Thursday, 2 October 2025

सामान्याचा असामान्य लढा...

आपल्या आयुष्यात अचानक आलेल्या वादळाचा हिमतीने आणि हुशारीने सामना करणाऱ्या एका सामान्य माणसाची कथा म्हणजे, सुबोध खानोलकर दिग्दर्शित, "दशावतार..."

नाटकात आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात दशावतार आणि इतर वेगवेगळी रूपं वठवणाऱ्या बाबुलीची (दिलीप प्रभावळकर) प्रकृती वयापरत्वे खालावत जाते. तेव्हा बाबुलीचा मुलगा माधव (सिद्धार्थ मेनन) त्याच्याकडून ही कामं बंद करण्याचं वचन घेतो. महाशिवरात्रीला बाबुलीच्या शेवटच्या सादरीकरणादरम्यान बाबुलीवर मानसिक आघात होतो. बाबुली रौद्र रूप धारण करतो आणि, दशावतारातले काही अवतार घेऊन, त्याच्या आयुष्यात वादळ आणणाऱ्या लोकांवर बरसतो...

कोकणातला निसर्ग, कौलारू घरं, नद्या, माणसं, त्यांचा पेहेराव, सगळं कसं ठेवणीतलं. इतकंच नव्हे, तर कोकणातली ती गावरान भाषाही छान जमून गेली आहे. चित्रपटात केला गेलेला ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर आणि वेळोवेळी येणारं पार्श्वसंगीत यांमुळे चित्रपटाला एका प्रकारची भव्यता येते. चित्रपटात पाच गाणी आहेत. त्यातही, "मानूनी घे रंगपूजा..." हे गाणं बऱ्यापैकी छान झालं आहे. चित्रपटात विजय केंकरे, महेश मांजरेकर, भरत जाधव, रवी काळे, सुनील तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, आरती वाडगबाळकर, अभिनय बेर्डे, अशा मातब्बर कळावंतांची मंदियाळी आहे. पण चित्रपटाचा सर्वात मोठा USP आहे दिलीप प्रभावळकर. त्यांनी वठवलेली बाबुलीची व्यक्तिरेखा अप्रतिम रंगली आहे. त्यांची देहबोली, त्यांचे हावभाव, वेगवेगळ्या प्रसंगात त्यांनी दाखवलेलं अप्रतिम टायमिंग, यांमुळे त्यांनी संपूर्ण चित्रपट व्यापला आहे...

तांत्रज्ञान, अदाकारी आणि संवाद या तीनही पातळींवर जरी चित्रपट नक्कीच उजवा असला, तरी चित्रपटातल्या काही गोष्टी थोड्या खटकल्यासारख्या जाणवल्या. पहिली गोष्ट म्हणजे बाबुली व माधव आणि त्यांच्या वयातलं अंतर. वडील आणि मुलगा यांच्यात जेवढं नातं असतं, त्या मानाने या दोघातल्या वयात जरा जास्त अंतर वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे, 'सिस्टीमविरोधात एका सामान्य माणसाने दिलेला लढा...' या मुद्द्यावर संपूर्ण चित्रपट नसला तरी उत्तरार्ध मात्र पूर्ण अवलंबून आहे. अर्थात चित्रपटाच्या पूर्वार्धात या गोष्टीची थोडी कुणकूण लागते खरी. चित्रपटातली तिसरी खटकणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाचा शेवट. चित्रपटाच्या शेवटी बाबुलीचं श्रीरामाचं रूप आणि रावणरूपी त्या वादळाचा अंत, हे दृश्य दाखवलं असतं, तर एक उत्कट असा शेवट पहायला मिळाला असता...

कथा एका परीने शोकांतिका आहे, कारण एक पूर्ण कुटुंब सिस्टीमच्या पाशात होरपळलं गेलं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला, तर एका सकारात्मक शेवटावर चित्रपट थांबतो, जिथे सारं गाव जागं होतं आणि बाबुलीचा लढा पुढे चालवतं. चित्रपटात दोन मुद्दे अधोरेखित केले गेले आहेत. आपण जर जनावरांशी, वृक्षांशी, किड्यांशी नीट वागलो, तर तेसुद्धा आपल्यासोबत खेळी-मेळीनेच वागतात. त्यांच्यावर केलेला छोटासा उपकारही ते कधीच विसरत नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा निसर्ग, हे वातावरण, आपल्या परंपरा, हे सगळं टिकवणं आपल्याच हातात असतं. प्रगती झालीच पाहिजे. पण त्यासाठी आपला निसर्ग, आपली माणसं, ही किंमत नाही...

दिलीप प्रभावळकरांच्या अप्रतिम अभिनयासाठी आणि कोकणातल्या निसर्ग दर्शनासाठी आवर्जून पहावा असा चित्रपट आहे, सुबोध खानोलकर लिखित, "दशावतार..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

1 comment:

  1. Nice movie and you have perfectly nailed the narration....

    ReplyDelete