Saturday, 28 December 2024

सूपरस्टार काका...

"I hate tears पुष्पा... इन आंसुओंको पोंछ लो... ये बहोत कीमती हैं रे...", "बाबुमोशय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं..." हे संवाद रंगले काकांच्या लेहेजामुळे. काका म्हणजेच जतीन खन्ना, अर्थात, गत काळातला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना...


१९६५ साली United Producers कम्पनीने आयोजित केलेल्या All India Talent Contestमध्ये प्रथम आलेल्या जतीन खन्नाला नायक म्हणून संधी मिळाली, "राज" या चित्रपटाद्वारे. पण त्यांचा दुसरा चित्रपट, "आखरी खत" आधी पूर्ण होऊन प्रदर्शित झाला आणि हाच त्यांचा पहिला चित्रपट ठरला. जतीन खन्ना यांचे चुलते, आर. के. तलवार यांनी काकांची कारकीर्द सुरू होण्याआधी त्यांना राजेश हे नाव दिलं आणि त्याच नावाने काका प्रसिद्ध झाले...

१९६९ हे साल काकांसाठी मैलाचा खडक ठरलं. त्यांची दुहेरी भूमिका असलेला "आराधना" प्रचंड लोकप्रिय झाला. पाठोपाठ "दो रस्ते" व "पूरब और पश्चिम" हे दोन चित्रपटही तुफान गाजले आणि काका रातोरात सूपरस्टार झाले. "सच्चा जूठा", "इत्तेफक", "आन मिलो सजना", "आनंद", "कटी पतंग", "अमर प्रेम", "मेहबूब की मेहेंदी" असे एकापेक्षा एक जबरदस्त लोकप्रिय चित्रपट देऊन काकांनी पुढची तीन वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सुवर्ण कारकिर्दीवर कळस चढावला, "दुश्मन", "बावरची", "दाग", "नमक हराम", "आप की कसम" अशा असंख्य चित्रपटांनी...

"आविष्कार", "हमशकल", "मेरे जीवन साथी", "मालिक" अशा काही चित्रपटांनी काकांच्या कारकिर्दीला थोडा धक्का जरूर लावला, पण त्यातूनही पुन्हा वर येत काकांनी, "रोटी" आणि "अजनबी" सारखे चित्रपट देऊन निसटत चाललेली लोकप्रियता परत मिळवली. १९७५ साली लागलेल्या आणी-बाणीनंतर प्रेक्षकांची आवड बदलली. नायिकांसोबत प्रणयदृश्य देणाऱ्या रोमँटिक नायकापेक्षा अन्यायाविरुद्ध लढा देणारा ऍक्शन हिरो प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. तेव्हा काकांचं सूपरस्टार पद हललं आणि नवा सूपरस्टार अमिताभ बच्चन उदयास आला...

"मक्सद", "नया कदम", "सौतन", "अगर तुम ना होते", "अवतार" असे चित्रपट देऊन काकांनी त्यांचा ठसा उमटवला खरा, पण प्रेक्षकांच्या बदललेल्या आवडीपुढे त्यांचं चालेनासं झालं. शेवटी नव्या दमाच्या नायकांच्या हाती चित्रपटांची धुरा सोपवून, "स्वर्ग", "अमरित", "विजय", "डिस्को डान्सर" अशा चित्रपटात चरित्र अभिनेते म्हणून काका झळकत राहिले. एकेकाळी यशाच्या सुवर्णरथावर विराजमान असलेल्या सूपरस्टार राजेश खन्नाने अपयशाचीही चव चाखली. पण तरीही ते डगमगले नाहीत. एका मागून एक १७ लोकप्रिय हिंदी चित्रपट देणारा कलावंत, हा रेकॉर्ड काकांच्या नावे आजही अबाधित आहे...

आज २९ डिसेंबर. पद्मभूषण राजेश खन्ना यांचा जन्म दिवस. हिंदी चित्रपटसृष्टीच्या या पहिल्या-वहिल्या सूपरस्टार राजेश खन्नाला अर्थात काकांना माझा मानाचा मुजरा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 14 November 2024

भुतोबा सदनाची भट्टी...

एम.डी.: आज फारा वर्षांनी मी मोठ्या पडद्यावर नृत्य सादर करणार आहे...
वि.बी.: मी सुद्धा बऱ्याच काळानंतर नाचणार आहे. तेही माझ्या आवडत्या गाण्यावर...
एम.डी. आणि वि.बी. एकत्र: थँक यू अनीज़ भाऊ...
अनीज़ भाऊ हे नाव ऐकताच एकमेकींकडे पाहत...
वि.बी.: अनीज़ भाऊ... म्हणजे तू...
एम.डी.: तू पण...
हसत हसत दोघी एकमेकींना टाळ्या देतात...


एका बाजूला बसलेला के.ए. हे सर्व ऐकत असतो. त्याचं विचार चक्र सुरू होतं, "म्हणजे या दोघीही आहेत तर... यांचं नृत्य आणि अदाकारी दोन्हीही माझ्याहून सरस. मग माझ्या सारख्या शहज़ाद्याकडे कोण बघणार... नाही नाही. मी मेन हिरो आहे. मी अनीज़ दादाला सांगतोच काहीतरी वेगळं करायला..."

चित्रपट आहे भूल भुलैया ३...

एक पुरानी हवेली, त्या हवेलीचं रहस्य, रहस्यात अडकलेली एक नृत्यांगना, यासह माधुरी दिक्षीत, विद्या बालन आणि कार्तिक आर्यन हे त्रिकूट. जबरदस्त माहोल तयार झाला होता चित्रपटाचा. माधुरी दिक्षीत आणि विद्या बालन समोरासमोर येणार म्हटल्यावर नृत्य आणि अदाकारीचे फटाके वाजणार हे पक्क होतं. पण कसचं काय नी कसचं काय...

चित्रपटभर विद्या बालन आणि कार्तिक आर्यनच दिसतात. अदाकारीमध्ये विद्या बालनने माधुरी दिक्षीतवर नांगर फिरवल्याचं दिसतं. नृत्याबद्दल मला फारसं ज्ञान नाही, पण जाणकारांच्या मते माधुरी दिक्षीतचं नृत्य त्या पठडीतलं नाही. उलट विद्या बालनने तिथेही बाजी मारलेली आहे. रूहबाबा आणि छोटा पंडित या साचेबद्ध भूमिकांमध्ये कार्तिक आर्यन आणि राजपाल यादव यांनी छान काम केलं आहे. चित्रपटात माधुरी दिक्षीतची व्यक्तिरेखा फारशी रंगवलेली दिसत नाही. कथेच्या संकल्पनेत खरंतर विद्या बालनच फक्त असती आणि तृप्ती दिमरीला घेऊन कथेला वळण दिलं असतं तर अजून परिणाम साधला गेला असता...

चित्रपटात दाखवलेला मंजुलिका आणि अतृप्त आत्म्याचा ट्विस्ट या वेळी फारच वेगळा वाटला. अर्थात अंतापर्यंत पोहोचण्यासाठी रुहबाबाचा वापर कमी दिसतो. "भूल भुलैया २" मध्ये रहस्याचा उलगडा करण्यासाठी रुहबाबाचा माध्यम म्हणून उपयोग केला गेला होता. तसं काही या चित्रपटात आढळलं नाही. चित्रपटाचं संगीत बरं आहे. पण मुख्य दोन गाणी वगळता, इतर गाण्यांचा उगाच भरणा केला आहे. "मेरे ढोलना सुन..." या गाण्याच्या सोनू निगमने गायलेल्या ओळी सुंदरच आहेत. मुख्य गाण्याच्या पूर्ण विरुद्धार्थी अशा या गाण्याच्या ओळी आहेत. करुणामय भावनेतून सुरू झालेलं हे गाणं क्रोध या भावनेवर संपतं. त्यामुळे या गाण्याचा वेगळाच परिणाम समोर येतो. चित्रपटाची तांत्रिक बाजू अर्थात व्हि.एफ.एक्स आणि छायांकन छान जमून आलं आहे...

एकंदरीत भुतोबा सदनाची जमलेली ही भट्टी बऱ्याच ठिकाणी कमकुवत झाली आहे. पण सोनू निगमने गायलेल्या गाण्यासाठी आणि विद्या बालनसाठी सिनेमागृहात एकदातरी पहावाच, "भूल भुलैया ३..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 23 October 2024

याचे "जीवन" ऐसे नाव...

हिंदी पौराणिक चित्रपटांत 'देवऋषी नारदमुनी' या महात्म्याला चेहेरा आणि आवाज देणारे कलावंत म्हणजे ओंकारनाथ धर. अर्थात, सर्वांच्या परिचयाचे जेष्ठ अभिनेते जीवन...


काश्मीरच्या शाही पंडित कुटुंबात जन्मल्याने जीवन यांना मान-मरातब खूप होता. लहानपणापासूनच अभिनयाची आवड त्यांना होती. पण चित्रपटात कामं करणं म्हणजे घराण्याला काळीमा फासण्यासारखं म्हणून परिवाराकडून त्यांना विरोध होता. विरोधाला न जुमानता जीवन मुंबईत आले आणि मोहन सिन्हा (अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे आजोबा...) यांच्या स्टुडियोमध्ये रिफ्लेक्टरला चांदीचा कागद लावण्याच्या कामी रुजू झाले. त्याच दरम्यान त्यांना "रोमँटिक इंडिया" या चित्रपटात महत्वाची भूमिका मिळाली आणि तिथून जीवन यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवास सुरू झाला.

१९५० साली प्रदर्शित झालेल्या "हर हर महादेव" या पौराणिक चित्रपटात जीवन यांना 'देवऋषी नारदमुनी' ही व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. ती व्यक्तिरेखा जीवन यांनी इतकी सुंदर वठवली की त्यापुढे येणाऱ्या "शिव पार्वती", "गोपाल कृष्ण" अशा बऱ्याच पौराणिक चित्रपटांत अभिनेते त्यांना देवऋषी नारदमुनी हीच व्यक्तिरेखा मिळत गेली. "महाभारत" या चित्रपटात जीवन यांनी साकारलेला 'शकुनी' सर्वांची दाद मिळवून गेला. पौराणिक चित्रपटातल्या 'नारदमुनी' या व्यक्तिरेखेसोबतच जीवन यांनी "आँखें", "याराना", "धरम-वीर", "सुहाग", "अमर अक़बर एँथनी" अशा अनेक चित्रपटात साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांनी पसंत केल्या. शिवाय, देव आनंद आणि दिलीप कुमार यांच्या सोबतही जीवन यांनी अनेक चित्रपटांमधून कामं केली...

जीवन यांना सहायक भूमिका क्वचितच मिळाल्या. त्यांच्या बोलण्याची विचित्र पद्धत आणि संवादफेक यांच्यामुळे "नसीब", "बुलंदी", "रोटी" अशा काही चित्रपटांमध्ये त्यांना विनोदी ढंगाच्या भूमिकाही मिळाल्या. जीवन यांना त्यांचं हे टोपण नाव बहाल केलं ते मोहन सिन्हा यांनी. "रोमँटिक इंडिया" या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मोहन सिन्हा यांनी जीवन यांना हे टोपण नाव सुचवलं. तेच टोपण नाव धारण करून अभिनेते जीवन, हिंदी आणि पंजाबी चित्रपटात ओळखले गेले...

आज २४ ऑक्टोबर. ओंकार नाथ धर म्हणजेच अभिनेते जीवन यांचा जन्मदिवस. आज ते आपल्यात नाहीत. पण चित्रपट रूपात त्यांचं नाव अजरामर राहील. हिंदी चित्रपटसृष्टीच्या "नारदमुनींना" वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...

नारायण... नारायण...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 18 July 2024

आधुनिक मायाजालात हरवलेला अवतार...

कलियुगाच्या अंताला प्रकट होणाऱ्या श्री विष्णूच्या दहाव्या अवताराबद्दल सर्वांनाच माहित आहे. त्याच कल्की अवताराच्या जन्माच्या आधी होणाऱ्या काही घडामोडींवर आधारित आहे नाग अश्विन दिग्दर्शित, "कल्की २८९८ ए.डी..."


चित्रपटात एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करवून त्या गर्भाच्या स्रोताचा वापर करून आपल्या राजाला म्हणजेच यास्कीनला (कमल हसन) अमरत्व प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात असलेला राक्षसी ताकदीचा एक घटक दिसतो. तर दुसरीकडे श्री विष्णूच्या दहाव्या अवताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आणि असामान्य राक्षसी ताकदींच्या विरोधात उभ्या काही लढवय्यांचा दुसरा घटक असतो. याशिवाय चित्रपटात अजून तीन व्यक्तिरेखा आहेत...

पहिली आहे, स्वत:च्या गर्भात दुष्टांचा नायनाट करणारी महाशक्ती वाढवणारी, आणि हे बाळ कोण आहे याबद्दल जराही कल्पना नसलेली Sum80 अर्थात सुमती (दीपिका पदुकोण). दुसरा आहे स्वत:ची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी चांगल्या-वाईटाचा विचार न करता लढणारा भैरव (प्रभास) आणि तिसरे आहेत महाभारत काळातले महायोद्धे, चिरंजीव अश्वथामा (अमिताभ बच्चन) ज्यांना माथ्यावरील भळभळणाऱ्या जखमेसह कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहण्याचा शापही मिळतो. आणि क्षमा-याचना केल्यावर कलियुगाच्या अंताला जन्म घेणारा श्री विष्णूचा दहावा अवतार जिच्या गर्भात असेल, तिचं रक्षण करून मुक्ती मिळवण्याचा उ:शापही मिळतो...

या चारही घटकांच्या वेगवेगळ्या पण एकमेकात गुंतलेल्या प्रवासातून चित्रपट उलगडत जातो. गाणी उगाच येऊन वेळ घालवतात असं वाटतं. मध्यंतरापर्यंत कथानक थोडं रटाळ झालं आहे. कथेला खऱ्या अर्थाने वेग मिळतो, तो मध्यंतरानंतर. कथेत येणाऱ्या काही टप्प्यांमध्ये, जागांमध्ये, प्रसंगांमध्ये "Terminator", "Matrix Revolutions", "Avatar", "Transformers", "Avengers", "Justice League", "Black Panther" या इंग्रजीपटांचा आणि "बाहुबली द बिगिनिंग" व "ब्रह्मास्त्र" या भारतीयपटांचा प्रभाव दिसतो. चित्रपटात चांगली आणि वाईट प्रवृत्ती दर्शवण्यासाठी वापरलेले रंग चपखल आहेत. म्हणजे दु:ष्ट प्रवृत्तीच्या माणसांसाठी काळा कपडेपट तर त्यांच्या बंदुकींसाठी लाल गोळ्या वापरल्या आहेत. चांगल्या व्यक्तींसाठी पांढरे कपडे आणि त्यांच्या बंदुकींसाठी निळ्या रंगाच्या गोळ्या वापरल्या गेल्या आहेत...

कलावंतांची निवड बरी झाली आहे. एस. एस. राजामोली, राम गोपाल वर्मा, ब्रह्मनंदम् आणि शोभना यांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. दिशा पटणीचा चित्रपटात झालेला प्रवेश लक्षात येतो. पण तिची एग्झीट समजली नाही. कारण एका प्रसंगानंतर दिशा पटणी पुन्हा चित्रपटातच दिसत नाही. चांगल्या-वाईटाच्या कचाट्यात सापडलेली आणि स्वत: संभ्रमात अडकलेली सम ८० अर्थात सुमतीची व्यक्तिरेखा दीपिकाने चांगली वठवली आहे. प्रभास मात्र "बाहुबली" आणि "साहो" मधून बाहेर आलेला दिसत नाही. संपूर्ण चित्रपटातली भैरवची वेशभूषा, चित्रपटाच्या शेवटी त्याला मिळालेल्या नव्या ओळखीची ग्वाही देते. चित्रपटभर ती वेशभूषा जरा खटकते. पण चित्रपट शेवटाला आल्यावर मात्र ती सार्थकी वाटते...

अमिताभ बच्चन यांनी साकारलेलं चिरंजीव अश्वथामाचं पात्र छान जमलं आहे. अमितजींची देहबोली, त्यांचे संवाद आणि त्यांची ऊंची महाभारत काळाशी सुसंगत वाटते. पण चित्रपटात सर्वात जास्त प्रभावशाली कोणतं पात्र झालं असेल, तर ते आहे कमल हसन यांनी साकारलेला यास्कीन. कमल हसन यांचे फक्त तीन प्रसंग आहेत संपूर्ण चित्रपटात. पण त्यांनी आपल्या देहबोलीने आणि मोजक्या संवादांनी ती दृष्य जबरदस्त रंगवली आहेत. "गिरफ्तार"नंतर अमिताभ बच्चन आणि कमल हसन पुन्हा इतक्या वर्षांनी एकत्र एकाच पडद्यावर दिसले खरे. पण त्यांचं एकत्रित दृश्य नव्हतं. कदाचित येणाऱ्या भागात या दोन मातब्बर कलावंतांना एकत्र पाहता येईल...

चित्रपटातले दोन संदर्भ लक्षात नाही आले. विजय धनुष्य ज्यांच्या हाती होता ते सूर्यपूत्र कर्ण जर नव्याने परतले, तर गांडीव धनुष्यधारी अर्जूनही पुन्हा परतायला हवेत असं वाटतं. शिवाय यास्कीनच्या दुष्ट शक्तींनी सम ८०च्या गर्भात कृत्रीम पद्धतीने बाळ रुजवलं आहे. मग श्री विष्णूचा दहावा अवतार तो हाच का... आणि जर हे खरं तर यास्कीन वाईट कसा... असो. शंका खूप आहेत पण तुर्तास तरी हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. One time watch असणाऱ्या "कल्की"च्या पुढच्या भागात कदाचित सर्व उत्तरं मिळू शकतील...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 13 June 2024

सफर जादुई दुनियेची...

"जम जम जंबूरा... दिखा दे जादू पूरा पूरा..." हा मंत्र वापरल्यावर घडणाऱ्या चिवित्र घडामोडीची मालिका म्हणजेच राजिव चिलाका दिग्दर्शित, "छोटा भीम और दमयान का श्राप (Chota Bheem & the curse of Daymaan)...

ढोलकपूर, छोटा भीम, भीमचे सवंगडी या सगळ्यांबद्दल आपण आपल्या लहानग्यांकडून ऐकतच असतो. तोच अनुभव मोठ्या पडद्यावर साकारायचा प्रयत्न केला लेखक श्रीदिशा दिलीप आणि नीरज विक्रम यांनी. कथानक म्हटलं तर एखाद्या परिकथेला किंवा कार्टून मालिकेला साजेसंच आहे. म्हणजे नायक, त्याचे सवंगडी, जादुगार, तंत्रविद्या जाणणारा खलनायक आणि भरपूर जादू. चित्रपटाचं संगीत बऱ्यापैकी उडत्या चालीचं असल्याने कथेच्या प्रवाहाला ठेहराव येईल असं जाणवत नाही...

लहान मुलांचा विचार करून जादू दाखवताना निळ्या किंवा जांभळ्या अशा शांत रंगांचा वापर झाला आहे. चित्रपटातील महाल, गाव, बागा, गुहा, फुलं, झाडं या सर्वांसाठीसुद्धा निळा, हिरवा, जांभळा, मोरपिशी, हलका गुलाबी असे रंग वापरल्याने चित्रपटाला भडकपणा आलेला नाही. कथानकातल्या बऱ्याच दृष्यात आपल्याला हॉलिवुडच्या डॉ. स्ट्रेंज, स्पायडर मॅन, स्काय हाय, हॅरी पॉटर, अवेंजर्स, अल्लादीन या चित्रपटांचा प्रभाव दिसतो. २०१२ सालच्या "छोटा भीम और दमयान का श्राप" या कार्टून चित्रपटाचा हा रिमेक आहे खरा पण तंत्रज्ञान बऱ्यापैकी चांगलं आहे...

कलावंतांच्या यादीत अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे यांनी लौकिकाला साजेशी अदाकारी केली आहे. चित्रपटात अनुपम खेर यांना एका जादुगाराची (गुरू शंभू) भूमिका मिळाली आहे. पण कथानकात त्यांना जास्त वाव मिळाला नाही. चित्रपटाच्या पूर्वार्धात गुरू शंभू आणि दमयान यांच्यात एक युद्ध दाखवलं आहे. तेच युद्ध जर चित्रपटाच्या उत्तरार्धातही थोड्या वेगळ्या पद्धतीने रंगवलं गेलं असतं आणि त्यात जर छोटा भीम आणि त्याच्या सवंगड्यांना गुरू शंभूसोबत दमयानशी लढताना दाखवलं असतं, तर शेवटाने अधिक परिणाम साधला असता...

हल्लीच्या लहान मुलांना फाईट सीन्समध्ये हवेत उडणं, कोलांट्या उड्या, मध्येच स्लो मोशन येणं हे प्रकार खूप आवडतात. तेच लक्षात ठेऊन चित्रपटातली हाणामारीची दृष्य साकारली गेली आहेत. त्याच बरोबर चित्रपटाचं पार्श्वसंगीत आणि अधून-मधून येणारं "छोटा भीम..." हे शीर्षक गीत, यामुळे भट्टी छान जमली आहे. एकंदरीत, जादुई दुनियेची सफर घडवणारा  श्रीदिशा दिलीप आणि नीरज विक्रम लिखीत "छोटा भीम और दमयान का श्राप" हा चित्रपट लहानग्यांसाठी परवणीच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 28 March 2024

कोंदणातला सूर्य...

'कोंदणातला हिरा' असं ज्यांचं वर्णन करता येईल, ते महापुरुष म्हणजेच स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...


तात्यारावांना आयुष्यभर कोंदणातच रहावं लागलं. परिस्थितींचं कोंदण, ब्रिटीश राजवटीचं कोंदण. पार भगुरपासून ते फर्ग्यूसन कॉलेजपर्यंत आणि अंदमानच्या सेल्यूलर जेलपासून रत्नागिरीपर्यंत, हा हिरा जरी कोंदणातच राहिला, तरीही तात्यारावांची प्रतिमा झळाळत्या सूर्याप्रमाणे उजळली. अशा अगाध व्यक्तिमत्वाला तीन-सवा तीन तासांच्या कथानकाद्वारे दाखवणं म्हणजे चांगलंच कठिण काम. पण अभिनेते-दिग्दर्शक रणदीप हुडाने ही कामगिरी चोख पार पाडली आहे...

चित्रीकरण, छायांकन, पार्श्वसंगीत, कथानक आणि अदाकारी या सर्वच गोष्टी उत्तम झाल्या आहेत. आणि सोन्यावर कळस म्हणजे चित्रपटातले संवाद. काही वेळा टाळ्या याव्यात आणि काही वेळा 'वाह वाह', असे ते संवाद खुसखुशीत नसतील, पण दर्जेदार नक्कीच होते. चित्रपटात अनेक वेळा वैचारिक द्वद्वांचं दर्शन घडलं. तात्याराव आणि महात्मा गांधी यांचे एकत्रित प्रसंग, लोकमान्य टिळक आणि तात्यारावांची एकत्रित दृष्य, तात्याराव आणि रेगिनाल्ड क्रेडॉक यांच्यातला प्रसंग, ही सर्व नुसत्या संवादांनी भरलेली दृष्य नसून तात्यारावांच्या उच्च आणि प्रगल्भ विचारांचा तो एक समुद्रच होता असं माझं मत आहे...

मध्यंतरानंतरचा अर्ध्याहून अधिक भाग अंदमानच्या सेल्यूलर जेलवर प्रकाशझोत टाकतो. कैद्यांना, विशेषत: भारतीय कैद्यांना दिली जाणारी वागणूक, शारीरिक व मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षा, या सर्वांचं परिणामकारक दर्शन घडतं. एकांतवासातली दृष्य तर इतकी काळीज पिळवटणारी आहेत, की ती पाहताना डोळ्यात पाणी तर येतंच, पण बॅरीला पाहताच चेहेऱ्यावर क्रोधही उमटतो. ते सर्व चित्रीत करताना वापरलेले साऊंड इफेक्ट्स आणि प्रकाशयोजना यांमुळे ती दृष्य कमाल रंगली आहेत. मी सेल्यूलर जेलला भेट दिली तेव्हा तिथे कैद्यांना शिक्षा देण्यासाठी वापरलेली साधनं होती. त्यावेळी खरंतर काहीच वाटलं नाही. पण आज जेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहिला (आधी मराठी चित्रपट पाहिला होता...) तेव्हा त्या शिक्षांची तीव्रता अधिक जाणवली...

चित्रपटात वापरलेली रंगभूषा आणि वेशभूषा त्या काळाचं तंतोतंतं दर्शन घडवतात. तुरूंगवासात तात्यारावांचे आतोनात हाल होत असताना त्यांची बिघडलेली प्रकृती, तिथल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे त्यांचे खराब झालेले दात. त्यांचे मागे सरकलेले केस. तात्यारावांच्या वाढत्या वयासोबत त्यांच्या चेहेऱ्यात होत गेलेले बदल. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, इतकंच कशाला, तर त्या काळातल्या स्रियांसाठी, पुरुषांसाठी, शिवाय ब्रिटीश व फ्रेंच लोकांसाठींचे कपडेपटही चपखल बसलेत. कुठेही मेकपचा भपका किंवा भारी-भरजरी कपड्यांचा वापर दिसत नाही. संगीतानेही चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. मंगेशकर कुटुंबाने गायलेली, "ने मजसि ने..." ही तात्यारावांची कविता सर्वांच्याच लक्षात आहे. तीच कविता चित्रपटात इतक्या परिणामकारकरित्या वापरली गेली आहे, की कविता ऐकताना आणि समोरचं दृष्य पाहताना डोळे ओले झाल्याशिवाय राहत नाहीत...

चित्रपटाचा सर्वात महत्वाचा स्तंभ आहे पात्रांची निवड आणि अदाकारी. रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे ही दोन पात्र वगळता कुठलाही मोठा कलावंत चित्रपटात दिसत नाही. सर्व पात्रांची निवड शंभर टक्के साचेबद्ध आहे.  चित्रपटातली अदाकारी हा चित्रपटावरचा सोनेरी कळस आहे असंच मी म्हणेन. रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे या दोघांना पाहतानाही तात्याराव आणि यमुनाबाईच समोर दिसतात. चित्रपटातली काही दृष्य फार सुरेख आहेत. तात्यारावांची त्रिखंडात गाजलेली उडी जिथे टाळ्यांचा पाऊस पाडून गेली. तिथेच तात्याराव आणि बाबाराव म्हणजेच गणेश दामोदर सावरकर या दोन भावांची नऊ वर्षांनंतर झालेली भेट डोळ्यात आसवं आणून गेली. "I outlasted you Barry..." या वाक्याच्या वेळी त्याही परिस्थितीत तात्यारावांच्या चेहेऱ्यावरचे करारी भाव आणि बॅरीच्या चेहेऱ्यावर असलेले अपराधीपणाचे भाव त्या दृष्याला अधिक उभारी देतात...

ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला, जवळ जवळ त्या सर्वांनीच चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले. त्या विचारांच्या महायज्ञात माझं हे छोटंसं अर्पण. फक्त हिंदूंनीच नाही, तर प्रत्येक भारतीयाने थियेटरमध्ये जाऊन आवर्जून पहावी अशीच ही कलाकृती आहे. रणदीप हुडा अभिनीत व दिग्दर्शित, "स्वातंत्र्यवीर सावरकर..."

आसिन्धु सिन्धु-पर्यन्ता...
यस्य भारत-भूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै...
हिन्दुरिति स्मृत: ॥

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 26 March 2024

सुडांची उत्कंठावर्धक कहाणी...

"क्यौं जनाब, ईंट का जवाब पत्थर से देने आए हो..." "नहीं, धोखे का जवाब, बदले से..." हे संवाद आहेत, २०२४ साली प्रदर्शित झालेल्या, "फायटर" या चित्रपटातले...


फुलवामामध्ये आपल्या जवानांवर झालेला हल्ला आणि त्याचं प्रतिउत्तर म्हणून आपल्या वायूसेनेने बालाकोट येथे केलेला एयर स्ट्राईक, यावर बेतलेलं कथानक म्हणून "फायटर" या चित्रपटाची चांगलीच हवा होती. पण फुलवामा आणि बालाकोट या घटना चित्रपटाचा एक छोटा भाग होता हेच चित्रपट पाहताना जाणवतं...

कथानक सुरू होतं श्रीनगर एयर बेसवर होणाऱ्या हल्ल्याच्या खबरेने. तो हल्ला मोडीत काढण्यासाठी 'एयर ड्रॅगन्स' या घातक समुहाची स्थापना केली जाते. त्यांच्या ट्रेनिंग दरम्यानच फुलवामाचा हल्ला होतो आणि प्रतिउत्तरादाखल बालाकोटचा एयर स्ट्राईक केला जातो. त्या एयर स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी अझ़र अख़्तर (ऋषभ शेणॉय) नावाचा एक अतिरेकी श्रीनगर एयर बेसलर अचानक हल्ला करतो. प्रतिउत्तरादाखल शमशेर 'पॅटी' पठानिया (ऋतिक रोशन), बशीर 'बॅश' ख़ान (अक्षय ओबेरॉय) आणि सरताज 'ताज' गिल (करण सिंह ग्रोव्हर) हे तीन एयर ड्रेगन्स दिलेले हुकूम मोडत बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात घुसतात...

पॅटी वाचतो पण ताज आणि बॅश शत्रूच्या जाळ्यात अडकतात. पॅटीवर या गोष्टीचा ठपका ठेऊन त्याला एयर ड्रॅगन्स समुहातून निलंबित करून त्याची बदली केली जाते. तिथे पाकिस्तान सरकार ताज आणि बॅशला सोडायला तयार होतं. पण अझ़र मात्र बॅशला मारून त्याचं शव परत पाठवतो. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी एक मिशन ठरवलं जातं. ताज आणि बॅश आपल्यामुळे पकडले गेले हा सल मनात ठेवलला पॅटी पुन्हा एकदा दिलेले हुकूम झुगारून मिशनमध्ये शिरकाव करतो आणि मिनल 'मिनी' राठोड़ (दीपिका पदुकोण) व एयर ड्रॅगन्सचा हेड राकेश 'रॉकी' जयसिंह (अनिल कपूर) यांच्या मदतीने अझ़र अख़्तरसह सर्व अतिरेक्यांना कंठस्नान घालतो आणि ताजलाही वाचवतो...

फक्त फुलवामा आणि बालाकोट या घटनांना धरून चित्रपटाचं कथानक तयार झालं आसतं तर "उरी" सारखा परिणाम साधता आला असता. पण बदल्यांची मालिका आणि काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा भरणा, यांमुळे कथानक मुख्य रस्त्यापासून थोडं भरटकल्यासारखं जाणवलं. चित्रपटात गाणी जर नसती तर चित्रपट वेग राखण्यात यशस्वी झाला असता. त्यातल्या त्यात, "हीर आसमानी..." आणि "शेर खुल गए..." ही दोन गाणी तितकीच वेगवान असल्याने जास्त फरक पडत नाही. शिवाय, "सुजलाम् सुफलाम् मलयजं शितसाम्..." ही ओळ ज्या पद्धतीने वापरली गेली आहे, चित्रपटातलं जोशपूर्ण वातावरण राखण्यात ती प्रभावी ठरते...

चित्रपटाच्या तीन जमेच्या बाजू आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, चित्रपटात दाखवलेली साहसदृष्य आणि कलावंतांची अदाकारी. वेगवान कथानकाला शोभेल असं जबरदस्त पार्श्वसंगीत चित्रपटाला लाभलं आहे. चित्रपटाची साहसदृष्य तर भन्नाट रंगली आहेत. विशेषत: पॅटीची एंट्री आणि पॅटी व रॉकीची हवाई जुगलबंदी. साहसदृष्यांसाठी वापरलेले कॅमेरा एँगल्स निव्वळ अप्रतीम आहेत. अधाकारी म्हटली, तर ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण जरी चित्रपटाचे नायक-नायिका असले, तर अनिल कपूर यांनी अदाकारीमध्ये बाजी मारली आहे. चित्रपटातले संवादही दमदार आहेत. काही संवाद तर टाळ्या घेणारे ठरलेत...

एकंदरीत, सुडांची मालिका दर्शवणारं कथानक, हा उल्लेख होईल, असा चित्रपट म्हणजे, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, "फायटर..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 24 February 2024

बुलंद आवाजाचा अजनबी...

"अपना उसूल कहता है, अगर फायदा हो तो झूठ को सच मान लो... दुश्मन को दोस्त बना लो...", "कमजोर की दोस्ती, ताक़दवर के वार को कम कर देती है...", "हर जंग बॉर्डर पार नहीं होती..." हे संवाद कानावर पडले की एकच व्यक्ती आठवते. क्षेरिंग डेंगझाँग्पा, अर्थात सर्वांच्या परिचयाचे प्रसिद्ध अभिनेते, डॅनी...

नैनीताल आणि दार्जिलिंगमधून आपलं शिक्षण पूर्ण करणाऱ्या क्षेरिंगचा कल भारतीय सैन्यात जाण्याकडे होता. "Armed Forces Medical College"साठी क्षेरिंगची निवडही झाली होती. पण पुण्यातल्या "FTII - Film & Television Institute of India" या संस्थेत जाण्यासाठी त्याने त्याच्या निवडीला बगल देण्याचं ठरवलं. क्षेरिंग सोबत शिकणाऱ्या अभिनेत्री जया भादुरी यांच्या सल्ल्यानुसार क्षेरिंगने उच्चारायला कठीण असलेलं त्याचं नाव बदलून डॅनी हे नाव धारण केलं...

बी.आर.इशारा यांचा "जरूरत" हा डॅनीचा पहिला चित्रपट होता. पण त्याचं चित्रिकरण लांबल्याने गुलज़ार यांचा "मेरे अपने" हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला. "मेरे अपने" मध्ये डॅनीला बऱ्यापैकी चांगली भूमिका होती. पण विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा समोर डॅनीची भूमिका थोडी झाकोळली गेली. १९७१-७२ या काळात अनेक छोट्या भूमिका डॅनीच्या वाट्याला आल्या. काही सकारात्मक होत्या तर काही नकारात्मक. पण डॅनीला विशेष यश मिळत नव्हतं. १९७२च्या शेवटी प्रदर्शित झालेल्या "धुँध" या चित्रपटाने डॅनीसाठी नकारात्मक भूमिकांचं नवं दालन खुलं केलं...

"अग्नीपथ"मधला कांचा चीना, "क्रांतिवीर"मधला चतुरसिंह चिता, "घातक"मधला कातिया, "३६ घंटे"मधला दिलावर ख़ान, "द बर्निंग ट्रेन"मधला रणधीर, "पुकार"मधला अब्रूश, "बलवान"मधला भाईजी अशा अनेक नकारात्मक भूमिकांनी डॅनीने चित्रपट गाजवले. "शाका", "सोना सिंह", "शेरा" अशा, दरोडेखोराच्या एकसूरी भूमिका साकारताना डॅनीला वीट आला होता. काही काळ चित्रपटसृष्टीपासून अलिप्त राहिल्यावर डॅनी परतले ते एक कथानक मनात ठेऊन. एन.एन.सिप्पीच्या सांगण्यावरून डॅनीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि अभिनेते डॅनी दिग्दर्शित एकमेव चित्रपट, "फिर वही रात"चा जन्म झाला...

"फिर वही रात"मधल्या वेगळ्या भूमिकेमुळे, सकारात्मक किंवा नकारात्मक पण वेगळ्या भूमिकाही डॅनी वठवू शकतात हे जाणवलं. "ऐतबार", "चायना गेट", "सनम बेवफ़ा", "ख़दा गवाह", "फकीरा", "खोज", "बॉक्सर", "हम", "१६ दिसंबर" अशा अनेक चित्रपटांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारताना डॅनी दिसले. या शिवाय, "बुलंदी", "धरमात्मा", "चोर मचाये शोर", "खोटे सिक्के" अशा काही चित्रपटांमधून डॅनीने नायक किंवा सहनायकाच्या भूमिकेतही छाप पाडली. या सोबतच छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेल्या, "अजनबी" या मालिकेतली डॅनीची भूमिकाही वाखाणली गेली. अदाकारीसोबतच अजून एका गोष्टीसाठी डॅनी प्रसिद्ध होते. ती गोष्ट म्हणजे पार्श्वगायन...

"मेरा नाम आओ...", "सुन सुन कसम से...", "मुझे दोस्तों तुम गले लगा लो..." अशी अनेक गाणी डॅनीच्या स्वरांनी सजली. हिंदीतच नाही, आसामी आणि नेपाळी भाषेतही डॅनीने गाणी गायली आहेत. किशोर कुमार, मोहम्मद रफ़ी, आशा भोसले, लता मंगेशकर या मातब्बर गायकांची साथही डॅनीला लाभली...

आज २५ फेब्रूवारी. आज डॅनी डेंगझाँग्पाचा वाढदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बुलंद आणि धारदार आवाजाच्या व छोट्या पडद्यावरील "अजनबी"ला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.