Sunday, 27 September 2020

दीदी - एक सुरेल पर्व...


‘गान कोकिळा’ किंवा ‘गान सम्राज्ञी’ ही विशेषणे जेव्हा ऐकली जातात तेव्हा एकच नाव समोर येतं आणि ते आहे ख्यातनाम गायिका लता मंगेशकर यांचं. १९४२ साली सुरू झालेली लता मंगेशकर यांची कारकीर्द तब्बल सहा दशकांहून अधिक काळ टिकली. हिंदी आणि मराठी याखेरीज अनेक प्रादेशिक भाषांमधून लतादीदी यांनी गायन केलं आहे...

१९४२ साली “किती हसाल” या चित्रपटासाठी लतादीदी यांनी प्रथम गायन केले. ‘नाचुया गडे... खेळू सारी मनी हौस भारी...’ हे त्यांचे पहिले गाणे होते. हे गाणे चित्रपटातून वगळण्यात आले. पण त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या “पहिली मंगळागौर” या चित्रपटातले ‘नटली चैत्राची नवलाई...’ हे गाणे लतादीदी यांनी गायले आणि तिथून त्यांच्या सुवर्ण कारकिर्दीला प्रारंभ झाला...

१९४९ साली प्रदर्शित झालेल्या “महल” या चित्रपटातले ‘आयेगा आनेवाला...’ हे गाणे लतादीदींसाठी मैलाचा खडक ठरले. पुढे अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसाठी ‘लाग जा गले के फिर से...’, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम...’, ‘गाता राहे मेरा दिल...’, ‘यह समा... समा है यह प्यार का...’, ‘तू जहाँ जहाँ चलेगा...’, ‘दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे...’ अशी एकापेक्षा एक सरस आणि श्रवणीय गाणी लतादीदी यांनी गायली...

१९६०च्या दशकात त्या निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीच्या आघाडीच्या गायिका बनल्या. त्या काळातल्या जवळ-जवळ सर्व संगीतकारांसोबत लतादीदींनी गायन केले आणि त्यातली बहुतेक सर्व गाणी अजरामर ठरली. एक पार्श्वगायिका म्हणून हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून लता मंगेशकर अतिशय लोकप्रिय होत्या. पण त्याचबरोबर एक संगीत दिग्दर्शिका म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली. ‘आनंदघन’ या टोपणनावाने लतादीदी यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले होते...

‘आनंदघन’ म्हणून लतादीदी यांनी संगीतबद्ध केलेली ‘अखेरचा हा तुला दंडवत...’, ‘ऐरणीच्या देवा तुला...’, ‘डौल मोराच्या मानाचा...’, ‘मराठी पाऊल पडते पुढे...’, ‘बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला...’, ‘रेशमाच्या रेघांनी...’, ‘राजाच्या रंगम्हाली...’, ‘माळ्याच्या मळ्यामंदी...’, ‘नाव सांग सांग सांग...’ अशी एकापेक्षा एक सुरेल गाणी त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली...

आज २८ सप्टेंबर. नुसत्या भारतात नव्हे, तर जगभरात 'गानकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लतादीदींचा आज वाढदिवस. १९२९ साली याच दिवशी एका सुरेल पर्वाची नांदी झाली. सप्तसुरांची तलवार ज्यांनी कायमची आपल्या काळजात रुतवली, त्या गानकोकिळा लतादीदींना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

सुरांच्या वृक्षासोबत...
फुलली ही वल्लरी...
स्वरांचे घाव बसले आणि...
झाली घायाळ दुनिया सारी...

सूर-स्वरांचा हा अनमोल ठेवा...
असाच कायम राहो हीच इच्छा...
आजच्या सुरेल दिनाच्या...
लातीदीदींना भरभरून शुभेच्छा...

"माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे... माझे गाणे..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 22 September 2020

प्रेम एक व्हिलन...

“प्रेम नाम है मेरा... प्रेम चोपड़ा...” हा संवाद प्रेक्षकांच्या मुखी ज्यांनी अजरामर केला ते दिग्गज अभिनेते म्हणजेच प्रेम चोपड़ा. खलनायकी भूमिका करण्यात त्यांचा हात आजवर कोणीच धरू शकला नाही. ‘प्रेम चोपड़ा म्हणजे खलनायक आणि खलनायक म्हणजे प्रेम चोपड़ा’ असंच समीकरण त्या काळी प्रचंड गाजलं होतं...

खलनायक म्हणून १९६७ ते १९९५ हा काल गाजवणाऱ्या प्रेम चोपड़ा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक नायक म्हणून केली. “शहीद”, “हलचल”सारख्या मोजक्या चित्रपटांतून त्यांनी नायक व सहनायकाच्या भूमिका साकारल्या. असं जरी असलं, तरी गेली पन्नास वर्ष, प्रेम चोपड़ा हे खलनायक म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले...

“झुक गया आसमान”, “कटी पतंग”, “हरे रामा हरे कृष्णा”, “गहरी चाल”, “बेनाम”, “बैराग”, “त्रिशूल”, “क्रांती”, "काला पत्थर", हे आणि असे अनेक चित्रपट प्रेम साहेबांच्या नकारात्मक भूमिकांनी सजले व तूफान गाजले. खतरनाक व्हिलनच्या भूमिका साकारत असताना, "प्रैम दिवाने", "वाह! लाईफ हो तो ऐसी" अशा काही चित्रपटांमध्ये विनोदी खल भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या. "गहरी चाल" या चित्रपटातली प्रेम चोपड़ा यांनी साकारलेली 'मदन' ही व्यक्तिरेखा, माझ्यासाठी त्यांच्या इतर नकारात्मक भूमिकांमध्ये सरस होती...

नकारात्मक भूमिकांमध्ये प्रेम चोपड़ा टॉप व्हिलन्सच्या पंगतीत विराजमान होते हे जरी खरं असलं, तरी त्यांच्या वाटेला आलेल्या सकारात्मक भूमिकाही त्यांनी छान वठवल्या. त्यातही, चरित्र भूमिकांवर त्यांनी जास्त भर दिला. “तहलका”, “खिलाड़ी”, “प्रेमनाथ”, “गुप्त”, "रॉकेटसिंह - सेल्समन ऑफ द इयर"सारख्या बऱ्याच चित्रपटांमधून प्रेम चोपड़ा सकारात्मक भूमिका करताना दिसले. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या "शहीद" या चित्रपटातली, प्रेम चोपड़ा यांनी साकारलेली 'सुखदेव' ही व्यक्तिरेखा, त्यांनी निभावलेल्या इतर सकारात्मक भूमिकांमध्ये माझ्या दृष्टीने उजवी होती...

चित्रपटांमध्ये प्रेम चोपड़ा यांची देहबोली कशीही असली, शब्द कितीही तीक्ष्ण असले, तरी खऱ्या आयुष्यात मात्र प्रेम चोपड़ा हुळवार बोलणारे व नम्र होते. आज २३ सप्टेंबर. हिंदी चित्रपटसृष्टीतील या लाडक्या व लोकप्रिय खलनायकाचा जन्मदिवस. आजच्या दिवसानिमित्त प्रेम चोपड़ा साहेबांना मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 16 September 2020

हाणामारीची त्रिमूर्ती...

बहुतकरून मारधाडपटांमध्ये काय असतं... कधी मुष्टीयुद्ध तर कधी तलवारयुद्ध, कधी बॉम्ब हल्ले तर कधी गोळ्यांची आतिषबाजी. अशी साहसदृष्य आली की आपण ती पाहतो, त्यांची मजा घेतो आणि विसरून जातो. पण सगळीच साहसदृष्य सारखी असतात का... तर नाही. जसा प्रत्येक दिग्दर्शकाचा किंवा लेखकाचा त्याचा एक वेगळेपणा असतो, तसंच साहस दृष्यांमध्येसुद्धा वेगवेगळ्या तऱ्हा असतात. तसे हाणामारी दिग्दर्शक अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात हे हाणामारी दिग्दर्शक मला जरा वेगळे वाटले...

अब्बास अली मोघूल...

Raw action किंवा heavy weight free style action, या पठडीत अब्बास अली मोघूल यांनी दिग्दर्शित केलेली हाणामारी मोडते. बंदुकांचा किंवा स्फोटकांचा जास्त वापर न करता, हाता-पायांचा वापर करून ती दृष्य समोर यायची. एखाद्या साहसदृष्यात slow camera movements किंवा helicopter shots जास्त पहायला मिळाले...

अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॉन एब्राहीम ही मंडळी यांच्या शैलीला शोभून गेली. "लगान", "एलान (२००५)", "स्पेशल २६", "बेबी", "नाम शबाना", "आवारा पागल दिवाना" असे अनेक चित्रपट अब्बास अली मोघूल यांच्या हाणामारीच्या शैलीने नटले...

ऍलन अमीन...

Stylish action sequences असं ज्या साहस दृष्यांचं वर्णन करता येईल ते हाणामारी दिग्दर्शक म्हणजे ऍलन अमीन. धीम्या गतीची तरंगती साहसदृष्य, असही काही अंशी म्हणता येईल. Suspension cablesचा वापर करून कलाकारांना हवेतल्या हवेत गटांगळ्या खायला लावणे, हात व स्फोटकांपेक्षा बंदुका व पायांचा जास्त वापर करून घेणे, ही ऍलन अमीन यांनी दिग्दर्शित केलेल्या साहसदृष्यांची काही वैशिष्ठ्य...

अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, सन्नी देवल, झाएद खान हे कलाकार ऍलन अमीनच्या साहसदृष्यात जास्त जचले. "मिशन कश्मीर", "हिरो - लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय", "धूम", "धूम २", "दस", "नक्षा - अनलॉक द मिस्ट्री", अशा बऱ्याच चित्रपटांमधून ऍलन अमीन यांनी दिग्दर्शित केलेली साहसदृष्य समोर आली...

जयसिंह निज्जर...

विध्वंसक हाणामारी किंवा साहसदृष्य असलेल्या चित्रपटांच्या यादीत, जयसिंह निज्जर यांनी दिग्दर्शित केलेली साहसदृष्य असलेले चित्रपट अग्रस्थानी आहेत. थरारक पण धिम्या गतीची साहसदृष्य, मोठमोठ्या गाड्यांची जास्तीत जास्त नासधूस ही जयसिंह निज्जर यांच्या हाणामारीची वैशिष्ठ्य आहेत. त्यांनी दिलेल्या साहसदृष्यांमध्ये रोहित शेट्टीसोबतचे त्यांचे चित्रपट जास्त लक्षात राहिले...

अजय देवगण, अर्शद वारसीसारखे कलावंत, जयसिंह निज्जर यांच्या साहसदृष्यात शोभून दिसले. "खून भरी माँग", "फूल और काँटे", "जमीन", "बोलबच्चन", "गोलमाल सिरीज", "सिंघम सिरीज", "सिम्बा" हे चित्रपट जयसिंह निज्जर यांच्या साहसदृष्यांमुळे जास्त लोकप्रिय झाले...

प्रत्येक हाणामारी दिग्दर्शकाची आपली आपली एक शैली आहे. ती दृष्य पडद्यावर छान दिसतातही, पण या दृष्यात अधिक रंगत निर्माण होते ती वेळोवेळी वापरलेल्या प्रश्वसंगीतामुळे. "सिंघम" किंवा "बोलबच्चन"मध्ये एखादा टोला हाणल्यावर येणारा विशिष्ट आवाज असो किंवा "नक्षा" अथवा "धूम"मध्ये कलाकार हवेत उडताना येणारी एक वेगळी धुन असो. ठराविक ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या पार्श्वसंगीताच्या या तुकड्यांमुळे ती ती साहसदृष्य अधिक उठावदार होतात...

टीनू वर्मा, भिकू वर्मा, श्याम कौशल, पी.के., महेंद्र वर्मा, रवि दिवान, वीरू देवगण अशा अनेक मोठी नावांनी चित्रपटात हाणामारीची अप्रतीम दृष्य दिग्दर्शित केली आहेत, पण मला जरा हटके वाटणारी ही हाणामारीची त्रिमूर्ती...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 7 September 2020

मधाळ स्वरांची आशा...


‘पिया तू अब तो आ जा...’, ‘इन आँख़ों की मस्ती के...’, ‘दम मारो दम...’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’, ‘झुमका गिरा रे...’, ‘आओ हुज़ूर तुमको...’, ‘ऋतू हिरवा... ऋतू बरवा...’, 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...", "मलमली तारुण्य माझे...' ही, आणि अशी अनेक गाणी ऐकली की एकच नाव समोर येतं. ते म्हणजे आशा ताई. अर्थात, ख्यातनाम गायिका अशा भोसले यांचं. जेष्ठ रंगकर्मी मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची मुलगी आणि लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांची बहिण असल्याने नाट्य, चित्रपट आणि संगीत अशा तीनही आघाड्यांवर अशाताईंचे लहानपणापासूनच शिक्षण सुरू होते. घरी मिळणाऱ्या या शिक्षणाचा अशाताईंनी पुरेपूर लाभ घेतला आणि आघाडीच्या गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या...

१९४३ साली प्रदर्शित झालेल्या, “माझं बाळ” या चित्रपटातल्या ‘चला चला नाव बाळा...’ या गाण्यासाठी पार्श्वगायन करून अशाताईंनी पदार्पण केले. पुढे येणारी सहा दशके अशाताईंनी त्यांच्या आवाजाच्या जोरावर तरुण-तरुणींच्या मनात अढळ स्थान मिळवले. वयाच्या सोळाव्या वर्षी अशाताईंनी त्यांचे सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि अशाताई माघारी परतल्या. १९८० साली अशाताईंनी प्रख्यात संगीतकार आणि गायक आर. डी. बर्मन यांच्याशी विवाह केला. अशाताईंना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवानंतर देखील त्यांनी पार्श्वगायन सोडले नाही...

“माझं बाळ” या मराठी चित्रपटाने पार्श्वगायनाला प्रारंभ करणाऱ्या अशाताईंनी १९४८ साली “चुनरिया” या चित्रपटातल्या ‘सावन आया...’ या गाण्याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९५० ते १९६० या दशकात गीता दत्त, शमशाद बेगम अशा दिग्गज गायिकांचं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य होतं. त्याकाळी अशाताईंनी सर्वाधिक गाणी गायली. त्यातली बहुतकरून गाणी दुय्यम चित्रपटांमधली होती. १९५६ साली प्रदर्शित झालेल्या “C.I.D.” या चित्रपटातल्या ‘लेके पहला पहला प्यार...’ या गाण्याने अशाताईंना प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर मागे वळून न बघता “नया दौर”, “गुमराह”, “वक़्त”, “हमराज़”, “तीसरी मंजील”, “कारवाँ”, “काश्मीर की कली” अशा एकाहून एक यशस्वी संगीतमय चित्रपटांमध्ये अशाताईंनी पार्श्वगायन केले...

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत, हृदयनाथ मंगेशकर, आर. डी. बर्मन, ए. आर. रेहमान, जतीन-ललीत, कल्याणजी-आनंदजी, राजेश रोशन, राम-लक्ष्मण, सलील चौधरी अशा प्रसिद्ध संगीतकारांसोबत आशाताईंनी काम केलं. त्यांनी नुसती गाणी गायली नाहीत, तर आपल्या मधाळ आवाजाने त्यांनी ती गाणी अजरामर करून प्रेक्षकांच्या मनात कायमची रुजवली...


आज ८ सप्टेंबर. आशाताईंचा जन्मदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

"और इस दिल में क्या रखा है...
तेरा ही प्यार छुपा रखा है...
चीर के देखे दिल मेरा तो...
तेरा ही नाम लिखा रखा है..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 5 September 2020

विनोदी खलनायक...

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत 'खलनायक' किंवा 'व्हिलन' हे शब्द ऐकले, की वेगवेगळे पोषाख परिधान केलेल्या, चेहेऱ्यावर चिडलेले घमेंडखोर भाव असलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येतात. आधीच्या जमान्यात अजित खान, अमजद खान, जीवन, प्रेम चोप्रा, मदन पुरी, प्राण, निळू फुले ही मंडळी असायची. अलिकडच्या काळात दिपक शिर्के, राहुल सोलापूरकर, सदाशिव आमरापूरकर, अमरीश पुरी, डॅनी डेंग्झाँग्पा, शक्ति कपूर, किरण कुमार, रणजीत या मंडळींनी 'खलनायक' या व्यक्तिरेखेला एक ओळख मिळवून दिली. व्हिलन म्हणजे खतरनाक, विध्वंसक, अशीच व्याख्या होती. पण काही चित्रपटांमध्ये मात्र काही कलावंतांनी व्हिलनगिरीसोबत चित्रपटातला विनोदी बाजदेखील चोख सांभाळला...

क्राईम मास्टर गोगो - अंदाज़ अपना अपना...

"हु...आऽऽऽऽ... मैं क्राईम मास्टर गोगो | मोगँबो का भतिजा | हु...आऽऽऽऽ..." हा संवाद आहे "अंदाज़ अपना अपना" चित्रपटातील क्राईम मास्टर गोगो या व्यक्तिरेखेचा. जवळ जवळ सूपरमॅनच्या पोषाखासारखे दिसणारे लाल-काळे कपडे घालणारी, वेडे-वाकडे हावभाव करत नाचणारी ही भूमिका, अभिनेते शक्ति कपूर यांनी सुंदर वठवली होती. आमीर खान-सलमान खान असूनही चित्रपटात क्राईम मास्टर गोगोबद्दलच्या दोन गोष्टी चांगल्याच लक्षात राहिल्या. पहिली म्हणजे प्रेम आणि गोगोचं, जराही स्पर्श न करता कमालीचं रंगलेलं द्वंद्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोगोच्या मुखातले, "ठाक्किटिकी ठक्किटिकी ठाक्किटिकी ठाक..." हे शब्द. आजही बऱ्याच ठिकाणी बरेच जण हा शब्दप्रयोग करताना आढळतात...

रब्बरसिंह - धुमधडाका...

"शोले" चित्रपटातल्या 'गब्बरसिंह' या सूप्रसिद्ध व्यक्तिरेखेवर बेतलेलं आणि "धुमधडाका" या चित्रपटाच्या अगदी शेवटच्या पाच-दहा मिनिटांसाठी येणारं 'रब्बरसिंह' हे पात्र रंगवलं होतं बिपीन वर्टी या कलावंताने. मोठेमोठे डोळे करून बघणारा आणि रबराला बॉल बांधलेल्या खेळण्याशी खेळणारा हा रब्बरसिंह मजेशीर वठला होता. त्या व्यक्तिरेखेचं बेंबीच्या डेठापासून ओरडणं भितीदायक वाटत नसलं तरी विनोदी नक्कीच होतं. एका कुख्यात दरोडेखोराच्या हाती शस्त्राच्या ऐवजी खेळणं दिसलं तेव्हा जरा विचित्रच वाटलं होतं, पण ते खेळणंच खरंतर खलनायकाची वेगळी छाप पाडायला मोलाचं ठरलं...

जोरावर - बड़े मियाँ छोटे मियाँ...

एका मोठ्या गोडाऊनमध्ये मूर्त्या बनवणारा, तस्करी करणारा आणि पोलिसांना जाम टरकणारा पण तरी त्यांच्यावर कुरघोडी करणारा असा मजेशीर खलनायक जोरावर, अभिनेते परेश रावल यांनी साकारला तो "बड़े मियाँ छोटे मियाँ" या चित्रपटात. होमवर्क न केलेल्या विद्यार्थ्यासमोर शिक्षक आल्यावर त्या विद्यार्थ्याच्या चेहेऱ्यावर जसे भाव येतील, अगदी तसेच भाव 'पोलीस' हा शब्द ऐकल्यावर जोरावरचे दिसून आले. कधी कंबरदुखी तर कधी पाठदुखी, कधी सांधेदुखी तर कधी गुडघेदुखी, अशा शरीरातील निरनिराळ्या अवयवांची दुखणी घेऊन चित्रपटात वावरणारा जोरावर, संवाद तशाच पद्धतीने म्हणायचा आणि वेळेप्रसंगी नाचूनही दाखवायचा तेव्हा हशा पिकल्याशिवाय राहत नव्हता...

बबली भाय आणि पप्पी भाय - गोलमाल सिरीज...


रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमधून आलेले चारही चित्रपट धमाल विनोदी होते. त्यातल्या गोलमाल १ व गोलमाल ३ या चित्रपटांमधील खलनायक आजही हसवून हसवून प्रेक्षकांच्या पोटात मुरडा आणतात. कमी ऐकणारा, चुकीचं इंग्रजी बोलणारा, गोंधळलेला बबली भाय "गोलमाल १" या चित्रपटात साकारला होता संजय मिश्रा यांनी तर गोलमाल ३मधील भडक रंगबिरंगी कपडे परिधान करणारा, सतत स्मृतीभ्रंश होणारा आणि त्यामुळे वेगळेच संवाद वापरणारा पप्पी भाय समोर आला तो जॉनी लिव्हरमुळे. गोलमाल १ आणि गोलमाल ३मध्ये चार ते पाच मुख्य कलावंत किंवा नायक होते, पण बबली भाय व पप्पी भाय या व्यक्तिरेखांनी दिलेल्या अफलातून comic timingमुळे त्यांच्या भूमिका मुख्य नायकांपेक्षाही वरचढ झाल्या...

अप्पा डँबिस - जबरदस्त...

"दे दणादण"मधला झगड्या रामोशी, "थरथराट"मधला टकलू हैवान, "धडाकेबाज"मधला कवट्या महाकाळ, हे भारदस्त खलनायक प्रेक्षकांचं मनोरंजन करून गेल्यावर "जबरदस्त" या चित्रपटातला, थोडासा वेगळा वाटणारा अप्पा डँबीस हा खलनायक, अभिनेते भरत जाधव यांनी साकारला. तोंडाला कसलासा मास्क लावणारा, वेगवेगळे हावभाव करणारा, एका मजेशीर तालावर चालणारा आणि एकही शब्द न बोलणारा हा अप्पा डँबीसच खरंतर संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेला. मकरंद अनासपुरे व सिद्धार्थ जाधवसारखे कलावंत असूनही दात पुढे असलेला आणि पोट हलवत चालणारा भरत जाधव यांनी साकारलेला अप्पा डँबीस प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला...

या सर्व कलावंतांनी आणि त्या त्या व्यक्तिरेखा लिहिणाऱ्या लेखकांनी 'व्हिलन' किंवा 'खलनायक' या साचेबद्ध व्यक्तिरेखेला तिच्या कोंदणाबाहेर नेत एक वेगळं रूप दिलं. शिवाय नकारात्मक भूमिकाही विनोदी स्वरूपात दिसू शकतात, हेही दाखवून दिलं...

@ अनिकेत परशुराम आपटे.