Thursday, 25 June 2020

वळू...


'गाव तसं चांगलं... पण बैलामागे लागलं...' हे वाक्य सार्थकी लावणारा चित्रपट म्हणजेच, २००८ साली प्रदर्शित झालेला, उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित, "वळू - द वाईल्ड बुल..."

कुसवडे नावाचं एक गाव आणि देवाचा आशीर्वाद म्हणून गावात मोकाट फिरणारा डुरक्या म्हणजेच वळू, या दोन गोष्टींभोवती ही मजेशीर कथा फिरते. संपूर्ण गावाची जबाबदारी असलेला हा शांत स्वभावी डुरक्या अचानक हिंसक होतो आणि गावकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या अनेक गोष्टींना कारणीभूत ठरतो. हाताबाहेर गेलेल्या या डुरक्याला जेरबंद करण्याची जबाबदारी, स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) नावाचा एक माणूस स्वीकारतो. पुढे चित्रपट संपेपर्यंत प्रवास सुरू राहतो, डुरक्याला पकडण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा...

मुख्य कथानकाला जोडूनच अनेक छोट्या छोट्या उपकथानकांची छान मेजवानी आपल्याला पहायला मिळते. दोन राजकीय नेत्यांमधला संघर्ष, गावात डॉक्यूमेंटरी आल्याने स्वत:ला कॅमेऱ्यात पाहण्याचा गावकऱ्यांचा आटापिटा, कडेकडेने हळुवार फुलत जाणारी प्रमकहाणी आणि डुरक्याच्या निमित्ताने गावात वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं नुकसान या सगळ्यातून चित्रपट पुढे सरकत राहतो. या चित्रपटात, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, भारती अचरेकर, सतीश तारे, निर्मिती सावंत, नंदू माधव, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, अशा दिग्गज कलावंतांसोबतच, वृक्षसेन दाभोळकर, वीणा जामकर, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, अशा नवा दमाच्या कलाकारांचाही समावेश आहे...

चित्रपटातल्या दोन कलाकारांबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगावीशी वाटते. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या "पुष्पक विमान" या चित्रपटात एक संवाद होता, "तू माझा शेवट, आणि मी तुझी सुरुवात..." या संवादाचा, "वळू" या चित्रपटाशी संबंध असा येतो, की जिथे प्रसिद्ध अभिनेते निखील राऊत (म्हणजे चित्रपटातला गण्या) यांचा हा पहिला चित्रपट होता, तिथेच दिग्गज अभिनेते चंद्रकांत गोखले (चित्रपटातील आज्या) यांचा, "वळू" हा चित्रपट, त्यांच्या निधनापूर्वीचा शेवटचा प्रसारित झालेला चित्रपट ठरला. असा हा फार छान योगायोग, या चित्रपटामुळे समोर आला...

मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत आणि सुधीर पळसणे यांचं छायांकन या दोन्ही गोष्टींनी कथानकाला छान हातभार लावला. शिवाय, गिरीश कुलकर्णी व उमेश कुलकर्णी यांच्या संवाद व लेखनानेही चित्रपटात छान रंग भरले आहेत. ते पार्श्व संगीत इतकं छान होतं, की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढे बराच काळ ते संगीत अनेक मोबाईल्समध्ये रिंगटोन म्हणून ऐकू येऊ लागलं. आजही काही काही मोबाईल्समध्ये "वळू"चे पार्श्वसंगीत रिंगटोन म्हणून ठेवलेलं आढळतं...

खरंच डुरक्या हिंसक होतो का...? तो खरंच गावात झालेल्या नुकसानांना कारणीभूत असतो का...? डुरक्याला पकडण्याचे स्वानंदचे प्रयत्न यशस्वी होतात का...? हे तर प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावरच समजेल, नाही का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 13 June 2020

दे दे प्यार दे...

प्रेम वयाकडे पाहून केलं जातं का...? प्रेमाला वयाची मर्यादा असते का...? नव्याने प्रेमात पडल्यावर जुन्या प्रेमाचा विसर पडू शकतो का...? अशा काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणजे आकीव अली दिग्दर्शित "दे दे प्यार दे" हा चित्रपट...

बायको आणि मुलांपासून वेगळा होऊन लंडनमध्ये राहत असलेल्या आशीषचं (अजय देवगण) आएशावर (रकुल प्रीत सिंह) प्रेम बसतं. आशीषचा स्वभाव आणि वागणं पाहून आएशाही त्याच्या प्रेमात पडते. लंडनच्या गजबजलेल्या गल्ल्यांमधून, ऊंची हॉटेल्समधून गाणी-घेणी करत त्या दोघांचं प्रेम सुरू असतं. सर्वकाही छान चालू असतं पण एक छोटीशी अडचण असते. आशीषचं वय असतं पन्नास वर्ष तर आएशा असते सव्वीस वर्षांची. वयाच्या या अंतराचा भविष्यात होणारा परिणाम आशीषच्या लक्षात येतो शिवाय हे प्रेम नसून आकर्षण आहे, हे ही कळतं. आएशाला तो ही गोष्ट समजावतो आणि दोघं वेगळे होतात. एकमेकांबद्दलची ओढ दोघांनाही लवकरच हे पटवून देते की हे खरं प्रेम आहे. दोघं लग्नाचा निर्णय घेतात आणि आपल्या परिवाराशी ओळख करून देण्यासाठी आशीष आएशाला भारतात घेऊन येतो...

इथून कथानक रंगतदार होत जातं. भारतात आल्यावर आयशाला समाजतं की आशीषची मुलं, इशिका (इनायत सूद) आणि ईशान (भाविन भानुशाली) ही जवळपास तिच्याच वयाची आहेत. शिवाय आशीषचे वडील (आलोकनाथ) आणि आई (मधुमालती कपूर), आशीषच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच मंजूसोबत (तब्बू) राहत आहेत. पेच अधिक वाढतो जेव्हा इशिकाचं लग्न ठरत असताना नकोसा असलेला आशीष घरात येतो. मंजू आवडत असलेला, त्या घरात पाहुणा म्हणून आलेला व्ही.के. (जिम्मी शेरगिल) आपल्या अचाट कल्पनांनी पेच अजून वाढवून ठेवतो. या पेचांसोबत समांतर सुरू असते आशीषवरून चालू असलेली आएशा आणि मंजूची शाब्दिक जुगलबंदी. अखेर इशिकाचा साखरपुडाही होतो आणि काहीसा वेगळा पण सुखांत म्हणता येईल असा आशीष, मंजू आणि आएशा यांच्या नात्यातला तिढाही सुटतो...

चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी श्रवणीय आहेत. अजय देवगण आणि तब्बूचा प्रश्नच नाही पण रकुल प्रीत सिंहनेसुद्धा छान अभिनय वठवलाय. काही संवाद कमरेखालचे आहेत खरे पण विनोदाचा बाज सांभाळण्यासाठी त्यांचा छान उपयोग होताना दिसतो. काही गोष्टी तितक्याशा पटत नाहीत. एखाद्या स्त्रीसाठी तिचं शील तिचं सर्वस्व असतं. तिच्या नकळत ते हिरावलं तर ती स्त्री आकांडतांडव करू शकते. पण याच गोष्टीला आएशा खूप साधेपणाने घेते, जणू काही विशेष घडलंच नाही... आशीष आएशाला ज्या घरी आणतो ते घर कुठेही भारतात असल्यासारखं वाटत नाही. बरं, तिथे असणारे नोकर नेपाळी किंवा चीनी वाटतात... घरात कार्य असतानाही मंजू धावत-पळत लंडनला जाऊन रागावलेल्या आएशाला घेऊन येते. बरं चित्रपटात असा कुठेही संदर्भ आढळत नाही की आशीषने मंजूला आएशा काम करत असल्याचा पत्ता सांगितला असेल... मंजूसोबत परतलेली आएशा अशी वाटते जणू नुकतीच जॉगिंगला गेली होती आणि धावता धावता मंजूच्या गाडीत बसली...

पण, एक वेगळा विषय आणि त्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन यासाठी केला गेलेला हा प्रयत्न नक्कीच स्तूत्य आहे. एकूण काय, तर हाणामारीचे चित्रपट करून थकलेला अजय देवगण आणि गंभीर भूमिकांना विटलेली तब्बू या दोघांना एकत्र करून रोमँटिक कॉमेडी म्हणून जमवलेल्या या भट्टीचा आस्वाद घेण्यासाठी लव रंजन लिखीत "दे दे प्यार दे" हा चित्रपट एकदातरी पहावाच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 11 June 2020

"शोले" - मिस्टर इंडिया पिस्तूल व समजूतदार नाणं...


हिंदी चित्रपटसृष्टीचा milestone ठरलेला, रमेश सिप्पी दिग्दर्शित, "शोले" आजही तितकाच ताजातवाना आहे. काय ते संवाद, काय ती गाणी, इतकंच कशाला, चित्रपटातल्या व्यक्तिरेखा व त्यांच्या विशेष लकबीही आपल्या सर्वांनाच तोंडपाठ आहेत. परवा पुन्हा "शोले" पाहिला आणि त्यातून काही गोष्टी नव्याने समोर आल्या...

जयचं शेवटचं हाणामारीचं दृष्य...

बांधून ठेवलेल्या वीरूचा (धर्मेंद्र) जीव वाचवण्यासाठी बसंती (हेमा मालिनी) नाचून नाचून बेजार झाल्यावर, सांभाला (मॅक मोहन) ठार करत जय (अमिताभ बच्चन) खडकावर प्रकट होतो. इथे एक नमूद करतो, सांभा बिचारा अनलकी होता हो... म्हणजे हेमा मालिनी नाचत असतानाही त्याला धर्मेंद्रकडे टक लावावी लागली. शिवाय मरावं लागलं ते वेगळंच. तर जय प्रकटतो. वीरू व बसंती तिथून निसटल्यावर बंदूक खाली टाकून जयसुद्धा सटकतो. पूल पार केल्यानंतर वीरू व बसंतीला गावाकडे पाठवून, डाकूंशी लढताना जय धारातीर्थी पडतो. आता मला नव्याने कळलेल्या, न कळलेल्या गोष्टी...

पहिला मुद्दा... बसंती-वीरूचा आणि जयचा, असे दोन्ही घोडे पळत असतात त्यावेळी जयच्या हातात एक पिस्तूल असतं. पुलाच्या आधी जयचा घोडा अडखळून पडतो म्हणून जयला धावतच पूल पार करावा लागतो.
धावताना जयला गोळी लागून तो पडतो तेव्हा त्याच्या हातून पिस्तूलही पडतं. जय धडपडत खडक पार करून पाठ टेकून बसतो तेव्हा पुन्हा त्याच्या हातात पिस्तूल येतं.
मला काय म्हणायचं आहे, जयला गोळी लागली म्हणून घाबरून ते पिस्तूल मिस्टर इंडियासारखं पुलावर गायब होऊन पुन्हा जयच्या हातात खडकावर प्रकटलं तर नसेल...

दुसरा मुद्दा... डाकूंशी जबर झुंज देऊन जय जखमी होतो. शेवटी पूल तोडण्यासाठी हातातल्या पिस्तुलाने बॉम्बवर गोळी झाडून, वीरूशी थोडंसं बोलून तो मरतो. वीरू जयला जमीनीवर ठेवतो तेव्हा त्याच्या हातात वीरूला नाणं सापडतं.
पण स्फोट करवताना तर जयच्या हातात पिस्तूल होतं... मग इतक्या धुमशानात ते नाणं हातात कसं काय... हां... वीरूची खणखणीत हाक ऐकून जयने लपवलेल्या जागेवरून उडी मारून ते स्वत:च जयच्या हातात विसावलं असावं... समजूतदार नाणं हो अगदी...

असो. "शोले"सारख्या अभिजात चित्रपटाच्या लेखनाबद्दल असं काही लिहिणं म्हणजे माती खाल्ल्यागतच आहे, पण मी फक्त माझे विचार मांडले बरं का...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 7 June 2020

कौन - माझ्या नजरेतून...


