"मौका मिलेगा तो गोली चला देना... सोचना मत... मैं नहीं सोचूँगा...", "आप किसी और तक पहुँचें उससे पहले मैं आप तक पहुचूँगा..." हे संवाद आहेत 'Super Action Thriller' समजल्या जाणाऱ्या सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "वॉर" या बहुचर्चित चित्रपटातले...
चित्रपट सुरू होतो intelligence chief व्ही.के. नायडू यांच्या खुनाने. हा खून कबीर सिंह (हृतिक रोशन) या एकेकाळच्या RAW एजंट आणि आत्ताच्या गद्दाराने केला आहे हे सर्वांनाच माहित असतं. कबीरला पकडून, दोन वर्षांपूर्वी कट्टर देशभक्त असताना तो अचानक देशद्रोही कसा व का झाला हे जाणण्याची कामगिरी कबीरच्याच सावलीत तयार झालेल्या ख़ालीद (टायगर श्रॉफ) या एजंटवर सोपवली जाते...
दरम्यान, भारतात मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अजून दोन व्यक्तींचा खून होतो आणि कबीर व ख़ालीदमधल्या जीवघेण्या संघर्षाला सुरुवात होते. अधिक तपासात ख़ालीदसमोर एक मोठं रहस्य उलगडतं, पण कबीरला पकडण्यात दोनवेळा अपयश आल्याने ख़ालीदला निलंबीत केलं जातं. ख़ालीद व कबीरमधील संघर्षाद्वारे रिज़्वान इल्याज़ी या कुख्यात अतिरेक्याचं नाव समोर येतं आणि भारताविरुद्ध त्याने रचलेलं मोठं षडयंत्र उघडकीस येतं. इल्याज़ी व त्याच्या हस्तकांना मारलं जातं आणि या कामगिरीबद्दल ख़ालीदचा सत्कार केला जातो...
चित्रपटातली हाणामारीची दृश्य ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. "Fast & Furious" series, "Mission Impossible" series या चित्रपटांच्या तोडीसतोड "वॉर" या चित्रपटातली हाणामारीची दृश्य रंगली आहेत. थरारक आणि खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या दृश्यांचं चित्रिकरणही तितकंच सुरेख झालं आहे. या दृश्यांवर कळस चढवला तो संचित व अंकित बलहारा यांच्या सुंदर पार्श्वसंगीताने. विशाल-शेखर या द्वयींनी दिलेलं संगीत काही अंशी तरी चित्रपटात गतिरोधकाचं काम करतं...
हृतिक रोशन व टायगर श्रॉफ यांची जुगलबंदीमात्र चित्रपटभर छान रंगली आहे. हाणामारीच्या दृश्यांत दोघांनीही बाजी मारली आहे. त्यांची पाठलागाची दृश्य तर कमाल आहेत. "धूम", "धूम २", "धूम ३" हे चित्रपट पाणी भरतील इतकी रोमहर्षक ती वठली आहेत. "जय जय शिवशंकर..." या गाण्यादरम्यान नृत्यात टायगरने हृतिकवर मात केल्याचं दिसतं पण अदाकारीमध्ये मात्र हृतिकने टायगरला मागे टाकल्याचं जाणवतं...
चित्रपटातली काही दृश्य खटकल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरणार्थ, भारतातल्या बड्या अधिकाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था सहज भेदून कबीरचं त्यांचा खून करणं, कबीरला पकडू न शकल्यामुळे निलंबित होऊनही ख़ालीदचं सराईतपणे RAWच्या ऑफीसात वावरणं, भर तलावात दिवसाढवळ्या एका इसमावर पाळत ठेवताना कबीरकडे कोणाचंही लक्ष न जाणं...
एकंदरीत, 'one time watch' या पठडीत मोडणारा आणि हृतिक विरुद्ध टायगर असं बिरूद मिरवणारा सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "वॉर" मोठ्या पडद्यावरच पहावा असाच आहे...


