Monday, 27 April 2020

मुग़ल-ए-आज़म...

"बाख़ुदा, हम मुहब्बत के दुश्मन नहीं... बल्की अपने उसूलों के ग़ुलाम हैं...|" पृथ्वीराज कपूर यांच्या बुलंद आवाजातला हा संवाद कानावर पडला, की आठवतो, हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरलेला के. आसीफ़ दिग्दर्शित 'मुग़ल-ए-आज़म...'

शहनशाह जलालूद्दीन मुहम्मद अक़बर (पृथ्वीराज कपूर) यांच्या ऐतिहासिक कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर साहेब-ए-आलम शहज़ादा सलीम (दिलीप कुमार) आणि त्याची प्रेयसी नादिरा म्हणजेच क़नीस अनारकली (मधुबाला) यांची प्रेम कहाणी अतिशय सुंदर पद्धतीने बहरत जाते. दिग्गज संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या, "तेरी महफ़िल में क़िस्मत आज़माकर हम भी देखेंगे...", "मोरे पनघट पे नंदलाल छेड़ गयो रे...", "प्यार किया तो ड़रना क्या..." अशा एकाहून एक सरस गाण्यांनी कथेवर सुवर्णकळस चढवला...

शहनशाह अक़बर पुत्रप्राप्तीसाठी दुवा मागायला जातात, तिथून कथेला सुरुवात होते. बोला-फुलाला गाठ पडते आणि महाराणी जोधाच्या (दुर्गा खोटे) पोटी सलीमचा जन्म होतो. त्याच्या जन्माची खबर घेऊन येणाऱ्या दासीला, "तुझी कोणतीही इच्छा मी पूर्ण करेन..." असं वचन अक़बर देतात. दारू, बायका यांच्या सानिध्यात सलीम वाया जातोय हे लक्षात येताच अक़बर त्याला दूरदेशी पाठवतात. विद्या ग्रहण करत, लढाया जिंकत मोठा झालेला सलीम घरी परततो. त्याच्या स्वागतासाठी एक मूर्तीकार एका मुलीचं शिल्प घडवत असतो पण ते वेळेत पूर्ण होत नाही म्हणून नादिरा नावाची एक दासी स्वत: तिथे उभी राहते. याबद्दल अक़बर तिला अनारकली ही पदवी बहाल करतात...

सलीम हळुहळू अनारकलीकडे आकर्षित होत जातो आणि त्यांच्यातलं प्रेम फुलत जातं. सलीम आणि अनारकली यांच्यात जन्माला आलेलं प्रेम अक़बर यांना मंजूर नसतं. ते अनारकलीला कैद करवतात. सलीम बंड करतो. अनारकलीसाठी आपल्याच वडिलांशी युद्ध करतो. त्यात सलीमचा पराजय होतो. सलीमच्या जन्माच्यावेळी दिलेल्या वचनाचं पालन करत दासीची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी अक़बर अनारकलीला जीवनदान देतात पण एक कामगिरी तिच्यावर सोपवतात. अक़बरच्या आज्ञेनुसार सलीमला बेशुद्ध करून अनारकली त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाते...

भव्य-दिव्य सेट्स, अप्रतीम संगीत व पार्श्वसंगीत, नेत्रदीपक नृत्याविष्कार आणि सर्व कलावंतांची सहज सुंदर अदाकारी या सर्वांमुळे "मुग़ल-ए-आज़म" उजवा ठरतो. आर्थिक-तांत्रिक गरजा, कलावंतांची जमवा-जमव, अशा अनेक अडचणींवर मात करून निर्माण झालेल्या या चित्रपटाने पुढे अनेक विक्रम मोडीत काढले...

एकंदरीत के. आसीफ़ दिग्दर्शित मुग़ल-ए-आज़म, हिंदी चित्रपट इतिहासातली एक अजरामर कलाकृती आहे असे म्हणायला हवे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

No comments:

Post a Comment