Tuesday, 22 September 2020

प्रेम एक व्हिलन...

“प्रेम नाम है मेरा... प्रेम चोपड़ा...” हा संवाद प्रेक्षकांच्या मुखी ज्यांनी अजरामर केला ते दिग्गज अभिनेते म्हणजेच प्रेम चोपड़ा. खलनायकी भूमिका करण्यात त्यांचा हात आजवर कोणीच धरू शकला नाही. ‘प्रेम चोपड़ा म्हणजे खलनायक आणि खलनायक म्हणजे प्रेम चोपड़ा’ असंच समीकरण त्या काळी प्रचंड गाजलं होतं...

खलनायक म्हणून १९६७ ते १९९५ हा काल गाजवणाऱ्या प्रेम चोपड़ा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक नायक म्हणून केली. “शहीद”, “हलचल”सारख्या मोजक्या चित्रपटांतून त्यांनी नायक व सहनायकाच्या भूमिका साकारल्या. असं जरी असलं, तरी गेली पन्नास वर्ष, प्रेम चोपड़ा हे खलनायक म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले...

“झुक गया आसमान”, “कटी पतंग”, “हरे रामा हरे कृष्णा”, “गहरी चाल”, “बेनाम”, “बैराग”, “त्रिशूल”, “क्रांती”, "काला पत्थर", हे आणि असे अनेक चित्रपट प्रेम साहेबांच्या नकारात्मक भूमिकांनी सजले व तूफान गाजले. खतरनाक व्हिलनच्या भूमिका साकारत असताना, "प्रैम दिवाने", "वाह! लाईफ हो तो ऐसी" अशा काही चित्रपटांमध्ये विनोदी खल भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या. "गहरी चाल" या चित्रपटातली प्रेम चोपड़ा यांनी साकारलेली 'मदन' ही व्यक्तिरेखा, माझ्यासाठी त्यांच्या इतर नकारात्मक भूमिकांमध्ये सरस होती...

नकारात्मक भूमिकांमध्ये प्रेम चोपड़ा टॉप व्हिलन्सच्या पंगतीत विराजमान होते हे जरी खरं असलं, तरी त्यांच्या वाटेला आलेल्या सकारात्मक भूमिकाही त्यांनी छान वठवल्या. त्यातही, चरित्र भूमिकांवर त्यांनी जास्त भर दिला. “तहलका”, “खिलाड़ी”, “प्रेमनाथ”, “गुप्त”, "रॉकेटसिंह - सेल्समन ऑफ द इयर"सारख्या बऱ्याच चित्रपटांमधून प्रेम चोपड़ा सकारात्मक भूमिका करताना दिसले. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या "शहीद" या चित्रपटातली, प्रेम चोपड़ा यांनी साकारलेली 'सुखदेव' ही व्यक्तिरेखा, त्यांनी निभावलेल्या इतर सकारात्मक भूमिकांमध्ये माझ्या दृष्टीने उजवी होती...

चित्रपटांमध्ये प्रेम चोपड़ा यांची देहबोली कशीही असली, शब्द कितीही तीक्ष्ण असले, तरी खऱ्या आयुष्यात मात्र प्रेम चोपड़ा हुळवार बोलणारे व नम्र होते. आज २३ सप्टेंबर. हिंदी चित्रपटसृष्टीतील या लाडक्या व लोकप्रिय खलनायकाचा जन्मदिवस. आजच्या दिवसानिमित्त प्रेम चोपड़ा साहेबांना मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment