Saturday, 24 September 2022

तुझ्यावाचून काम होई ना...

"तुझं माझं जमेना... तुझ्यावाचून करमेना..." याच आशयाचं कथानक आहे १९९५ साली प्रदर्शित झालेल्या दिनेश गांधी प्रस्तुत "हम दोनों" या चित्रपटाचं...


मुंबईच्या श्रीमंत व्यावसायिक विक्रम सैगल (अलोक नाथ) यांची दोन मुलं असतात. मोठा मुलगा विशाल (नाना पाटेकर) रुक्ष, कोरडा आणि गंभीर असतो तर धाकटा राजेश ऊर्फ राजू प्रेमळ, आनंदी आणि विनोदी वृत्तीचा असतो. विशाल अवरस असतो तर राजू अनवरस. हे दोघंही एकमेकांना अपरिचित असतात. विक्रम सैगलचा अपघाती मृत्यू होतो आणि विशालवर आर्थिक संकट ओढवतं. संपत्तीतला काही हिस्सा राजूला मिळणार असेल तरच उरलेली संपत्ती विशालकडे जाईल अशी अट विक्रमच्या मृत्यूपत्रात असते...

तिथे प्रियंका (पूजा भट) नावाच्या श्रीमंत मुलीवर राजूचं प्रेम असतं. गरीब-श्रीमंत हा वाद समोर येतो आणि प्रियंकाला राजूपासून दूर करून मुंबईला नेलं जातं. आर्थिक विवंचनेतून वाचण्यासाठी विशालला राजूची गरज असते तर प्रियंकाला परत मिळवण्यासाठी राजूला विशालची मदत हवी असते. असे हे दोघे भाऊ एकत्रित मुंबई प्रवासाला सुरुवात करतात. हा प्रवासच या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे...

चित्रपटाला आनंद-मिलिंद यांचं संगीत लाभलं आहे. गाणी तशी चांगलीच आहेत, पण त्यातल्या त्यात उदित नारायण आणि रविंद्र साठे यांनी गायलेली "कभी दुश्मन हैं कभी यार हैं हम दोनों...", "अंबर की चाँदनी... इसके चक्कर में आना नहीं..." ही दोन गाणी जास्त लक्षात राहतात. विशेषत: "अंबर की चाँदनी..." या गाण्याचं दुसरं कडवं. बदललेल्या चालीमुळे आणि टेंपोमुळे, शिवाय नाना पाटेकरांनी सादर केलेल्या नृत्यामुळे, रविंद्र साठे यांनी गायलेलं हे दुसरं कवडं अधिक भाव खाऊन जातं...

नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्याखेरीज अनेक कलावंतांनी चित्रपटात हजेरी लावली आहे. पण नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांच्या अदाकारीने चित्रपटाला खाऊन टाकलं आहे. चित्रपटाची गंभीर आणि हाणामारीची बहुतांश बाजू नाना पाटेकरांनी सांभाळली आहे तर रोमँटिक आणि हलकी-फुलकी बाजू ऋषी कपूरच्या वाट्याला गेली आहे. पण चित्रपटाची विनोदी बाजूत मात्र दोघांनीही बाजी मारली आहे. राजूचा मस्कऱ्या व खादाड स्वभाव आणि विशालचा रुक्ष स्वभाव व नीटनेटकेपणा, यांमुळे विनोदी भट्टी अप्रतीम जमली आहे. देहबोली आणि चित्रविचित्र हावभावांतून ऋषी कपूरने तर संवाद आणि गंभीर चेहेरा ठेवत नाना पाटेकरांनी अफाट विनोदनिर्मिती केली आहे...

१९८० ते १९९० या दशकात नाना पाटेकर-शफी इनामदारने "आवाम", "आज की आवाज" या चित्रपटांमध्ये, तर ऋषी कपूर-शफी इनामदारने "सागर", "दोस्ती दुश्मनी" या चित्रपटांमध्ये सह-कलावंत म्हणून काम केलं होतं. "हम दोनों"च्या निमित्ताने या जोड्या पुन्हा एकत्र आल्या. नाना पाटेकर आणि ऋषी कपूर कलावंत म्हणून पडद्यावर झळकले, पण शफी इनामदार मात्र लेखक-दिग्दर्शकाच्या दुहेरी भूमिकेत पडद्यामागे राहिले. "हम दोनों" शफी इनामदार यांच्या लेखणीतून साकारला आणि त्यांच्याच दिग्दर्शनाने सजला. बहुतेक दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट होता...

एकंदरीत, विशालला राजूची सही मिळेल का...?, राजू आणि प्रियंकाचं मिलन होईल का...? विशाल आणि राजू हे परस्पर विरोधी भाऊ एकमेकांना समजून घेतील का...? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि नाना पाटेकर व ऋषी कपूर यांच्या अभिनय जुगलबंदीसाठी, १९९५ सालचा "हम दोनों" हा चित्रपट पहाच...

चित्रपटाची Youtubeची लिंक: https://youtube.com/watch?v=txUcoSLZWsw&feature=share

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 20 September 2022

द बॅड मॅन...

बलिराम, कालीसिंह, केसरिया विलायती, छप्पन टिकली, टायसन, दोस्त ख़ान, ही नावं ऐकली किंवा वाचली की एकच चेहेरा डोळ्यांसमोर येतो. तो म्हणजे बॉलिवूडचा 'बॅड मॅन' गुलशन ग्रोवर...


नवी दिल्ली येथे जन्मलेल्या गुलशन ग्रोवरची लहानपणापासूनच अभिनयाकडे रुची होती. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी एक स्टूडियोदेखील सुरू केला, जिथे ते अभिनयाचे धडे द्यायचे. गुलशन ग्रोवर मुंबईत आले आणि १९८० साली प्रदर्शित झालेल्या "हम पाँच" या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकले. पुढे "सदमा", "अवतार", "मशाल", "बुलंदी" अशा चित्रपटांमधून सहायक भूमिकांमध्ये ते दिसले. "सदमा"मध्ये जी काही थोडी नकारात्मकतेची झलक गुलशन ग्रोवर यांनी दाखवली, तीच त्यांच्या पुढील प्रवासाची पायरी ठरली...

"खतरों के खिलाड़ी", "विजयपथ", "दूध का कर्ज़" अशा काही चित्रपटांमधून सहायक नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या गुलशन ग्रोवर यांनी "शोला और शबनम", "खिलाड़ियों का खिलाड़ी", "दस", "सूर्यवंशी", "गँब्लर", "लोफर", "सर", "१६ डिसेंबर" अशा अनेक चित्रपटांमधून मुख्य खलनायकी व्यक्तिरेखाही सुरेख वठवल्या. गुलशन ग्रोवर यांच्या जवळपास प्रत्येक खल व्यक्तिरेखेत एक विशिष्ठ लकब किंवा एखादा खास संवाद असायचाच. "राम-लखन"मधल्या केसरिया विलायतीचं 'बॅड मॅन' म्हणणं, "गँब्लर"मधल्या बिल्लाचं 'म्याव म्याव' म्हणणं, "मोहरा"मधल्या टायसनचं 'डर्टी माईंड' म्हणणं, अशा लकबी आणि उच्चारांमुळे गुलशन ग्रोवर यांनी साकारलेला खलनायक वेगळा ठरायचा...


गुलशन ग्रोवर म्हणजे व्हिलन आणि व्हिलन म्हणजे गुलशन ग्रोवर असं समीकरण असताना गुलशन ग्रोवर यांनी साकारलेल्या काही खल व्यक्तिरेखा या थोड्याशा विनोदी बाजाच्याही होत्या. "फन्टूश"मधला चिंदी चोर असो किंवा "विश्वात्मा"मधला तपस्वी गुंजाल, "इंटरनॅशनल खिलाड़ी"मधला ठकराल असो किंवा "सबसे बड़ा खिलाड़ी"मधला के. कड़ा, गुलशन ग्रोवर यांनी साकारलेली प्रत्येक विनोदी खल व्यक्तिरेखा लक्षात राहण्यासारखी होती. या शिवाय गुलशन ग्रोवर यांनी अनेक सकारात्मक भूमिकाही हाताळल्या आहेत. "राजा की आयेगी बारात", "अनारी", "दुलारा", "तहलका", "टार्झन - द वंडर कार", अशा अनेक चित्रपटांमध्ये गुलशन ग्रोवर सकारात्मक किंवा सहायक भूमिका निभावताना दिसले...

हिंदी चित्रपटसृष्टीचा 'बॅड मॅन' हे बिरुद मिरवत असताना गुलशन ग्रोवर यांनी काही संवेदनशील भूमिकाही निभावल्या. "आय ऍम कलाम" या चित्रपटातली गुलशन ग्रोवर यांनी साकारलेली, 'भट्टी' ही व्यक्तिरेखा कोण विसरेल... त्याच व्यक्तिरेखेसाठी गुलशन ग्रोवर यांना सर्वोत्कृष्ट सहायक कलावंताच्या राष्ट्रीय पुरस्काराचं नामांकनही मिळालं होतं. या खेरीज, "बीपर", "ब्लाईंड एम्बिशन", "डेस्परेट एन्डिवर्स", "प्रिझनर्स ऑफ द सन" या हॉलीवूडपटांमध्ये देखील गुलशन ग्रोवर यांनी हजेरी लावली. "डेस्परेट एन्डिवर्स" या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेसाठी गुलशन ग्रोवर यांना, न्यूयॉर्क सिटी फिल्म फेस्टिव्हल आणि हॉस्टन फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोकृष्ट अंतरराष्ट्रीय कलावंताचा पुरस्कारही मिळाला...


सकारात्मक असो किंवा नकारात्मक, अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या, त्या सर्व लक्षात राहणाऱ्याच ठरल्या. आज २१ सप्टेंबर. गुलशन ग्रोवर यांचा जन्मदिवस. बॉलीवूडच्या या बॅडमॅनला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देताना "दिल गार्डन गार्डन हो गया..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Sunday, 11 September 2022

ब्रह्मास्त्र (शिवा)...

अग्नीअस्त्र, वायूअस्त्र, पर्जन्यास्त्र अशा अनेक अस्त्रांबद्दल आपण ऐकतो. या सर्व अस्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ अस्त्र म्हणजेच ब्रह्मास्त्र. याच ब्रह्मास्त्रासंदर्भात एक काल्पनिक कथानक समोर आलं आहे. ते काल्पनिक कथानक म्हणजेच अयान मुखर्जी दिग्दर्शित "ब्रह्मास्त्र", ज्याचा पहिला भाग आहे "शिवा..."


एका ठिकाणी शिवा नावाच्या एका डी.जे.ला काही स्वप्न पडतात. त्यात त्याला काही आकृत्या, काही दुष्ट ताकदी, एक अस्त्र आणि एका घटनेची झलक दिसते. त्याचवेळी दुसरीकडे त्याच दुष्ट ताकदी समोर येतात आणि शिवाने पाहिलेली घटना सत्यात उतरताना दिसते. शिवाला असाच दृष्टांत पुन्हा होतो, ज्यात दोन व्यक्तींचा जीव धोक्यात असल्याचं त्याला समजतं. शिवाकडे स्वत:कडे एक शक्ती सूप्त स्वरूपात आहे हेही त्याला समजतं. शिवा आणि त्याची मैत्रीण ईशा, त्या दोन व्यक्तींना वाचवण्यासाठी आणि त्या दुष्ट ताकदींचा सामना करण्यासाठी सज्ज होतात. हा आहे या चित्रपटाचा पूर्वार्ध. उत्तरार्ध मात्र, शिवामधली शक्ती जागृत होते का... त्या दोन व्यक्ती वाचतात का... त्या दुष्ट ताकदींचं काय होतं... या प्रश्नांची उत्तरं देत शेवटापर्यंत जातो...

चित्रपटाचं कथानक बऱ्याच अंशी "टर्मिनेटर सीरीज", "स्टार वॉर्स सीरीज", "अवेंजर्स सीरीज", "हॅरी पॉटर सीरीज" या हॉलिवूडपटांची आणि "बाहुबली सीरीज" या दाक्षिणात्य भारतीय पटाची आठवण करून देतं. कथानक पूर्ण काल्पनिक आहे. कुठल्याही पौराणिक कथेशी अगर घटनेशी याचा संबंध निदान मला तरी जाणवला नाही. कथानकात अनेक कच्चे दुवे आहेत. जी घटना शिवाला दिसली, त्या घटनेचा उगम का झाला... ती घटना आत्ताच का घडली... ज्या माध्यमातून त्या दोन व्यक्ती समोर येतात, त्या माध्यमापर्यंत त्या दुष्ट ताकदी कशा पोहोचल्या... या प्रश्नांची उत्तरं संपूर्ण चित्रपटात कुठेच आढळली नाहीत. चित्रपटांच्या काही दृष्यांमध्येही कमकुवतपणा जाणवतो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती उंचावरून पडल्यावर एकतर ती मरेल किंवा त्या व्यक्तीचे हात-पाय तरी मोडतील. पण ईशावर चित्रित झालेल्या अशाच दृष्यात तसं काही होत नाही...

चित्रपटाचं संगीत प्रीतम यांनी दिलं आहे. मोजकी तीनच गाणी आहेत चित्रपटात. गाणी चांगलीच आहेत. "केसरिया तेरा इश्क़ है पिया..." हे गाणं तर चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच जबरदस्त लोकप्रिय झालं. चित्रपटात वेळोवेळी येणारी ही गाणी वेळ खाऊ तर आहेतच, पण उगाच लांबी वाढते चित्रपटाची. शिवाय ही गाणी धावत्या कथेला लगाम घालण्याचंही काम करतात. त्यामुळे प्रेक्षक कथेपासून थोडे विचलीत होऊ शकतात. गाणं संपता संपता पुन्हा एखादा प्रसंग येतो आणि प्रेक्षक कथेशी समरस होईपर्यंत तो प्रसंग निघून जातो. त्याउलट जर गाणी नसती चित्रपट आधिक प्रवाहशील वाटला असता. संगीताप्रमाणेच पार्श्वसंगीत आणि ध्वनी संयोजन यांचा चित्रपटात मोलाचा वाटा आहे. वेगवेगळी अस्त्र वापरली जात असताना येणारे आवाज, होणारे स्फोट, गोष्टींची होणारी तोडफोड, यांसाठी वापरलेले ध्वनी असो किंवा प्रसंगानुरूप येणारं पार्श्वसंगीत असो, प्रत्येक वेळी सायमन फ्रँग्लेन यांनी कमाल केली आहे...

ध्वनी, संगीत आणि पार्श्वसंगीताप्रमाणेच, चित्रपटात वापरलेले VFX तंत्रज्ञान आणि थरार व हाणामारीची दृष्य कमालीची परिणामकारक आहेत. अनेकांचं म्हणणं पडलं, की प्रकाश योजनेचा अती वापर केलेला दिसतो. पण ती कथेची गरज होती. वेगवेगळ्या अस्त्रांना वेगवेगळी प्रकाश किरणं देऊन समोर आणल्याने कुठलं अस्त्र कसं काम करत आहे हे चटकन लक्षात येतं. चित्रपटात काही अस्त्र अशी आहेत जी दोन्ही बाजूंनी, म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंनी वापरलेली दाखवली आहेत. अस्त्रांचा सकारात्मक वापर दाखवताना प्रकाश किरणं निळी किंवा शेंदरी असतात, तर अस्त्रांचा नकारात्मक वापर दर्शवताना तीच प्रकाश किरणं लाल रंगात समोर येतात. हा फरक बघण्यासारखा आहे. चित्रपटातली हाणामारीची दृष्य तर कमाल रंगली आहेत. शिवाय एकेक थरारक दृष्य तर 'edge of the seat' पठडीत मोडणारं आहे...

अशा प्रकारच्या चित्रपटात अदाकारीकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंबहुना अभिनय दाखवावा अशी काहीच दृष्य असतात. या चित्रपटातही तसंच झालं आहे. तरीही कलावंतांनी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय दिलेला दिसतो. अमिताभ बच्चन नेहमीप्रमाणे सहज अभिनय करताना दिसतात. संवादात काही दम नाही, पण अमिताभ बच्चन यांचे उच्चार त्याच संवादांना उभारी देतात. अनेक वर्षांनी अमिताभ बच्चन आणि डिंपल कपाडिया एकत्र आलेत, पण डिंपल कपाडिया यांची व्यक्तिरेखा चित्रपटात का होती याचं कारण समजलं नाही. मनमौजी शिवा ते गोंधळलेला शिवा आणि प्रेमात पडलेला शिवा ते दुष्ट ताकदींविरुद्ध लढायला सज्ज झालेला शिवा, हे फरक रणबीर कपूर यांनी खूपच सहज आणि सुरेख दर्शवले आहेत. आलिया भटनेही ईशा छान साकारली आहे. मुख्य म्हणजे बटबटीत मेकप न करता त्या चित्रपटभर छान दिसल्यात आहेत. हटके आणि अप्रतीम अदाकारी दिसते ती मौली रॉय यांची. चित्रपटात मातब्बर आणि लोकप्रिय कलावंतांची फौज असताना मौली रॉय यांनी त्यांच्या वाट्याला आलेली नकारात्मक भूमिका जबरदस्त वठवली आहे...

एकंदरीत, बिग बिजेटचा, अप्रतीम VFXने सजलेला अयान मुखर्जी कृत "ब्रह्मास्त्र" ज्याचा पहिला भाग "शिवा", बॉलीवूडला तारेल की बुडवेल ते नाही माहीत. पण सर्वांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा चित्रपट एकदा तरी थियेटरमध्येच पहावा आणि तोही चष्मे लावूनच...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 6 September 2022

डर्टी पण सूपर पिक्चर...

 सिल्क स्मिथा, डिस्को शांती, मेरिलीन मॉनरो, सन्नी लियोन, या नटींची वेगळी ओळख करून देण्याची फारशी गरज नसावी खरंतर. चित्रपटांमधून कामूक आणि उत्तेजक दृश्य देणाऱ्या या नट्यांचं वैयक्तिक आयुष्य किती उलथा-पालथीचं असतं, याचं दर्शन घडवणारा चित्रपट म्हणजेच २०११ साली प्रदर्शित झालेला, मिलन लुथरिया दिग्दर्शित "द डर्टी पिक्चर..."


रजत अरोरा यांनी लिहिलेली कथा बऱ्यापैकी प्रवाहशील आहे. चित्रपटाच्या नायिकेच्या म्हणजे रेशमाच्या आयुष्यातले चढ-उतार दाखवताना चित्रपट कुठेही रटाळ वाटत नाही. कथेसोबतच चित्रपटातली गाणी ही रजत अरोरा यांनीच लिहिली आहेत. मोजकी चारच गाणी चित्रपटात आहेत. "इश्क़ सुफ़ियाना..." आणि "उ ला ला उ ला ला..." ही गाणी वेगळ्या आवाजात दोनदा वापरली गेली आहेत. तशी सर्वच गाणी छान आहेत पण ही दोन गाणी आजही प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिली आहेत...

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे कलावंतांची निवड. नसीरुद्दीन शाह, इम्रान हाश्मी, तुषार कपूर, अंजू महेंद्रू, राजेश शर्मा असे मातब्बर कलावंत चित्रपटात दिसतात. नसीरुद्दीन शाह यांनी नेहमीप्रमाणेच सहज-सुंदर अदाकारी करून त्यांच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. पण विशेष उल्लेख करावा तर तो आहे इम्रान हाश्मी यांचा. मोठमोठी स्टार मंडळी समोर असतानाही आपल्या नेहमीच्या चित्रपटशैलीला बगल देताना इम्रान हाश्मी यांनी त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका छान वठवली आहे...

या सर्व कलाकारांना पार मागे टाकणारी जबरदस्त अदाकारी दाखवली आहे अभिनेत्री विद्या बालन यांनी. रेशमाचा बिन्धास्त अवतार, डोक्यात गेलेली प्रसिद्धीची नशा, सर्वस्व हरवल्यावर आलेली निराशा, असे वेगवेगळे भाव दाखवताना विद्या बालन यांनी कमालच केली आहे. इम्रान हाश्मीसोबतचा टेलिफोनचा सीन आणि नसीरुद्दीन शाहसोबतचा भर रस्त्यातल्या तमाशाचा सीन, हे दोन्ही सीन करताना विद्या बालन यांनी अदाकारीचा परमोच्च बिंदू गाठला आहे...

छोट्याशा गावात राहणारी रेशमा, चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवायची, हे स्वप्न उराशी बाळगून शहरात येते. मादक सौंदर्य लाभलेली रेशमा चित्रपटांमधून अनेक उत्तेजक दृश्य देत प्रकाशझोतात येते. पुढे सहकलावंतांसोबत जुळलेले रेशमाचे प्रेमसंबंध, प्रसिद्धीची नशा चढल्याने बदलत जाणारं तिचं वागणं, काहींसोबत झालेले तिचे वाद, या सगळ्यातून रेशमा बाहेर पडते का, हे जाणण्यासाठी "द डर्टी पिक्चर" नक्कीच पहावा...

@ अनिकेत परशुराम आपटे.