बहुतकरून मारधाडपटांमध्ये काय असतं... कधी मुष्टीयुद्ध तर कधी तलवारयुद्ध, कधी बॉम्ब हल्ले तर कधी गोळ्यांची आतिषबाजी. अशी साहसदृष्य आली की आपण ती पाहतो, त्यांची मजा घेतो आणि विसरून जातो. पण सगळीच साहसदृष्य सारखी असतात का... तर नाही. जसा प्रत्येक दिग्दर्शकाचा किंवा लेखकाचा त्याचा एक वेगळेपणा असतो, तसंच साहस दृष्यांमध्येसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हा असतात. तसे हाणामारी दिग्दर्शक अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात हे हाणामारी दिग्दर्शक मला जरा वेगळे वाटले...
अब्बास अली मोघूल...
Raw action किंवा heavy weight free style action, या पठडीत अब्बास अली मोघूल यांनी दिग्दर्शित केलेली हाणामारी मोडते. बंदुकांचा किंवा स्फोटकांचा जास्त वापर न करता, हाता-पायांचा वापर करून ती दृष्य समोर यायची. एखाद्या साहसदृष्यात slow camera movements किंवा helicopter shots जास्त पहायला मिळाले...
अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॉन एब्राहीम ही मंडळी यांच्या शैलीला शोभून गेली. "लगान", "एलान (२००५)", "स्पेशल २६", "बेबी", "नाम शबाना", "आवारा पागल दिवाना" असे अनेक चित्रपट अब्बास अली मोघूल यांच्या हाणामारीच्या शैलीने नटले...
ऍलन अमीन...
Stylish action sequences असं ज्या साहस दृष्यांचं वर्णन करता येईल ते हाणामारी दिग्दर्शक म्हणजे ऍलन अमीन. धीम्या गतीची तरंगती साहसदृष्य, असही काही अंशी म्हणता येईल. Suspension cablesचा वापर करून कलाकारांना हवेतल्या हवेत गटांगळ्या खायला लावणे, हात व स्फोटकांपेक्षा बंदुका व पायांचा जास्त वापर करून घेणे, ही ऍलन अमीन यांनी दिग्दर्शित केलेल्या साहसदृष्यांची काही वैशिष्ठ्य...
अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, सन्नी देवल, झाएद खान हे कलाकार ऍलन अमीनच्या साहसदृष्यात जास्त जचले. "मिशन कश्मीर", "हिरो - लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय", "धूम", "धूम २", "दस", "नक्षा - अनलॉक द मिस्ट्री", अशा बऱ्याच चित्रपटांमधून ऍलन अमीन यांनी दिग्दर्शित केलेली साहसदृष्य समोर आली...
जयसिंह निज्जर...
विध्वंसक हाणामारी किंवा साहसदृष्य असलेल्या चित्रपटांच्या यादीत, जयसिंह निज्जर यांनी दिग्दर्शित केलेली साहसदृष्य असलेले चित्रपट अग्रस्थानी आहेत. थरारक पण धिम्या गतीची साहसदृष्य, मोठमोठ्या गाड्यांची जास्तीत जास्त नासधूस ही जयसिंह निज्जर यांच्या हाणामारीची वैशिष्ठ्य आहेत. त्यांनी दिलेल्या साहसदृष्यांमध्ये रोहित शेट्टीसोबतचे त्यांचे चित्रपट जास्त लक्षात राहिले...
अजय देवगण, अर्शद वारसीसारखे कलावंत, जयसिंह निज्जर यांच्या साहसदृष्यात शोभून दिसले. "खून भरी माँग", "फूल और काँटे", "जमीन", "बोलबच्चन", "गोलमाल सिरीज", "सिंघम सिरीज", "सिम्बा" हे चित्रपट जयसिंह निज्जर यांच्या साहसदृष्यांमुळे जास्त लोकप्रिय झाले...
प्रत्येक हाणामारी दिग्दर्शकाची आपली आपली एक शैली आहे. ती दृष्य पडद्यावर छान दिसतातही, पण या दृष्यात अधिक रंगत निर्माण होते ती वेळोवेळी वापरलेल्या प्रश्वसंगीतामुळे. "सिंघम" किंवा "बोलबच्चन"मध्ये एखादा टोला हाणल्यावर येणारा विशिष्ट आवाज असो किंवा "नक्षा" अथवा "धूम"मध्ये कलाकार हवेत उडताना येणारी एक वेगळी धुन असो. ठराविक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पार्श्वसंगीताच्या या तुकड्यांमुळे ती ती साहसदृष्य अधिक उठावदार होतात...
टीनू वर्मा, भिकू वर्मा, श्याम कौशल, पी.के., महेंद्र वर्मा, रवि दिवान, वीरू देवगण अशा अनेक मोठी नावांनी चित्रपटात हाणामारीची अप्रतीम दृष्य दिग्दर्शित केली आहेत, पण मला जरा हटके वाटणारी ही हाणामारीची त्रिमूर्ती...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment