Monday, 7 September 2020

मधाळ स्वरांची आशा...


‘पिया तू अब तो आ जा...’, ‘इन आँख़ों की मस्ती के...’, ‘दम मारो दम...’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’, ‘झुमका गिरा रे...’, ‘आओ हुज़ूर तुमको...’, ‘ऋतू हिरवा... ऋतू बरवा...’, 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...", "मलमली तारुण्य माझे...' ही, आणि अशी अनेक गाणी ऐकली की एकच नाव समोर येतं. ते म्हणजे आशा ताई. अर्थात, ख्यातनाम गायिका अशा भोसले यांचं. जेष्ठ रंगकर्मी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची मुलगी आणि लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांची बहिण असल्याने नाट्य, चित्रपट आणि संगीत अशा तीनही आघाड्यांवर अशाताईंचे लहानपणापासूनच शिक्षण सुरू होते. घरी मिळणाऱ्या या शिक्षणाचा अशाताईंनी पुरेपूर लाभ घेतला आणि आघाडीच्या गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या...

१९४३ साली प्रदर्शित झालेल्या, “माझं बाळ” या चित्रपटातल्या ‘चला चला नाव बाळा...’ या गाण्यासाठी पार्श्वगायन करून अशाताईंनी पदार्पण केले. पुढे येणारी सहा दशके अशाताईंनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर तरुण-तरुणींच्या मनात अढळ स्थान मिळवले. वयाच्या सोळाव्या वर्षी अशाताईंनी त्यांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि अशाताई माघारी परतल्या. १९८० साली अशाताईंनी प्रख्यात संगीतकार आणि गायक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला. अशाताईंना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवानंतर देखील त्यांनी पार्श्वगायन सोडले नाही...

“माझं बाळ” या मराठी चित्रपटाने पार्श्वगायनाला प्रारंभ करणाऱ्या अशाताईंनी १९४८ साली “चुनरिया” या चित्रपटातल्या ‘सावन आया...’ या गाण्याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९५० ते १९६० या दशकात गीता दत्त, शमशाद बेगम अशा दिग्गज गायिकांचं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य होतं. त्याकाळी अशाताईंनी सर्वाधिक गाणी गायली. त्यातली बहुतकरून गाणी दुय्यम चित्रपटांमधली होती. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या “C.I.D.” या चित्रपटातल्या ‘लेके पहला पहला प्यार...’ या गाण्याने अशाताईंना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर मागे वळून न बघता “नया दौर”, “गुमराह”, “वक़्त”, “हमराज़”, “तीसरी मंजील”, “कारवाँ”, “काश्मीर की कली” अशा एकाहून एक यशस्वी संगीतमय चित्रपटांमध्ये अशाताईंनी पार्श्वगायन केले...

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, हृदयनाथ मंगेशकर, आर. डी. बर्मन, ए. आर. रेहमान, जतीन-ललीत, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, राम-लक्ष्मण, सलील चौधरी अशा प्रसिद्ध संगीतकारांसोबत आशाताईंनी काम केलं. त्यांनी नुसती गाणी गायली नाहीत, तर आपल्या मधाळ आवाजाने त्यांनी ती गाणी अजरामर करून प्रेक्षकांच्या मनात कायमची रुजवली...


आज ८ सप्टेंबर. आशाताईंचा जन्मदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"और इस दिल में क्या रखा है...
तेरा ही प्यार छुपा रखा है...
चीर के देखे दिल मेरा तो...
तेरा ही नाम लिखा रखा है..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment