Thursday, 24 December 2020

झकास नायक...

"एकदम झकास...", "शतरंज के मोहरे वही हैं... मगर बाजी पलट चुकी है...", "माय नेम इज ...लख्खन..." अशा अनेक संवादांची लायलूट करणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणजे अनिल कपूर...

१९७१ साली "तू पायल मैं गीत" या चित्रपटाद्वारे एक बाल कलाकार म्हणून अनिल कपूर यांचं रुपेरी पडद्यावर पदार्पण होणार होतं पण काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. १९७९ साली प्रदर्शित झालेल्या "हमारे तुम्हारे" या चित्रपटातल्या छोट्या भूमिकेद्वारे अनिल कपूर प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकले. पुढे "शक्ती", "मशाल", "युद्ध", "वो सात दिन", अशा सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून सहायक आणि सहनायक म्हणून भूमिका निभावत अनिल कपूर प्रसिद्धीपथाला लागले...

त्याकाळी "अंदर-बाहर", कर्मा", "जाँबाज़", "राम-अवतार" अशा चित्रपटांमध्ये सहनायकी भूमिका निभावताना अनिल कपूर आपल्याला दिसले. मुख्य नायक म्हणून ते प्रथम झळकले, १९८० प्रदर्शित झालेल्या "वंश वृक्षम" या तेलगू चित्रपटाद्वारे. १९८४ साली प्रदर्शित झालेला "लैला" हा चित्रपट मुख्य नायक म्हणून अनिल कपूर यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. पुढे "लव्ह मॅरेज", "साहेब", "मोहब्बत", "मेरी जंग"सारखे चित्रपट देऊन मुख्य नायक म्हणून अनिल कपूर यांनी लोकप्रियता मिळवली...

अनेक चित्रपटांमधून गंभीर भूमिका निभावणाऱ्या अनिल कपूर यांची विनोदी भूमिका करतानाची हातोटीही तितकीच लक्षणीय होती. "दिवाना मस्ताना", "बीवी नंबर १", "झूठ बोले कव्वा काटे", "नो एंट्री" अशा अनेक विनोदी चित्रपटांमधून नायकाच्या आणि सहनायकाच्या भूमिकेत अनिल कपूर यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नायकप्रधान भूमिका साकारत असताना "ईश्वर", "बुलंदी", "बधाई हो बधाई", "टशन", "चॉकलेट", "कलकत्ता मेल", "माय वाईफ्स मर्डर" अशा चित्रपटांमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकाही अनिल कपूर यांनी लिलया वठवल्या...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अग्रस्थान मिळवणाऱ्या अनिल कपूर यांनी १९९० ते २००० या दशकात अपयशाची फळेही चाखली होती. "जमाई राजा", "जीवन एक संघर्ष", "बेनाम बादशाह", "रूप की रानी चोरों का राजा", असे त्यांचे काही चित्रपट एकामागून एक अयशस्वी ठरत गेले आणि अनिल कपूर यांच्या लोकप्रियतेला धक्का लागला. पण यश चोपड़ा दिग्दर्शित "लम्हें" यशस्वी झाला आणि अनिल कापूर यांना पुन्हा पायऱ्या चढू लागले. आपल्या सेकंड इनिंगमध्ये "वेलकम", "अरमान", "रेस", "मलंग", "दिल धड़कने दो" अशा चित्रपटांमधून सहायक भूमिका साकारत अनिल कपूर यांनी पुन्हा यश मिळवलं...


२४ डिसेंबर या दिवशी, या अवलिया झकास नायकाचा वाढदिवस. त्यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. "वन टू का फोर... फोर टू का वन..." करत या "मि. इंडिया"ने सगळ्यांचं "मन" जिंकलं. "तेज़" दौडणाऱ्या मायानगरीत जेव्हा हा "मि. बेचारा" मागे राहू लागला तेव्हा प्रेक्षकांची "पुकार" ऐकत अदाकारीच्या या "नायक"ने पुन्हा सुरुवात करून "टोटल धमाल" केली...

Happy Birthday Lakkhan...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Wednesday, 23 December 2020

दिलदार गानसम्राट...

"तुम मुझे यूँ भुला ना पाओगे...", "पुकारता चला हूँ मैं...", "चाहूँगा मैं तुझे साँझ सँवेरे...", "चौधवीं का चाँद हो... या आफताब हो...", ही आणि अशी अनेक अप्रतीम गाणी आपल्या मधाळ स्वरांनी अजरामर करणारे गायक म्हणजेच रफ़ीसाहब ऊर्फ आपल्या सर्वांच्या परिचयाचे मोहम्मद रफ़ी...

कागदावरच्या अगणीत गाण्यांना बोलकं करणाऱ्या रफ़ीसाहेबांनी १९४१ साली प्रदर्शित झालेल्या "गुल बलोच" या पंजाबी चित्रपटातल्या "सोणिये नी हीरिये नी..." या गीताला प्रथम आपला आवाज दिला. नौशादजींचं संगीत लाभलेला १९४५ साली प्रदर्शित झालेला "गाँव की गोरी" हा, पार्श्वगायक म्हणून रफ़ीसाहेबांचा पहिला चित्रपट ठरला. त्याच चित्रपटातल्या "अजी दिल हो क़ाबू में..." या गाण्याद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं...

रफ़ीसाहेबांनी अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत आपली जोडी जमवली. नौशाद, सचिन देव बर्मन, राहुल देव बर्मन, शंकर-जयकिशन, रवि, कल्याणजी-आनंदजी, लक्षमीकांत-प्यारेलाल, मदन मोहन, ओंकार प्रसाद नय्यर या मातब्बरांनी संगीतबद्ध केलेली असंख्य गाणी रफ़ीसाहेबांनी गायली आणि लोकप्रियही केली. इतकंच नाही, तर अनेक उद्योन्मुख संगीतकारांच्या गीतांना आवाज देत रफ़ीसाहेबांनी त्यांची गाणी आणि त्यांचं नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं...

रफ़ीसाहेबांचा आवाज इतका सुंदर होता की कुठल्याही भावातलं गाणं उठून यायचं. "आगे पीछे हमारी सरकार... यहाँ के हम हैं राजकुमार..." किंवा "चाहे कोई मुझे जंगली कहे..." ही उडत्या चाली धमाल गाणी असोत; "एहसान तेरा होगा मुझपर..." किंवा "मेरे मेहबूब तुझे..." ही शांत प्रेमगीतं असोत अथवा, "बाबूल की दुवाएँ लेती जा..." किंवा "यह दुनिया यह महफिल... मेरे काम की नहीं..." यासारखी गंभीर दर्दभरी गाणी असोत, प्रत्येक गाण्यातले भाव, गाणं ज्या कलाकारावर चित्रित होणार आहे त्या कलाकाराच्या बोलण्याचा लेहेजा, या सगळ्याचा अभ्यास करून रफ़ीसाहेब त्या त्या गाण्याला आवाज द्यायचे...

रफ़ीसाहेबांनी अनेक सहगायकांसोबत गाणी गायली आहेत, पण त्यांच्या लक्षात राहणाऱ्या जोड्या फक्त दोनच होत्या. रफ़ी-आशा आणि रफ़ी-लता. पडद्यावर नायक-नायिकांच्या जोड्या जशा प्रचलित होत्या तशाच पडद्यामागे रफ़ी-आशा व रफ़ी-लता या जोड्या आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. हिंदीत हजारो गाणी गाणाऱ्या रफ़ीसाहेबांनी इतर भाषांमधील गाण्यांनाही त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या स्वरांनी वेगळीच ऊंची गाठून दिली. मराठी, तेलगू, कन्नड, पंजाबी, आसामी, सिंधी अशा अनेक भाषांतील गाणी रफ़साहेबांच्या स्वरांनी सजली...

रफ़ीसाहेब अजून दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. त्या गोष्टी म्हणजे रफ़ीसाहेबांची दिलदार वृत्ती आणि 'पैसा फेको तमाशा देखो...' न करणारा त्यांचा स्वभाव. नौशादजींनी एका मुलाखतीत सांगितलं, की रफ़ीसाहेब कधीच भिकाऱ्यांना पैशाची मदत करत नसत. उलट त्यांच्या गाडीतून अन्नाचे डबे नेऊन भिकाऱ्यांना खायला घालत. नौशादजींच्या म्हणण्यानुसार, पैसे देऊन प्रशंसा मिळवण्यापेक्षा दिलेल्या अन्नामुळे समोरच्याचं पोट तरी भरेल असा रफ़ीसाहेबांचा विचार असायचा...

रफ़ीसाहेबांच्या दिलदारवृत्तीचेही बरेच किस्से आहेत. त्यांच्या गायनाचा मोबदला देण्यासाठी जर एखाद्याकडे पैसे नसतील, तर रफ़ीसाहेब त्यांच्याकडून फक्त एकच रुपया घ्यायचे. इतकंच नाही, तर काहींना आपला जम बसवण्यासाठी रफ़ीसाहेबांनी दिलखुलासपणे पैशाचीही मदत केली आहे. स्वर सम्राट तर ते होतेच, पण अशा काही आठवणींमुळे रफ़ीसाहेब दिलदार म्हणून देखील ओळखले गेले. आज २४ डिसेंबर. या दिलदार गानसम्राटाचा वाढदिवस. आपल्या सुरेल स्वरांनी गाण्यांना अमर करणाऱ्या रफ़ीसाहेबांना माझा मानाचा मुजरा...


"बार बार दिन यह आये...
बार बार दिल यह गाये...
तू रहे याद हज़ारों साल...
यह मेरी है आरज़ू...
Happy birthday to you...
Happy birthday to you...
Happy birthday ओ रफ़ीसाहेब...
Happy birthday to you...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 21 December 2020

खतरनाक बालबुद्धी...

खेळात नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा असतो. नाणेफेकीमुळे फक्त निर्णय नाही, तर खेळाचा परिणामही बदलू शकतो. हे झालं खेळाचं, पण हीच नाणेफेक जर खऱ्या आयुष्यात वापरली गेली तर... याच प्रश्नाचं उत्तर आहे २००१ साली प्रदर्शित झालेला "अभय..."

आई गेल्यावर आपले वडिल (मिलिंद गुणाजी) व सावत्र आई (किट्टू गिडवानी) यांच्यासोबत अभय आणि विजय हे जुळे भाऊ राहत असतात. मोठा विजय जितका सहनशील, लहान अभय तितकाच बंडखोर असतो. आपल्या खडतर आयुष्यातून बाहेर पडण्याचा आणि वेगळं जीवन जगण्याचा एकमेव उपाय असतो मामासोबत (विक्रम गोखले) जाण्याची संधी. अभय-विजय नाणेफेकीचा कौल घेतात आणि तिथून दोघांची आयुष्य बदलतात...

नाणेफेक जिंकलेल्या विजयला (कमल हसन) एक चांगलं आयुष्य मिळतं. तो सैन्यातला मोठा अधिकारी होतो. पण नाणेफेक हरलेला अभयमात्र (कमल हसन) ठार वेडा होतो. विजयच्या जगात सामाजिक घटक, माणसं, प्रेम, मैत्री हे सर्व असतं. अभयनेही स्वत:भोवती एक वेगळंच जग तयार करून ठेवलं असतं. अभयच्या त्या जगात राग, द्वेष, विद्रूपता यांचा वावर असतो. एका क्षणी अभय त्याच्या आभासिक जगानिशी विजयच्या जगात प्रवेश करतो आणि अभय विरुद्ध विजय ही लढाई सुरू होते ज्यात चित्रपटाचा शेवट होतो...

कथा काही फारशी वेगळी नाही पण ती ज्याप्रकारे उलगडत जाते त्यामुळे चित्रपट पहावासा वाटतो. चित्रपटातले संजय नाईक यांचे स्पेशल इफेक्ट्स, थिर्रू यांचे विविध कॅमेरा एँगल्स आणि विक्रम धर्मा यांची जबरदस्त हाणामारी व साहस दृष्य चित्रपटाला उठाव देतात. गाणी मोजकीच आहेत पण ती कथेला पूरक असावीत किंवा श्रवणीय असावीत अशी नाहीत. खरंतर गाणी नसती तरी काही फारसा फरक पडला नसता. पण अभयच्या तोंडी असलेले जावेद अख़्तर यांचे शब्द कमालीचे सुंदर आहेत. कथेवर आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रक्षकांवरही त्या शब्दांचा परिणाम जाणवतो...

आईचं आपल्याच मुलाला खून करण्यासाठी किंवा आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणं, परेडसारख्या कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी अभयचं सुरा घेऊन सर्रास वावरणं, मोठे झालेले अभय व विजय यांच्या दिसण्यात फरक असूनही काहींचा गोंधळ उडणं, चित्रपटातल्या या काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. पण या गोष्टी सोडून जर चित्रपट पाहिला, तर समोर दिसणारा एकमेव घटक म्हणजे कमल हसन एके कमल हसन...

विजय आणि अभय या दोन भिन्न व्यक्तिरेखा रंगवताना कमल हसन यांच्या अभिनयाचाच नाही, तर शारीरिक क्षमतेचाही चांगलाच कस लागला आहे. विजय आणि अभयच्या देहबोली, हालचाली, बोलण्याचा लेहेजा, डोळ्यातले भाव आणि विचार यांतला फरक दर्शवताना कमल हसन यांनी अप्रतीम अभिनय केला आहे. काही वाईट केल्यावर डॉक्टर किंवा आईचा भास होऊन रडणारा, सॉरी म्हणणारा अभय जितका बालबुद्धी वाटतो, वेगळा जोश चढल्यावर हिंसक झालेला अभय तितकाच खतरनाकही होतो. कमल हसन यांनी अभयचे हे दोन्ही भाव उत्तम वठवले आहेत...

कमल हसन यांच्या अदाकारीसोबतच अभयच्या बालबुद्धी आभासिक जगातली चंद्रशेकरन यांनी दिलेले कार्टून्स आणि त्या कार्टून्सवर चित्रित झालेली काही दृष्य चित्रपटाचा महत्वाचा घटक आहेत. कार्टून्स ही बहुतांश हाणामारीच्या दृष्यात वापरली गेल्याने त्या हिंसक दृष्यांची तीव्रता बऱ्यापैकी कमी होते. त्या कार्टून दृष्यांची लांबीही आटोक्यात असल्याने कथेला व साहसदृष्यांना एक वेगळाच टच मिळतो आणि ती दृष्य आपण नीट पाहूही शकतो...

एकंदरीत, कमल हसन यांच्या "धयम" या कादंबरीवर आणि "आलावंधन" या दाक्षिणात्य चित्रपटावर बेतलेला सुरेश कृष्णा दिग्दर्शित "अभय" हा चित्रपट, कमल हसन यांच्या अप्रतीम अदाकारीचा उत्तम नमूना आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Thursday, 10 December 2020

डॅशिंग दया...

"दरवाजा तोड़ दो दया...", "कुछ तो गड़बड़ है दया..." सी.आय.डी. मालिकेतल्या ए.सी.पी. प्रद्यूम्नचे हे संवाद कानी पडले, की एकच व्यक्ती डोळ्यांसमोर येते. ती व्यक्ती म्हणजे त्याच मालिकेतील ऊंचपुऱ्या, धिप्पाड शरीरयष्टीचा सीनियर इंस्पेक्टर दया...


दयानंद शेट्टी ऊर्फ दया हे एकेकाळी एक उत्तम खेळाडू होते. 'शॉर्ट पुट' आणि 'डिस्कस थ्रो' या खेळात अनेक पदकंही त्यांनी मिळवली. महाराष्ट्राकडून खेळत असताना १९९६ साली त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि नाइलाजाने त्यांना क्रिडाक्षेत्र सोडावं लागलं. छोट्या पडद्यावर काही जाहिराती करत असताना "सिक्रेट" या तुळू नाटकासाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला...

हिंदीत आपलं नशीब आजमावं म्हणून "सी.आय.डी." या मालिकेसाठी दयानंद शेट्टी यांनी ऑडिशन दिली आणि 'इंस्पेक्टर दया' या व्यक्तिरेखेसाठी त्यांची निवड झाली. शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तवसारखे कलावंत सोबत असतानाही दयानंद शेट्टी यांनी त्यांच्या व्यक्तिरेखेला वेगळी ऊंची मिळवून दिली. देहबोली, संवादफेक, अदाकारी आणि हाणामारीची दृष्य यांच्या बळावर दयानंद शेट्टी यांनी 'इंस्पेक्टर दया' ही व्यक्तिरेखा, मालिकेतील इतर व्यक्तिरेखांच्याही वर नेत अधिक लोकप्रिय केली...


"सी.आय.डी."सोबतच इतर अनेक मालिकांमधून पाहुणा कलाकार म्हणून झळकत असताना, दयानंद शेट्टी यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला. अजय देवगण यांच्या "दिलजले" या चित्रपटात एका बंदुकधाऱ्याची भूमिका साकारत त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. पुढे "जॉनी गद्दार", "रनवे", "सिंघम रिटर्न्स" अशा काही मोठ्या चित्रपटात सहायक व्यक्तिरेखा त्यांच्या वाट्याला आल्या. पण कथा आणि इतर कलावंतांची लोकप्रियता यांच्यापुढे दयानंद शेट्टी यांना फारसा वाव नसल्याने जास्त लोकप्रियता मिळू शकलेली नाही...

"सी.आय.डी." मालिका इतकी लोकप्रिय आहे की आजही दयानंद शेट्टी हे सीनियर इंस्पेक्टर दया म्हणूनच जनमानसात प्रचलीत आहेत. शिवाय याच भूमिकेमुळे त्यांचा वेगळा असा चाहतावर्गही आहे. ११ डिसेंबर या दिवशी, सीनियर इंस्पेक्टर दया म्हणजेच अभिनेते दयानंद शेट्टी यांचा वाढदिवस असतो. त्यांना माझ्या कोटी कोटी शुभेच्छा...

"दया, छोटे और बड़े पड़देपर आगे बढ़ो और सारे रेकॉर्ड तोड़ दो..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

द अल्टिमेट ट्रॅजिडी किंग...

"ए भाऽऽऽय..." ही आर्त स्वरातली हाक किंवा उदासीनता दर्शवणारा, "कौन कंबख़्त बर्दाश्त करने को पीता है..." हा संवाद ऐकला की एकच नाव मनात येतं. ते म्हणजे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार...


१९४४ साली झळकलेल्या "ज्वार-भाटा" या चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला सुरुवात केली. "अंदाज़", "बैराग", "देवदास", "मुग़ल-ए-आज़म", "मधुमती", "नया दौर", "कोहिनूर", "राम और श्याम" अशा असंख्य यशस्वी चित्रपटांमधून ते नायक म्हणून झळकले. त्याकाळात अभिनेत्री मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या गाजलेल्या प्रकरणामुळेही "मुग़ल-ए-आज़म"ने प्रचंड गल्ला जमवून दिलीप कुमार यांना सुपरस्टार पदावर बसवलं. त्यांच्या अभिनयशैलीचं कौतुक करत जेष्ठ दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी, 'The ultimate method actor...' या शब्दात दिलीप कुमार यांचा उल्लेख केला...


यशाच्या शिखरावर असताना १९७६ चे १९८१ या कालावधीत चित्रपटांपासून दूर राहण्याचे दिलीपदांनी ठरवले खरे, पण तिथेच थांबतील तर ते युसूफ़ ख़ान कसले... १९८१ साली प्रदर्शित झालेल्या "क्रांति" या चित्रपटाद्वारे दिलीप कुमार यांनी यशस्वी पुनरागमन केलं. नायक म्हणून ते लोकप्रिय होतेच, पण त्यांच्या चरित्र भूमिका असलेले, "शक्ति", "मशाल", "सौदागर", "कर्मा" हे चित्रपट प्रचंड यशस्वी झाले आणि एक चरित्र नायक म्हणूनही ते नावाजले गेले. दिलीप कुमार-मनोज कुमार व दिलीप कुमार-अमिताभ बच्चन यांची पडद्यावरील जुगलबंदी, हे अनुक्रमे "क्रांति" आणि "शक्ति" या दोन चित्रपटांच्या यशामागच्या कारणांमध्ये एक मुख्य कारण होतं...


आज ११ डिसेंबर. आठ फिल्म फेयर पुरस्कार, पद्मभषण पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मविभूषण पुरस्कार विजेते दिलीप कुमार यांचा आज अठ्यान्नवा (९८) वाढदिवस. "Tragedy king..." या टोपणनावानिशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या मुहम्मद युसूफ़ ख़ान ऊर्फ दिलीप कुमार यांना जन्मदिनानिमित्त मनापासून शुभेच्छा...

"झूम झूम के नाचो आज... गाओ खूशी के गीत..."

@ अनिकेत परशुराम आपटे.