Saturday, 25 July 2020

मल्टीस्टारर म्यूझिकल ट्रीट...



पेश है... तीन भाइयों के बिछड़ने और मिलने की सौगात... सनिमा का नाम है, "यादों की बारात..."

शंकर, विजय आणि रतन असे तीन भाऊ, शाकाल (अजीत खान) नामक गुंडाने केलेला आपल्या आई-वडिलांचा खून पाहून पळ काढतात. तिघंही वेगळे होत वेगवेगळ्या ठिकाणी मोठे होतात. शंकर (धर्मेंद्र) एक चोर बनतो, विजय (विजय अरोरा) एका गरीब घरात वाढतो आणि रतन ऊर्फ माँटो (तारिक़ खान) एका हॉटेलमध्ये गायक असतो. तिघंही भाऊ एकमेकांसमोर येत राहतात पण एकमेकांना ओळखू शकत नाहीत. अखेर शाकालच्याच कृपेने (हॉटेल त्याचंच असतं...) तिघं पुन्हा भेटतात शाकालसह सर्व गुंडांचा खात्मा करतात...

सलीम खान व जावेद अख़्तर म्हणजेच सलीम-जावेद या जोडीने लिहिलेली ही कथा म्हणजे मल्टीस्टारर मसाला चित्रपटांची नांदीच होती. अरे हो, चित्रपटातल्या हिरवीन राहिल्याच की... तर, त्या कामी वर्णी लागली झीनत अमान, नीतू सिंह आणि अर्चना यांची. तीन-तीन अभिनेत्री असताना, सर्वात मोठा दंगा होता झीनत अमानचा. म्हणजे चित्रपटातली बहुतांश गाणी, विजयसह झाडांभोवती पिंगा घालणं, रोमांचिक प्रसंग व गाण्यांमधून समोर येणं, किडण्याप होऊन दुश्मनच्या अड्ड्यावर पोहोचणं, शेवटच्या फायटिंगमध्ये भाग घेणं, या सर्वात झीनत अमानचाच नंबर लागला होता. याउलट नीतू सिंह व अर्चना चित्रपटात असून नसल्यागत वाटत होत्या...

नायकांच्या बाबतीत जरा वेगळा प्रकार दिसला. हाणामारी व साहसदृष्यांची बाजू धर्मेंद्रने सांभाळली तर रोमँससाठी विजय अरोराचा नंबर लागला. बिचाऱ्या नवोदीत तारीक़ खानला गीटार वाजवणं, गाणी म्हणणं आणि शेवटी थोडीफार मारामारी करणं, याखेरीज वेगळी अशी श्टोरी दिलेली दिसत नाही. "मैं तेरे नापाक खून से अपने हाथ नहीं रंगूँगा..." अशा काही संवादांखेरीज चित्रपटाचा सर्वात मोठा USP होता चित्रपटातली अप्रतीम गाणी. "आपके कमरे में कोई रहता है..." हे गाणं फारसं रुचलं नाही मला पण, "लेकर हम दिवाना दिल...", "ओ मेरी सोनी... मेरी तमन्ना...", "चुरा लिया है तुमने जो दिल को..." ही गाणी अत्यंत श्रवणीय आहेत...

चित्रपटात दोन वेळा येणारं, "यादों की बारात निकली है आज..." हे गाणं तर अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असेल. माझ्यातर नक्कीच आहे. लता मंगेशकर, पद्मिनी कोल्हापुरे आणि सुष्मा श्रेष्ठ यांनी गायलेल्या चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱ्या या गाण्यात करंगळी वर करणारं ते पिल्लू आमीर खान, पुढे जाऊन इतका मोठा स्टार होईल हे त्यावेळी कोणाला ज्ञात होतं. आमीर खानखेरीज, झीनत अमान व नीतू सिंह यांनाही या चित्रपटाने एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण करून दिला आणि पुढे येणाऱ्या अनेक चित्रपटांमधून त्या नायिका म्हणून झळकत यशस्वी झाल्या...

अनेक कलावंतांची मांदियाळी असलेला आणि संगीतप्रेमींसाठी पंचमदांच्या सुमधूर गाण्यांची दिवाळी असलेला नासीर हुसैन दिग्दर्शित, "यादों की बारात" एक मल्टीस्टारर म्यूझिकल ट्रीटच म्हणावा लागेल...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 19 July 2020

मूक स्वप्न...


"अंगी जिद्द असेल तर इरेला पेटून आपली स्वप्न साध्य करण्याचा आपण प्रयत्न करतो..." या आशयाचे अनेक चित्रपट होऊन गेले. पण एक चित्रपट माझ्या मते जरा हटके होता. तो म्हणजे, २००५ साली प्रदर्शित झालेला नागेश कुकनूर दिग्दर्शित, "इक़बाल..."

मूक-बधिर असलेल्या इक़बालला (श्रेयस तळपदे) क्रिकेटचं वेड असतं. जलदगती गोलंदाज होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इक़बाल प्राणपाणाने लढतो. आपली बहिण खदीजा (श्वेता प्रसाद) व गुरू मोहित (नसीरुद्दीन शाह) यांच्या मदतीने प्रचंड मेहनत घेऊन तो ते स्वप्न पूर्ण करतो...

क्रिकेटविषयी मनातून राग असलेले इक़बालचे वडिल (यतिन कार्येकर), वडिल व मुलगा यांच्या वादाच्या कचाट्यात सापडलेली इक़बालची आई (प्रतीक्षा लोणकर) आणि क्रिकेट म्हणजे शुद्ध व्यवसाय मानणारा थंड डोक्याचा गुरुजी (गिरीश कर्नाड), या भूमिका त्या त्या कलावंतांच्या चोख अभिनयाने छान वठल्या आहेत. पण सर्वात मोठं surprise package ठरला श्रेयस तळपदे. एकही संवाद न म्हणता, फक्त डोळे व हाव-भावांच्या सहाय्याने त्याने सुंदर अभिनय केला आहे...

पूर्ण निराश झालेला असताना मनाचा उद्रेक दाखवतानाचा इक़बाल, पहिली स्वाक्षरी देतानाचा आणि स्वाक्षरी घेणाऱ्या मुलीकडे पाहतानाचा इक़बाल, आपला आदर्श प्रत्यक्षात समोर आल्यावर होणारा आनंद व्यक्त करतानाचा इक़बाल, या छटा श्रेयस तळपदे यांनी छान दर्शवल्या आहेत. हिंदीतला पहिलाच चित्रपट असूनही गिरीश कर्नाड व नसिरुद्दीन शाहसारख्या तगड्या अभिनेत्यांसमोर ठामपणे उभं राहत श्रेयस तळपदे यांनी छान अदाकारी केली आहे...

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत. चित्रपटातली सर्व गाणी प्रसंगानुरूप आहेत. शिवाय गाण्यांमधूनही कथा पुढे सरकत जाते. "आशाएँ खिले दिल की..." हे गाणं तर निव्वळ अप्रतीम आहे. 'उराशी बाळगलेलं एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले तर काहीच कठिण नाही...' हा सुंदर संदेश या गाण्यातून मिळतो. संगीतासोबतच चित्रपटाच्या पार्श्वसंगीतानेही कथेला छान साथ दिली आहे...

चित्रपटातील दृष्य आणि त्यांचं छायांकन छान जमून आलं आहे. खास करून खदीजा व मोहित यांच्यातल्या खुसखुशीत संवादांची दृष्य तर लाजवाब आहेत. अंतरराष्ट्रीय सामना, हातात चेंडू घेऊन खेळपट्टीकडे धावणारा इक़बाल आणि त्याला डोळे भरून पाहणारे त्याचे आई, वडिल व बहिण... चित्रपटाचं हे शेवटचं दृष्य सुखांत दर्शवणारं असलं ते पाहताना आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही...

नागेश कुकनूर लिखित व दिग्दर्शित, "इक़बाल" हा वेगळ्या विषयावर बेतलेला चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कमीच आहे... नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 10 July 2020

हृदयस्पर्शी ज़ख्म...


हिंदू-मुसलमान दंगलींवर आजवर हिंदी व मराठीत अनेक चित्रपट झाले आणि कदाचित पुढेही होतील. काही चित्रपटांमध्ये दंगलींचा काही भाग दाखवलेला असतो तर काहींमध्ये दंगलीनंनतरच्या विदारक दृष्यांवर भाष्य केलेलं असतं. दंगलीवर आणि दंगलीच्या परिणामावर बेतलेला एक वेगळा चित्रपट होता, १९९८ साली प्रदर्शित झालेला, महेश भट दिग्दर्शित, "ज़ख्म..."

संगीत दिग्दर्शक असलेल्या अजय देसाईच्या (अजय देवगण) आईला मुसलमानांचा एक समूह जिवंत जाळतो. त्यावेळी साऱ्यांसमोर अजय हे सत्य उघड करतो की त्याची आई धर्माने मुसलमान आहे. 'मुसलमान पद्धतीनेच माझा अंत्यविधी करावा...' ही आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या अजयच्या मार्गामध्ये सुबोध माळगावकर (आशुतोष राणा) नावाचा भ्रष्ट व स्वार्थी नेता अडथळे निर्माण करतो...

आपले मनसूबे सफल करण्यासाठी सुबोध, अजयच्याच धाकट्या भावाला म्हणजेच आनंद देसाई (अक्षय आनंद) नावाच्या युवा नेत्याला हाताशी धरून अजयला शह देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आईची व्यथा आणि तिच्या अंतिम इच्छेचं महत्व अखेर आनंदला पटतं आणि अजय व आनंद आपल्या आईचा तिच्या मनाजोगता अंत्यविधी करतात...

