Monday, 27 April 2020

विकी वेलिंगकर...

"वेळेचं महत्व, वेळ गेल्यावरच समजतं..." हीच tagline आहे सौरभ वर्मा दिग्दर्शित 'विकी वेलिंगकर' या थरारपटाची...

सृष्टी नावाच्या मुलीचा, तिच्या राहत्या घरात, गोळी लागून मृत्यू होतो. सृष्टीने आत्महत्या केली आहे असं इंस्पेक्टर साळुंखे (केतन सिंह) सांगतात. पण सृष्टीच्या दोन मैत्रिणींना, विकी वेलिंगकर (सोनाली कुलकर्णी) आणि विद्याला (स्पृहा जोशी) वाटत असतं, की सृष्टीचा खून झाला आहे. शिवाय तपासात असं समजतं की सृष्टीचा लॅपटॉप गायब आहे. त्याच वेळी विकीच्या मित्राचा, लकीचा (संग्राम समेळ) फोन येतो. त्याच्याकडे एक महत्वाची माहिती असते...

विकी आणि लकी, एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीत भेटतात. ते बोलतच असतात की एक अज्ञात मास्कधारी माणूस, गोळ्या झाडून दोघांची हत्या करतो. बरोब्बर त्याच क्षणी स्वत:च्या घरात बसल्या बसल्या झोपलेली विकी खडबडून जागी होते. हा भास होता, की खरंच आपल्याला गोळी मारली गेली... या गोंधळात सापडलेली विकी, हीच घटना परत परत अनुभवते. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या माणसांच्या सानिध्यात विकीला गोळी लागत राहते आणि दुसऱ्याच क्षणी ती आपल्या घरात जागी होत राहते...

या सर्व घटनाक्रमात दोन गोष्टी कायम असतात. एक म्हणजे विकीचा खून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मास्क लावलेला तिचा मारेकरी. संपूर्ण चित्रपटभर हाच घटनाक्रम वेगाने घडत राहतो. Twist in the taleसारखा येणारा चित्रपटाच्या शेवटच्या दहा मिनिटांचा कथाभागमात्र कथानक वेगळ्याच वळणावर नेऊन संपवतो. विकी वेलिंगकर या मध्यवर्ती भूमिकेला सोनाली कुलकर्णी यांनी बऱ्यापैकी न्याय दिला आहे. त्यासोबतच संग्राम समेळ, स्पृहा जोशी, केतन सिंह, गौरव मोरे व रमा जोशी या कलावंतानीही त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखा छान वठवल्या आहेत. एकही गाणं नसल्याने चित्रपटाचा वेग कुठेही कमी होत नाही...

सृष्टीचा खून झाला, की तिने खरंच आत्महत्या केली... कोण आहे तो मास्क घातलेला बंदूकधारी...? तो विकीला का मारतो...? जर विकीचा खून होतो, तर ती जिवंत कशी...? सृष्टीच्या मृत्यूचा विकीशी काही संबंध आहे का...? वेळेच्या सापळ्यात अडकलेल्या या गूढ प्रश्नांची उत्तरं हवी असतील, तर नक्कीच पहावा, सौरभ वर्मा दिग्दर्शित "विकी वेलिंगकर..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment