पाऊस... विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात येणारा थंडगार पाऊस... कधी पावसाचा आनंद होतो, तर कधी वैताग येतो. पण याच पावसाची भिती वाटली तर... हाच विषय आहे, २००५ साली प्रदर्शित झालेल्या अमोल शेटगे दिग्दर्शित "रेन" या चित्रपटाचा...
आंधळी संध्या भटनागर (मेघना नायडू), एक उत्तम लेखिका असून एकटीच राहत असते. तिला पावसाचा फोबिया म्हणजेच भिती असते. संध्याच्या लेखनाचा चाहता असलेला प्रकाश (हिमांशू मलिक) नावाचा एक पत्रकार तिची मुलाखत घ्यायला तिच्या घरी येतो. मुलाखती दर्म्यान प्रकाशला संध्याच्या फोबियाबद्दल समजतं...
संध्याच्या या फोबियाचा उगम तिच्या भूतकाळात दडलेला असतो, जेव्हा अविनाश नावाच्या एका इसमाने एका पावसाळी संध्याकाळी संध्याची शारीरिक विटंबना केली असते. हे समजल्यावर प्रकाश संध्याला मदतीचा हात देतो आणि अखेर प्रकाशमुळेच संध्या तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेते आणि पावसाच्या भितीदायक विळख्यातून बाहेर येते...
चित्रपटात मोजकेच कलावंत आहेत. चित्रपटाचा मुख्य घटक असलेल्या पावसाला दोन वेगळ्या पद्धतीने दखवलं गेलं आहे. संध्याच्या मनात आणि डोक्यात फोबियाने घर केलं असताना दाखवला गेलेला पाऊस रौद्र रुपाचा आणि भयावह वाटतो. पण आपल्या भितीचं कोंदण फोडून बाहेर पडलेली संध्या जेव्हा पावसात बागडते, तेव्हा तोच पाऊस आनंदी आणि आल्हाददायक वाटतो...
पावसाची दृष्य दाखवताना वापरलेले ध्वनी, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीत यांमुळे ती ती दृष्य चांगलीच परिणामकारक झाली आहेत. चित्रपटातल्या तीन वेगळ्या दृष्यात पावसाची तीन वेगळी रूपं दिसून येतात. संध्या तिच्याच घराबाहेर राहते आणि दार आतून बंद होतं. तेव्हा कोसळणारा पाऊस थरारक वाटतो. संध्याचा शारीरिक अपमान होत असताना येणारा पाऊस हा किळसवाणा भासतो. मानसिक आजारातून मुक्त झालेली संध्या तिच्याच घरातल्या अंगणात स्वच्छंदपणे नाचताना बरसणारा पाऊस हा तितकाच समाधानकारक वाटतो...
बी ग्रेड पठडीकडे झुकलेल्या या चित्रपटात बरीच कामुक दृष्य आहेत. तरीही, चित्रपटाच्या वेगळ्या विषयासाठी आणि पावसाच्या अप्रतीम दृष्यांसाठी अमोल शेटगे लिखीत "रेन" एकदातरी पहावाच...
@ अनिकेत परशुराम आपटे.
.jpeg)
No comments:
Post a Comment