चित्रपटाच्या या कथानकाला अजून दोन कथानकांची जोड मिळाली आहे. पहिलं कथानक आहे सोनिया देसाई (सोनाली बेंद्रे) आणि अजयचं जिथे होणारं बाळ कुठे जन्माला येईल यावरून दोघांचे वाद होत असतात. बाळ भारतात जन्माला येणार नाही या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या सोनियाला अजयचं सत्य आणि त्याची तळमळ समजते आणि तीसुद्धा मग अजयच्या पाठीशी उभी राहते...

चित्रपटातलं अजून एक कथानक म्हणजे लहानगा अजय देसाई (मास्टर कुणाल खेमू), त्याची आई (पूजा भट) आणि त्याचे वडील रमण देसाई (नागार्जून) यांची गोष्ट. खरंतर हेच कथानक चित्रपटाचा आत्मा आहे. आई (पूजा भट) आणि लहानगा अजय (मास्टर कुणाल खेमू) या दोघांचं सुंदर भावस्पर्शी नातं चित्रपटात दिसतं. मुख्य पात्रांखेरीज सौरभ शुक्ला, अवतार गिल, शरद सक्सेना असे अनेक कलावंत चित्रपटात आहेत, पण विशेष लक्षात राहतात ते पूजा भट आणि मास्टर कुणाल खेमू...

माझ्या मते, पूजा भटची आजवरच्या कारकीर्दीतली सर्वोत्तम अदाकारी या चित्रपटात होती. सांगूनही आपला जोडीदार न आल्याचं दु:ख, बऱ्याच काळानंतर आपला जोडीदार भेटल्याचा आनंद आणि आपला जोडीदार कायमचा दुरावल्याची व्यथा, या छटा पूजा भटने अप्रतीम दर्शवल्या आहेत. काही काही प्रसंगात तर एकही संवाद न वापरता फक्त डोळ्यांवाटे त्यांनी छान भाव दर्शवले आहेत...

मास्टर कुणाल खेमूनेही वयाने लहान पण परिस्थितीमुळे मोठ्या असलेल्या लहानग्या अजयची भूमिका चोख वठवली आहे. आपल्या आईची व्यथा आणि तिच्यावर होत असलेला अन्याय पाहताना आपण काहीही करू शकत नाही, ही विवशता त्याने सुरेख दाखवली आहे. काही प्रसंगात भावनांना उद्रेक तर काही प्रसंगात संयमी व्यवहार, या दोन्ही गोष्टी मास्टर कुणाल खेमूने उत्तम सादर केल्या आहेत...

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटातली गाणी. संपूर्ण चित्रपटभर गंभीर वातावरण असताना, एम.एम.क्रीम यांनी संगीतबद्ध केलेली धिम्या गतीची, शांत स्वभावाची ही गाणी, प्रेम, भावना, व्याकूळता, या वेगळ्या छटा दाखवताना दिसतात. कुठलंही गाणं चित्रपटात गतिरोधकाचं काम करत नाही. उलट हळुवार उलगडत जाणाऱ्या कथेला छान हातभार लावतात...

अजयच्या आईचा दु:खद जीवनप्रवास फळाला येऊन त्यांची स्वप्नपूर्ती झाली हे दर्शवणारं चित्रपटाच्या शेवटी येणारं ते काल्पनिक दृष्य जरी मुख्य कथानकाशी जुळत नसलं, तर एका विदारक संघर्षाचा सुखांत म्हणून ते योग्यच वाटतं. एकंदरीत, संवेदनशील व नाजूक विषयावर बेतलेली एक भावनात्मक कथा अनुभवायची असेल महेश भट दिग्दर्शित, "ज़ख्म" खरंच पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Friday, 3 July 2020

रंग प्रेमाचा, थोडा खट्टा थोडा मीठा...



एका बाजूला आपल्या जोडीदारासाठी असलेलं तरूण प्रेम तर दुसरीकडे आपल्या परिवाराला जोडणारं परिपक्व प्रेम, हाच आशय आहे १९७८ साली प्रदर्शित झालेल्या बासू चॅटर्जी दिग्दर्शित, "खट्टा मीठा" या चित्रपटाचा...

