्याखाली धरते. ओला झालेला हात आपल्या ओठांजवळ नेत ती, "वॉ..." हा शब्द (तिच्यासाठी शब्दच) उच्चारते. तोच हात आपल्या टीचरच्या ओठांवर ठेवल्यावर टीचरही, "वॉ..." हे अक्षर उच्चारतात. मिशेल आज पदवीधर झाली हे दाखवणारे टीचरचे विजयी अश्रू आणि टीचर आज माणसात परतले हे दाखवणारे मिशेलचे समाधानी अश्रू पाहताना आपलंही मन भरून येतं...

इक़्बाल...

प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम. समोर विरुद्ध देशातील संघाचा फलंदाज, भारताकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत असलेला इक़्बाल खान आणि त्याला धावत येताना पाहताना ओठांवर हसू व डोळ्यात पाणी असलेले इक़्बालचे आई, बाबा व बहीण... हे चित्रपटाचं अंतिम दृष्य आहे. संपूर्ण दृष्य पाहताना आपण स्वत: इक़्बालच्या किंवा त्याच्या परिवाराच्या जागी असल्याची कल्पना करतो आणि आपल्याही डोळ्यांच्या कडा पाणावतात...

या तीनही दृष्यात त्या त्या कलावंतांनी अप्रतीम अदाकारी सादर केली आहे. पण मला जे सर्वात जास्त भावलं ते आहे या दृष्यांचं लेखन. एकही संवाद नसताना, निव्वळ अप्रतीम लेखनाच्या बळावर ही तीनही दृष्य अत्यंत सुरेख जमून आली आहेत. पार्श्वसंगीतासोबत "तारे ज़मीन पर" आणि "इक़्बाल" या दोन्हीही चित्रपटातल्या शेवटच्या दृष्यांमध्ये 'स्लो मोशन' तंत्राचा प्रभावी वापर दिसतो. "ब्लॅक"मध्ये हे तंत्र नसलं, तरी क्लोज शॉटचा वापर करून कलावंतांच्या चेहेऱ्यावरचे भाव उत्तम टिपले गेले आहेत...

तसे अनेक चित्रपटांमध्ये असे अनेक पाणावलेले सुखांत असतील, पण "तारे ज़मीन पर", "ब्लॅक" व "इक़्बाल" या तीन चित्रपटातले हे तीन सुखांत मनाला जास्त भिडणारे आहेत...

@ अनिकेत परशुराम आपटे.