Backdrop of Egypt, the beautiful Nile river, one luxurious ship, thirteen passengers and three mysterious deaths... हे कथानक आहे Agatha Christieने लिहिलेल्या पुस्तकावर आधारीत, "Death on the Nile" या चित्रपटाचं...
नुकतंच लग्न झालेलं जोडपं Simon Doyle (Armmie Hammer) व Linnet Doyle (Gal Gadot), लिनेटची खाजगी नोकर असलेली Lousie Bourget (Rose leslie), लिनेटचा वकील भाऊ Andrew Katchadourian (Ali Fazal), लिनेटचा एकेकाळचा मित्र व डॉक्टर Linus Windlesham(Russell Brand), लिनेटची मानलेली आई Marie van Schuyler (Jennifer Saunders) आणि तिची सोबती Mrs. Bowers (Dawn French), लिनेटची शाळेतली मैत्रिण Rosalie Ottabourne (Susannah Fielding) व तिची मावशी Salome Ottabourne (Sofie Okonedo), प्रसिद्ध चित्रकार Euphemia (Annette Bening) व तिचा मुलगा Bouc (Tom Bateman) आणि हुशार व लोकप्रिय गुप्तहेर Hercule Poirot (Kenneth Branagh) असे बारा जण एका जहाजावर ट्रिपसाठी जातात...
ट्रिप छान सुरू असताना एका ठिकाणी Jaqueline de Bellfort (Emma Mackey) ऊर्फ जॅकी त्या जहाजाच्या प्रवाशांमध्ये सामिल होते. जॅकीला तिथे पाहून लिनेट अस्वस्थ होते. कारण जॅकी ही सायमनची एकेकाळची प्रेयसी असते आणि तिच्याशी फारकत घेऊन सायमनने लिनेटशी लग्न केलं असतं. जहाजावरचं वातावरण हळूहळू गढूळ होत जातं आणि अशातच लिनेटचा तिच्याच खोलीत खून होतो. सुट्टीवर असलेला हर्क्यूल पायरॉट या केसची जबाबदारी स्वीकारतो आणि बुकच्या मदतीने इतर प्रवाशांच्या चौकशीला सुरुवात करतो. चौकशीदर्म्यान लिनेटचे अनेक चांगले वाईट पैलू समोर येत असताना लिनेटची खाजगी नोकराणी ल्यूसी व स्वत: बुक, यांचेही खून होतात आणि पायरॉट बिथरतो. तपास कार्यात पायरॉटला, गुन्हेगार पकडला जाईल असे काही धागेदोरे मिळतात. अखेर तीनही खुनांना वाचा फुटते आणि खऱ्या गुन्हेगाराची उकल होते...
चित्रपटात दाखवलेला १९३७चा काळ अगदी चोख वठला आहे. इजिप्तची ती नयनरम्य दृश्य, ते पिरॅमिड्स, त्या ऐतिहासिक मूर्त्या, नाइल नदीचं सुंदर पात्र, हे सगळी दाखवताना ड्रोन शॉट्स, हेलिकॉप्टर शॉट्स आणि स्लो मोशन कॅमेराचा अप्रतीम वापर केला गेला आहे. चित्रपटात वापरले गेलेले ध्वनी आणि चित्रपटाचं कधी गूढ तर कधी शांत असं पार्श्वसंगीत, कथेतली रंजकता टिकवून ठेवतात. कलावंतांचं म्हणाल तर सर्वच कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखेला चांगला न्याय दिला आहे. पण त्यातल्या त्यात Kenneth Branagh यांनी साकारलेला हर्क्यूल पायरॉट आणि Emma Mackey यांची जॅकी, थोडे उजवे ठरतात. हर्क्यूल पायरॉटची वेशभूषा, केशभूषा आणि कपडेपट, शेरलॉक होम्स यांच्या कथांमधल्या डॉक्टर वॉटसनची आठवण करून देतात. Emma Mackeyने देखील आधीची आनंदी, स्वच्छंदी जॅकी आणि नंतरची गंभीर, रुक्ष जॅकी, हा भावनांमधला फरक छान दाखवला आहे...
प्रश्न उरतो कथेचा. पाण्यात असणाऱ्या जहाजावर खून होतो, तेव्हा ही गोष्ट सहाजिकच आहे की खूनी त्याच जहाजावर असणार. पण शेवटपर्यंत हे रहस्य टिकवून ठेवण्यात लेखक Michael Green यांना बऱ्यापैकी यश आलं आहे. कथानकाचा विस्तार थोडा जास्त केल्यासारखा वाटतो. मुख्य कथानक होतं लिनेटच्या मृत्यूचं. त्याच्याशी निगडीत दाखवलेली उपकथानकं ठिक होती. पण हर्क्यूल पायरॉटचं गत आयुष्य आणि केस संपल्यावर त्याच्यात झालेला बदल, या गोष्टी मुख्य कथानकाशी सुसंगत वाटल्या नाहीत. त्याचं वैयक्तिक आयुष्य दाखवणारं कथानक थोडं खेचल्यासारखं वाटलं. जॅकीच्या फक्त आसपास असण्याने तणावात राहणारी लिनेट, हा कथाभाग जहाजावरही दाखवला गेला. पण त्या कथाभागाचा अधिक वापर करता आला असता...
Agastha Christie यांच्या पुस्तकावर या आधी, १९७४चा "Murder on the Orient Express" आणि १९७८चा "Death on the Nile" हे दोन चित्रपट येऊन गेले आहेत. "Murder on the Orient Express" चित्रपटात हर्क्यूल पायरॉट ही व्यक्तिरेखा व कथानकाचा गाभा तसेच ठेऊन, जागा, वेळ आणि पात्र बदलली गेली. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या "Death on the Nile"मध्ये मात्र पुस्ताकातलेच सर्व संदर्भ वापरले गेले. अर्थात, हे दोन्ही चित्रपट आत्ताच्या चित्रपटाच्या तुलनेत तांत्रिकदृष्ट्या थोडे कमी होते. हिंदीतही १९६५ सालच्या "गुमनाम" या चित्रपटात अशाच प्रकारचं कथानक होतं पण मांडणी वेगळी होती...
एकंदरीत, एका रहस्यमय प्रवासाची शोधकथा म्हणून स्वत: Kenneth Branagh दिग्दर्शित, "Death on the Nile" हा चित्रपट नक्कीच पहावा असाच आहे...
@ अनिकेत परशुराम आपटे.
No comments:
Post a Comment