"कशासाठी जागेसाठी... जागेवरच्या ताब्यासाठी..." याच एका ओळीवर बेतला आहे, २००६ साली प्रदर्शित झालेला दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित, "खोसला का घोसला" हा चित्रपट...
कमलकिशोर खोसला (अनुपम खेर) दिल्लीमधील एक मध्यमवर्गीय निवृत्त व्यक्ती. पत्नी सुधा (किरण जुनेजा), दोन मुलं, बलवंत ऊर्फ बंटी (रणवीर शौरी), चिरोंजीलाल ऊर्फ चेरी (प्रवीण डब्बास) आणि मुलगी निक्की (रुपम बाजवा), इतकाच काय तो परिवार. आपल्या मालकीचं घर असावं, सर्वांसाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात, हे सर्वसामान्य स्वप्न उराशी बाळगून, विजेंदर (राजेंद्र सेठी) या दलालामार्फत कमलकिशोर जागेचा व्यवहार करतात. आता आपलं मोठं घर होणार याच विचारात असतानाच किशन खुराना (बोमन इराणी) नावाचा एक माणूस जागेवर त्याचा मालकी हक्क सांगतो आणि कमलकिशोरांच्या पायाखालची जमीन सरकते...
जागा परत मिळवण्याच्या धडपडीला सुरुवात होते. पोलीस, मानवाधिकार संघटना, राजकारणी, कोणाचीच मदत होत नाही हे पाहून कमलकिशोर हवालदिल होतात. तेव्हा बंटी काही पहिलवानांना हाताशी धरून जागा मिळवण्याचा प्रयत्न करतो खरा, पण त्यात कमलकिशोर स्वत: अडकून खोट्या आरोपाखाली तुरूंगात जातात. अखेर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे दाखवत मेघना (तारा शर्मा), आसीफ़ इक़्बाल (विनय पाठक), बापू (नवीन निश्चल) आणि मणी (नितेश पांडे), या साथिदारांसह चेरी सापळा रचतो आणि खुरानाला त्यात अडकवून आपली जमीन परत मिळवतो...
कथानक साधंच असलं तरी त्यात येणाऱ्या छोट्या छोट्या उपकथानकांमुळे आणि रंजक वळणांमुळे चित्रपट अधिक पकड घेत जातो. चित्रपटात फारशी गाणी नसून जी आहेत ती कथेला पुढे नेण्याचं काम करतात. हाणामारीची दृश्य, आयटम साँग्स, दमदार नायक, ग्लॅमरस नायिका, असं काही नसतानाही चित्रपट उत्कंठावर्धक वाटतो. सर्वच कलावंतांच्या साध्या सरळ अभिनयामुळे चित्रपट वेगळ्याच ऊंचीवर पोहोचतो. विशेषत: शांत स्वभावाचे कमलकिशोर खोसला साकारणारे अनुपम खेर आणि लबाड व कावेबाज किशन खुराना आपल्या समोर आणणारे बोमन इराणी यांच्या अभिनयाची जुगलबंदी तर कमाल आहे. जयदीप सहानी यांच्या साचेबद्ध लेखनामुळे विषयाची चोख मांडणीही झालेली दिसते....
एकंदरीत, वेगळा विषय हाताळणारा, हलका-फुलका चित्रपट, "खोसला का घोसला", आवर्जून पहावा असाच आहे...

No comments:
Post a Comment