चित्रपटाची हलकी-फुलकी, साधी कथा आहे दोन मध्यवर्गीय पारशी परिवारांची. पहिला परिवार आहे होमी मिस्त्री (अशोक कुमार) यांचा. त्यांची पत्नी निवर्तलेली असते आणि त्यांना, फ़ली (रविराज), जाल (देवेंद्र खंडेलवाल), रूसी (रणजीत चौधरी) आणि पीलू (राजू श्रेष्ठ म्हणजे मास्टर राजू) अशी चार मुलं असतात. दुसरीकडे असते नर्गीस सेथना (पर्ल पदमसी), ज्यांच्या पतीचेही निधन झाले असते आणि त्यांना, फिरोज़ (राकेश रोशन), फ्रेनी (प्रीती गांगुली) आणि फ़रदून (विक्रम साहू) अशी तीन अपत्य असतात...

आयुष्याच्या उतारवयात आपल्याला एक हक्काचा जोडीदार मिळेल आणि घराला आधार मिळेल म्हणून होमी आणि नर्गीस लग्न करतात. आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या भावंडांशी जुळवून घेताना होमीच्या चार व नर्गीसच्या तीन मुलांची त्रेधा उडते. हळुहळू सर्वांना एकमेकांबद्दल ओढ निर्माण होते आणि घरावर एकामागून एक आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी अखेर पूर्ण कुटुंब एकत्र येतं...

'सिनेमॅटिक लिबर्टी' या शब्दाच्या नावाखाली जशी अतिरंजित दृष्य प्रेक्षकांच्या माथी मारली जातात तसं काहीच या चित्रपटात दिसत नाही. उलट साध्या सोप्या कथेची, साधी पण स्वाभाविक वाटेल व पटेल अशी मांडणी झाली आहे. सर्व कलावंतांची अचूक निवड केलेली दिसते. थोडंसं खट्टं असलेलं तरूण प्रेम आणि थोडं मीठं असलेलं परिपक्व प्रेम दाखवताना अशोक कुमार-पर्ल पदमसी आणि राकेश रोशन बिंदिया गोस्वामी अशा जराशा वेगळ्या आणि फारशा न पाहिलेल्या जोड्या आपल्याला दिसतात...

चित्रपटातल्या मुख्य पात्रांखेरीज, बिंदिया गोस्वामी, प्रदीप कुमार, डेविड इब्राहिम आणि देवेन वर्मा या कलावंतांनीही आपापल्या भूमिकांना छान न्याय दिला आहे. देवेन वर्मा यांनी वापरलेल्या विशेष लकबींनी व त्यांच्या संवादफेकीमुळे विनोदाची बाजू छान हाताळली गेली आहे. साधी पण उत्तम मांडणी, चपखल पात्रनिवड आणि सुंदर अदाकारी या सर्वांना गुल्ज़ार साहेबांनी लिहिलेल्या अप्रतीम गाण्यांची साथ लाभल्यामुळे चित्रपट अधिक उठावदार झाला आहे. "यह जीना है अंगूर का दाना...", "रोल रोल माकोनिसा माकोनिसा दोबारा...", "थोड़ा है थोड़े की ज़रूरत है..." या गाण्यांमुळे चित्रपट वेगळीच ऊंची गाठतो...

त्यातलं, "थोड़ा है थोड़े की ज़रूरत है..." हे गाणं फक्त माझ्याच नाही, तर अनेकांच्या फेव्हरेट साँगलिस्टमध्ये असेल. आपल्याकडे थोडं आहे पण अजून थोडं मिळवण्यासाठी आपण धडपडत राहतो आणि खऱ्या खट्ट्या मीठ्या अनुभवांना दुरावत राहतो, असा सुंदर बोध या गाण्यामुळे होतो. सामान्य कथेला मिळालेल्या सुंदर पटकथेमुळे चित्रपट मनोरंजक झाला आहे पण काही गोष्टी तितक्याशा न पटणाऱ्या आहेत खऱ्या...

आपल्या वडिलांची नोकरी गेली हे समजल्यावर घरातल्या मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते, पण होमीच्या फ़ली, जाल व रूसी या तीन मुलांखेरीज, घरखर्चाला कोणी हातभार लावल्याचं दाखवलं गेलं नाही. कथेत सर्व भावंडांचा समान सहभाग न दाखवता, फ्रेनी आणि फ़िरोज यांना जास्त फुटेज दिल्याचं जाणवतं. राकेश रोशन आणि बिंदिया गोस्वामी यांच्यातली दृष्यही अधिक आणि लांब वाटतात. त्याउलट, जर होमी व नर्गीसमुळे एकत्र आलेल्या परिवारावर फोकस दिला असता तर जास्त आवडलं असतं...

अर्थात, ही सर्व माझी वैयक्तिक मतं आहेत. बासू चॅटर्जींसारख्या लेखक व दिग्दर्शकाच्या कामाबद्दल मी बोलणं कितपत योग्य ते माहित नाही. पण टेन्शन फ्री, निखळ मनोरंजन हवं असेल तर बासू चॅटर्जी लिखित व दिग्दर्शित, "खट्टा मीठा" हा चित्रपट पाहण्यासारखा आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.