भयकथा म्हटली, की त्रस्त समंधाचा प्रवेश होताच किळसवाणे दिसणारे मानव, अजिबात पानं नसलेलं आणि विजा कोसळणारं झाड किंवा अंधारात वळणारा रस्ता... अशाच गोष्टी समोर येतात. पण याशिवाय देखील, फक्त प्रकाश, जागा आणि धक्का तंत्राचा वापर करून भय निर्माण केले जाऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामगोपाल वर्मा दिग्दर्शित, "कौन..."

वादळी पावसात घरात एकटी असलेली मुलगी (उर्मिला मातोंडकर), घराच्या मालकाला भेटायला आलेला समीर (मनोज बाजपाई) आणि पळालेल्या खुन्याच्या मागावर असलेला इंस्पेक्टर क़ुरेशी (सुशांत सिंह) या तीन व्यक्तिरेखांमध्ये चित्रपटाचं थरारक कथानक रंगतं. या तीन व्यक्तिरेखांशिवाय अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा चित्रपटात दिसते. ती म्हणजे चित्रपटातला तो बंगला...

बंगल्यातल्या खोल्या, खिडक्या, जिने, या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटातलं रहस्य सुरेख पद्धतीने समोर येतं. चित्रपटातला एक सीन्स तर अप्रतीम लिहिला गेला आहे... त्या मुलीला घरात सर्वत्र तिच्याकडे रोखून बघणारी माणसं दिसतात आणि तिने मान वळवताच सगळी माणसं अचानक गायब होतात... संपूर्ण चित्रपटच उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अदाकारीने खाऊन टाकला आहे खरंतर, पण हा सीन त्यांनी कमालीचा वठवला आहे...

टेलिफोनच्या दृष्यांबद्दल मात्र मला थोडा संभ्रम आहे. चित्रपटात एकूण पाच दृष्यांमध्ये टेलिफोनचा वापर झाला आहे. पहिलं दृष्य आहे चित्रपटाची सुरुवात, जेव्हा ती मुलगी आपल्या आईशी बोलत असते. दुसऱ्या दृष्यात क़ुरेशी फोन करून पोलीसांना बोलावून घेतो. त्यावेळी रिसीव्हरकडून नजर वळवून तो त्या मुलीकडे बघतो. तिसऱ्या दृष्यात समीर व क़ुरेशीला गनपॉईंटवर ठेऊन ती मुलगी तिच्या आईला फोन करून दोन माणसं घरात घुसल्याचं सांगते. चौथ्या दृष्यात समीर फोनजवळ जातो तेव्हा त्याला समजतं की वायर कापली गेली आहे. पाचवं दृष्य चित्रपटाचं शेवटचं दृष्य, जेव्हा ती मुलगी बंद झालेला फोन हातात घेऊन पुन्हा आपल्या आईशी बोलताना दिसते...

पहिलं आणि शेवटचं दृष्य एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजेच, जे काही शेवटच्या दृष्यात असतं तेच सगळं पहिल्या दृष्याच्या वेळीही होतं. याचाच अर्थ, तो फोन कथेच्या सुरुवातीपासूनच बंद केला गेला असतो. दुसऱ्या दृष्यात जेव्हा क़ुरेशी रिसीव्हर उचलतो तेव्हाच त्याला फोन बंद असल्याचं समजतं. त्यानंतरच्या दृष्यात जेव्हा ती मुलगी तिच्या आईला फोन लावते, तेव्हा क़ुरेशीने फोनबद्दल सांगितलं असतं तर कथेला कदाचित वेगळं वळण मिळालं असतं. चित्रपटाचा शेवट आल्यावरच आपल्याला हे सगळं समजतं म्हणा, पण जर टेलिफोनचं तिसरं दृष्य दुसऱ्या दृष्याच्या आधी घेतलं गेलं असतं तर टेलिफोन बंद पडण्याचं गूढ शेवटानंतरही कायम राहिलं असतं...

अर्थात, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्या दृष्यांखेरीज, कथा, पटकथा, अदाकारी, प्रकाशयोजना आणि छायांकन या सर्वांनी मिळून रामगोपाल वर्मा कृत, "कौन" या चित्रपटाला अप्रतीम भयपट या सदरात वरचे स्थान मिळवून दिले आहे, हे मात्र खरं...

@ अनिकेत परशुराम आपटे.