नमस्कार, "Sarabhai vs Sarabhai" या कौटुंबिक मालिकेने एकेकाळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घातला होता. याच मालिकेच्या पात्रांना घेऊन एक नवा एपिसोड scene-by-scene मराठीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. आशा करतो पसंत पडेल...
#Sarabhai_vs_Sarabhai_Special_Episode...
रोसेश: नाचे मन मोरा मदन दिग धा धिगी धिगी...
इंदू: ओए पार्ट टू... ते मदन नाही, मगन आहे.. मदन तर मी होतो "देख भाई देख"मध्ये. पण का नाचतंय मन तुझं... खरं सांग, कोणी शोधलीस वाटतं...
रोसेश: असं काही नाही डॅड, काल मधूकाका हेच गाणं ऐकत होते. मला आवडलं. म्हणून मीही गुणगुणायला लागलो...
इंदू: काय... तो बहिरा गाणं ऐकत होता...
रोसेश: डॅड, आता ते बहिरे नाहीत ओके. दुष्यंतने त्यांना नवीन हियरिंग डिवाईस आणून दिलं आहे. मेड इन जर्मनी...
इंदू: अरे दुष्यंत माझ्या सोन्या... काय मस्त काम केलंस तू... आता तरी त्या हैं हैं हैं हैं पासून सुटका होईल...
माया: हाय बॉईज... तुम्ही मॉनिशाला पाहिलं आहे का...
इंदू आणि रोसेश मुंडी हलवून नाही म्हणतात...
माया: सकाळपासून मॉनिशा दिसत नाही कुठे...
रोसेश: मॉनिशा वाहिनी गेली असेल गांगुरामकडे टुथपेस्ट विकत घ्यायला. किंवा घसीटारामकडून छोले भटुरे आणायला...
माया: नाही ना... मी सिक्यूरिटीला पाठवलं होतं. समजलं, की मॉनिशा कालपासून त्यांच्या दुकानावर नाही गेली. मला तर टेन्शन यायला लागलं...
रोसेश: तुला टेन्शन मॉमा...
इंदू: नॅच्यूरली रोसेश... सकाळपासून मॉनिशा मुरदाबाद एक्सप्रेस चालली नाही ना, टेन्शन तर येणारच...
माया: ओ स्टॉप इट इंद्रवदन...
मधुकाका: ए इंदू, या मॉनिशाला काय झालं...
इंदू: काय... तुम्ही पाहिलं मॉनिशाला...
मधुकाका: भायखळ्याला... ना रे, हे भायखळा नाही, कफ परेड आहे...
इंदू: (रोसेशकडे पाहत...) नालायक, फाजील... आपल्या बापाशी खोटं बोलताना काहीच वाटलं नाही तुला...
रोसेश: प्रँक होता डॅड. ते गाणं काल टि.व्ही.वर लागलं होतं...
मधुकाका: हैं...
इंदू: माया, बघ ना...
माया: (मधुकाकांकडे पाहून, मॉनिशाचा फोटो दाखवत आणि डोळ्यांकडे इशारा करत...) मधुभाऊजी... मधुभाऊजी... तुम्ही मॉनिशाला... पाहिलं का...
मधुकाका: मी मॉनिशाला पाहिलं का... हो पाहिलं ना... खाली बसच्या स्टॉपजवळ उभी होती. मी तिथे पोहोचायच्या आधीच ती बसमध्ये चढली. थोडी उदास वाटत होती...
माया: बसमध्ये... ओह दॅट इज टू मिडल क्लास... पण गेली कुठे ती...
साहिल: इन्नफ इज इनफ...
माया: साहिल, काय झालं बेटा...
साहिल: मॉम, मॉनिशासारखी बेजबाबदार आणि पैशांची हाव असलेली मुलगी मी आजपर्यंत नाही पाहिली...
रोसेश: वॉट आर यू सेईंग साहिलदादा... असं केलं काय मॉनिशा वाहिनीने...
साहिल: फोर्थ फ्लोरचे मि. वाडिया आहेत ना, त्यांना माझ्या कोयोटेची राईड हवी होती. मी नाही म्हणालो. पण मॉनिशाने मिनिटाचे हजार रुपये या बोलीवर चावी त्यांच्या हातात दिली. आणि त्या वाडियाने गाडीची दोन्हीही टेल लाईट्स तोडून ठेवली. मी त्या वाडियासोबत रिफंडबद्दल बोलत असतानाच मॉनिशा त्यांच्या समोरच म्हणाली, "जाऊ दे ना साहिल, नेक्ट टाईम तू त्यांची फियाट चालव आणि त्याचे टेल लाईट तोड. हिशोब फिट्टूस..."
माया: ओह मॉनिशा... Atleast scores are settled तर बोलायचं होतं... हिशोब फिट्टूस इज जस्ट सो डाऊन मार्केट... एनीवेज, साहिल, आता कुठे आहे ती...
साहिल: मॉम, यावरून आमच्यात खूप वाद झाला. मी तिला ओरडलो आणि ती घर सोडून निघून गेली. बरं झालं गेली. आय थिंक इट्स ऑल ओव्हर मॉम...
दुष्यंत: मॉम, मधूकाकांनी मॉनिशाला ज्या बसमध्ये चढताना पाहिलं, ती बस खाऊ गल्ली जाते…
माया: खाऊ गल्ली... What is this मॉनिशा... सर्वांच्या नजरा चुकवून तू गेलीस कुठे, तर खाऊ गल्ली...
रोसेश: नाही मॉमा... मॉनिशा वाहिनी तिथे पोहोचलीच नाही...
दुष्यंत: हो मॉम... आम्ही कंडक्टरशी बोललो. तो म्हणाला मॉनिशा बसमध्ये चढली, पण ती पुढच्याच स्टॉपवर उतरली...
रोसेश: मॉमा, आणि मॉनिशा वाहिनीने तर स्टॉप येण्याची वाट न बघताच चालत्या बसमधून उडी मारली. हे पाहून ड्रायव्हरने जोरात ब्रेक पण मारले...
दुष्यंत: डोंट वरी मॉम... बसला काहीही झालेलं नाही... टायर्स थोडे घासले गेलेत इतकंच... आय विल एक्सप्लेन... असं पहा, की रोसेश बस आहे... आणि...
माया: ओ स्टॉप इट दुष्यंत...
सोनिया: का डॅड...
इंदू: तिथेच तर त्या हरी आणि मदनचा दारूचा अड्डा होता ना, जो मायाने बंद करवला होता...
दुष्यंत: त्यानंतरच तर रोसेश किडनॅप झाला होता आणि डॅडने बारगेन करून पंचवीस लाखांवर सौदा पटवला होता...
माया: सेटलमेंट केली असं तरी बोल दुष्यंत. सौदा पटवला साऊंडस सो मॉनिशा स्टायलिश. पण ते पैसे घेऊन तर ते दोघं Indonesiaला पळाले ना...
रोसेश: पण मागच्या आठवड्यात ते परत आलेत मॉमा... मदनने तर गेट वेवर काढलेले फोटोसुद्धा पाठवलेत मला WhatsAppवर...
माया: तू अशा लोकांच्या contactमध्ये आहेस रोसेश... How illegally disgusting...
मधूकाका: हैं...
माया: ओ माय गॉड... रोसेश... लगेच साहिलला बोलाव... आपल्याला काहीतरी करायला हवं... सोनिया तुझ्या वूडू डॉल्स काय सांगतात बघ ना...
इंदू: माया, तुला इतका त्रास का होतोय... मॉनिशाचं घर सोडून जाणं तुझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट आहे...
माया: ते तर आहेच... But the point is मॉनिशा कोणालाही न सांगता गेली. आय मिन, जर मला सांगून गेली असती तर मी काय थांबवणार होते तिला... तिला जायचंच होतं तर सांगून तरी जायचं ना... इतकं टेन्शन तरी नसतं घेतलं मी...
सोनिया: सायलंस... वूडू चार्ट बोलतोय... वाहिनी अशा जागी आहे जिथे आजू-बाजूला काहीतरी थंड थंड आहे. तिचं तोंड सारखं उघड-बंद होत आहे...
मधूकाका: ए सोनिया, तू डोळे फिरवून नुसते ओठ का हलवतेस...
इंदू: मधूबाऊजी, मॉनिशा कुठे असू शकेल हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे सोनिया...
इंदू: मूर्खा.. बहिरे तुम्ही आहात... मी काय बोलतोय तुम्हाला समजत नाही... आणि मूर्ख मला म्हणताय... चोराच्या उलट्या बोंबा...
मधूकाका: पाहिलंस सोनिया... पुन्हा अगडम् बगडम् बोलायला सुरुवात केली याने...
माया: ओ स्टॉप इट बोथ ऑफ यू... पण थंड थंड म्हणजे...
दुष्यंत: बर्फ... बर्फाच्या लादीवर झोपवलं असेल मॉनिशाला...
इंदू: आणि तोंड सारखं उघड-बंद होत आहे म्हणजे...
दुष्यंत: Torture… “वाचवा वाचवा...” असं ओरडत असेल मॉनिशा...
इंदू: शुभ बोल रे दुश्यंता... अरे ए हरी आणि मदन... जर मॉनिशाला काही झालं ना, तर मी...
त्याच वेळी दारातून आवाज येतो...
आवाज: हॅलो एव्हरीबडी...
माया: कोण आहात तुम्ही, आणि इथे काय करताय...
मधूकाका: ए इंदू, सर्कशीतल्या जोकर्ससारखे कपडे घातलेले हे दोघं कोण आहेत...
इंदू: मला काय ठाऊक...
मधूकाका: चौक... या वेळी चौकात कशाला जायचंय तुला...
इंदू: अरे कशाला त्रास देताय तात्या...
माधूकाका: आत्या... कोणाची आत्या...
इंदू: (त्या दोघांकडे पाहत...) अरे तुम्ही सांगत का नाही कोण आहात तुम्ही... हा पंचायतीलाल तरी गप्प बसेल...
रोसेश: ओ माय गॉड... हरीभाऊ आणि मदन...
हरीभाऊ: बरोब्बर ओळखलंस. आम्ही इंडोनेशियाहून परत आलोत. आता इथेच राहून आम्ही धंदा करणार...
मदन: रोसेश, कविता लिहिणं चालू आहे ना... तुला पाठवलेली कविता वाचलीस...
रोसेश: वाचली... थँक यू मदन... यू आर सो स्वीट...
इंदू: ओहो, म्हणून तू गात होतास पार्ट टू... तुला माहीत होतं तर हे दोघं येणार आहेत म्हणून...
माया: अरे ते सगळं जाऊ दे... हरी आणि मदन... मॉनिशा कुठे आहे सांगा...
हरीभाऊ: मॉनिशा कुठे आहे आपल्याला नाय म्हाइत ... आपन तर पिच्चर बघायला गेलो होती, "हमार कमरे में तोहार पेटी..."
मदन: हां, आणि त्या पिच्चरमदी एक किडन्यापिंग सिण बघून रोसेश आठवला. म्हणून त्याला भेटायला आम्ही लोक...
मधूकाका: ए इंदू... हे लोक कोण आहेत सांग ना...
इंदू: हा आहे मदन आणि हा हरी...
मधूकाका: जरी... ना रे ना... मी तर टेरिकॉटचा शर्ट घातला आहे...
इंदू: अरे बहिऱ्यानंदा... शर्ट नाही माणूस
मधूकाका: रूस... अच्छा तर हे दोघं रूसवरून आलेत...
इंदू: (हरी आणि मदनसमोर हात जोडत...) मी तुम्हा दोघांना विनंती करतो, यांना किडनॅप करून लांब कुठेतरी बंद करून ठेवा...
मधूकाका: हैं...
त्याच वेळी सोनिया हाता वूडू बाहुली घेऊन तिथे येते...
सोनिया: मॉम... मॉनिशा वाहिनी आता एका फॉर व्हीलरसमोर आहे आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे...
दुष्यंत: कुठली फोर व्हीलर... ऑटोमॅटिक की विंटेज...
माया: त्याने काय फरक पडतो दुष्यंत...
दुष्यंत: फरक पडतो मॉम... आय विल एक्सप्लेन... रोसेश इकडे ये... समजा रोसेश रस्ता आहे आणि...
माया: ओ कट इट आऊट दुष्यंत... आणि तुम्ही सगळे, उगाच काहीतरी बोलणं बंद करा...
माया: मॉनिशा बेटा... कुठे आहेस तू... तुझ्यात लाख दोष असतील, पण तू माझी सून आहेस. मला समजून घेणारी एक तूच तर आहेस... आता मी कोणाच्या चुका दाखवू, कोणाला नावं ठेऊ... (लगेच मायाचा चेहरा बदलतो आणि ती विचार करू लागते...) जर हरी आणि मदनने मॉनिशाला किडनॅप नाही केलं, तर ती असेल कुठे... खरंच कुठल्या संकटात तर नसेल... मला साहिलकडे जायला हवं...
माया: आपल्याला मॉनिशाला शोधायला हवं. काय माहीत कुठे असेल ती... मी साहिलकडे जाते...
माया दाराकडे पळते. बाकी सारे तिच्या पाठीच असतात पण माया पटकन घराबाहेर पडते. ती साहिलच्या घराची बेल वाजवते... दरवाजा उघडतो...
माया: साहिल, आपल्याला पोलिस स्टेशनला जायला हवं...
साहिल: मॉम, मी इंस्पेक्टर स्वामीशी बोललो आहे. मॉनिशाला शोधायला ते आपली मदत करतील...
त्याच वेळी साहिल, दारात उभ्या हरी आणि मदनला पाहतो...
साहिल: अरे, मदन आणि हरी... तुम्ही कधी आलात...
रोसेश: हे दोघं परत आलेत साहिल दादा. मला भेटायला आलेत इथे...
इंदू: अरे चंबू, मॉनिशाचा जरा विचार कर इडियट...
मधूकाका: डायट... मॉनिशाने डायट सुरू केलं... पण का...
माया: माय गॉड तुम्ही सगळे हे काय बोलताय... साहिल, मॉनिशाला...
माया: हॅलो, साराभाईज रेसि... मॉनिशाचं घर... येस... कोण रामप्यारे... हां हां, शेवपूरीवाले भाऊ... बोला... अच्छा... पण काय फायदा... जिच्यासाठी तुम्ही इतका फोन केलात, ती तर... बेटर लक नेक्ट टाईम...
माया फोन ठेऊन देते. सगळे मायाकडे पाहतात...
माया: रामप्यारे भाऊंचा फोन होता. तेच, ज्यांची पाणीपुरी खाऊन जाँडीस होतो. ते सांगत होते, त्यांच्या रेग्यूलर कस्टमर्ससाठी त्यांनी आज एक तास एक स्कीम काढली आहे. दोन प्लेट शेवपूरी सोबत एक प्लेट शेवपूरी फ्री. या स्कीमची सुरूवात त्यांना मॉनिशापासून करायची इच्छा आहे. म्हणून ते त्यांचा ठेला घेऊन बिल्डिंगच्या बाहेर उभे आहेत. पण मॉनिशा तर... आता परत निघालेत दुसरं गिर्हाइक शोधायला...
त्याच वेळी बेडरूमचं दार उघडतं आणि ओरडत ओरडत मॉनिशा बाल्कनीकडे पळते...
मॉनिशा बाल्कनीमधून खाली वाकते. मग हळू हळू मागे वळून साहिलजवळ येऊन उभी राहते...
मॉनिशा: माझी युक्ती फसली ना... साहिल, तू सांगितलंस ना...
माया: नाही. या वेळीही मीच समजून गेले... नेहमीसारखं हॉलमध्ये कपड्यांचं प्रदर्शन भरलं नव्हतं, म्हणजेच मॉनिशा ते कपडे कुठेतरी वापरत असणार... किचनच्या शेल्फवर वडा-पावची पाकीटं दिसत आहेत. माझा साहिल मॉनिशावर कितीही प्रेम करो, पण एकटा असताना तो वडा-पाव नक्कीच खाणार नाही. And and... लग्नाआधी मॉनिशाबद्दल फक्त सांगताना रडणारा माझा साहिल, आज मॉनिशा गायब झाली तरी calm होता, composed होता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की डाळीत काहीतरी काळं-बेरं... म्हणजे शिऱ्यात गरम मसाला आहे... म्हणून मी फोनचं नाटक केलं. आणि मॉनिशा बेटा, से द प्लॅन हॅज फेल्ड... युक्ती फसली बोलणं इज टू डाऊन मार्केट...
मधूभाई: ए इंदू, ही बघ मॉनिशा. पण ही तर घरीच आहे... मग मी जिला बसमध्ये चढताना पाहिलं, ती कोण होती...
माया: मॉनिशा बेटा, आता तरी सांग, व्हॉट्स द कॅच...
मॉनिशा: मला माफ करा आई. बाबांसोबत लावलेल्या एका पैजेमुळे मला हे सगळं करावं लागलं...
इंदू: हाय मॉनिशा... काय बनवतेस...
मॉनिशा: हाय... खीर बनते आहे. साहिल आज आहे ना, म्हणून विचार केला काहीतरी गोडधोड बनवावं. जरा टेस्ट करून सांगा ना कशी बनली आहे...
साहिल: (हळू आवाजात...) मेलो...
दोन छोट्या बाऊलमध्ये थोडी थोडी खीर घालून मॉनिशा ते बाऊल टेबलवर ठेवते. इंदू आणि साहिल टेबलजवळ जात बाऊलमध्ये डोकावतात...
इंदू: मॉनिशा, खीर लाल रंगाची का दिसते आहे...
मॉनिशा: मी केशर घातलंय ना... म्हणून लाल रंग दिसत असेल...
इंदू: हाश... मॉनिशा, या खिरीत लाल मिरचीच्या पावडरचं पूर्ण पाकीट घातलंस की काय तू...
मॉनिशा: काय... पण मी तर केशर समजून...
इंदू: केशर समजून लाल मिरचीची पावडर... वाह...
मॉनिशा: हो. माझ्या गुरिंदर मावशीने गेल्या आठवड्यात केशर पाठवलं होतं ना... कुठलाच डब्बा रिकामा नव्हता. म्हणून ते केशर मी लाल मिरचीच्या रिकाम्या पाकिटात भरून फ्रीजमध्ये ठेवलं...
मॉनिशा: हायला... हे पाकीट तर इथे आहे...
साहिल: वेरी गुड मॉनिशा... यू आर इम...
मॉनिशा: माझी काहीच चूक नाही साहिल. सगळं कामाक्षीमुळे झालं...
साहिल: कोण कामाक्षी...
मॉनिशा: अरे कामाक्षी कश्यप... "उसका पति सिर्फ मेरा है" सीरियलची मेन वॅम...
साहिल: अच्छा, त्या कामाक्षीने घातली का लाल मिरची तुझ्या खिरीत...
मॉनिशा: नाही साहिल, केशर काढायला मी फ्रीज उघडलाच होता, की कामाक्षी हातात चाकू घेऊन बेडरूमकडे जाऊ लागली. पुढे काय होईल हे बघता बघता बहुतेक...
इंदू: मॉनिशा, तुझ्या अशाच चुकांमुळे माया सतत टोमणे मारत असते तुला, नाराज असते तुझ्यावर...
मॉनिशा: आई कशाही असोत. पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे...
इंदू: अरे ती महामाया स्वत:शिवाय आणि त्या चंबूकुमारशिवाय दुसऱ्या कोणावरच प्रेम करत नाही...
इंदू: लागली पैज...
इंदू मॉनिशासमोर हात ठेवतो. मॉनिशा पण इंदूशी हस्तांदोलन करत...
मॉनिशा: हो लागली...
साहिल: तर मॉनिशा, तुला दोन दिवसात सिद्ध करायचं आहे, की मॉम तुझी तितकीच काळजी करते जितकी आमची...
इंदू: मॉनिशा जर तू हरलीस तर...
मॉनिशा: तर... तर मी नीट वागेन. थोडक्यात, आईंच्या भाषेत मिडल क्लास सवयी सोडून देईन. पण बाबा, जर तुम्ही हरलात तर...
इंदू: तर मी रोसेशला घरातून बाहेर काढेन...
मॉनिशा: नाही बाबा, तुम्ही फक्त मान्य करा, की आई सर्वांवर तितकंच प्रेम करतात...
इंदू: डन...
इंदू पुन्हा हात पुढे करतो आणि मॉनिशा पुन्हा हस्तांदोलन करते. या वेळी मात्र साहिल त्याचा हात त्या दोघांच्या हातावर ठेवतो...
रोसेश: गोविंदराम फरसाण मार्ट का... होम डिलिवरी का नाही मागवली तुम्ही शॉपिंग सेंटरमधून...
मॉनिशा: ओ हो रोसेश भाऊजी... गोविंदराम स्वस्त आहे ना... तर मी जशी बिल्डिंगच्या बाहेर पडले, मला समोर मधूकाका दिसले. त्यांना पाहून मी घाबरले. एक बस येताना दिसली. मी त्या बशीत चढले आणि पुढच्याच स्टॉपला उतरले.
माया: बसमध्ये म्हण मॉनिशा... बशीत साऊंडस सो... एनिवेज, पुढे काय झालं...
मॉनिशा: मी जिथे उतरले तिथे समोरच एका हॉटेलमध्ये हरीकाका आणि मदनभाऊ मला चहा पिताना दिसले. मी लगेच बाबांना फोन केला. बाबांनी त्या दोघांनाही प्लॅनमध्ये सामील करून घेतलं. या दोघांची आड घेऊन मी घरी आले. आणि भूक लागली म्हणून आयस्क्रीम खाऊ लागले...
सोनिया: (सर्वांकडे पाहत...) पाहिलंत... थंड थंड आणि तोंड उघड-बंद होणं...
मॉनिशा: आयस्क्रीम खाता खाता मी टि. व्ही.वर कार रेसिंग पाहत होते. मी इतकी गर्क होते की चमचा समजून मी बोटच चावलं...
सोनिया: (पुन्हा सर्वांकडे पाहत...) फॉर व्हीलर आणि डोळ्यात पाणी... पाहिलंत...
मॉनिशा: तेवढ्यात आईंच्या घराची बेल वाजलेली मला ऐकू आली. हे हरीकाका आणि मदन भाऊच असणार हे मी ओळखलं... पुढे काय झालं तुम्हा सर्वांना माहीतच आहे...
इंदू: आहाहा... मायादेवी... आत्ता पाच मिनिटांपूर्वी तर तू खोलीत उदास झाली होतीस...
माया: ते तर मी... खोलीत... तुला हे कसं माहीत...
इंदू: कन्सील्ड माईक आणि कॅमेऱ्यामुळे... आवर रूम वॉज बग्ड माया...
इंदू: डोंट वरी माया. रात्री माईक आणि कॅमरा बंद होते...
इंदूची पीठ थोपटून सर्वांकडे पाहत माया म्हणते...
माया: एनीवेज आय एडमिट... मॉनिशाच्या नसण्यामुळे मला थोडं टेन्शन नक्कीच आलं होतं...
साहिल: या दोघी कशाही असोत, पण एकमेकींवर खूप प्रेम आहे यांचं...
रोसेश: धिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन... आपण आपलं तेच गाणं गाऊन या मोमेंटला सेलिब्रेट करायचं का...
इंदू, माया, साहिल, मॉनिशा: येस...
इंदू आणि साहिल: हे जे तुम्हाला दिसतात... हे ते अजिबात नाहीत... बघा यांना व्यवस्थित... वेगळेच ते भासतात...
माया आणि मॉनिशा: वाणीने असतील जितके गोडूले हे... मनातून कधी कधी असती कडूले हे...
इंदू: सोफेस्टिकेशन यांचं आडनाव...
साहिल: हिपॉक्रसीमध्ये सारे जगती हे...
मॉनिशा: क्षणात हसतात हे क्षणात भांडतात हे...
माया: यू कांट से व्हेन, हाऊ आणि व्हाय...
इंदू आणि माया एकत्र नाचू लागतात तर साहिल आणि मॉनिशा एकत्र नाचू लागतात…
चौघंही एकत्र: साराभाई व्हर्सेस साराभाई... साराभाई...
एकटा उभा रोसेश त्या चौघांना बघतो. मग जमिनीवर पाय आपटत...
रोसेश: व्हर्सेस साराभाई...

No comments:
Post a Comment