बाजीप्रभू देशपांडे आणि ३०० बांदलांच्या रक्तरंजित बलिदानाने पवित्र झालेल्या घोडखिंडीचा इतिहास आणि त्याची पार्श्वभूमी सांगणारा चित्रपट म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, "पावनखिंड..."
सिद्दी जोहरने पन्हाळगडाला घातलेला वेढा फोडून शिवाजी महाराज निसटले. महाराजांना विशालगडावर सुखरूप पोहोचता यावं यासाठी बांदलसेना आणि बाजीप्रभू देशपांडे जिवावर उदार होऊन लढले, हा इतिहास तर सर्वांनाच माहित आहे. चित्रपटात मात्र या कथेची मांडणी वेगळ्या पद्धतीने केली गेली आहे...
शिवाजी महाराज पावनखिंडीचा इतिहास संभाजी महाराजांना सांगत असतात तिथून चित्रपट सुरू होतो आणि flashback मधूनच कथानक पुढे सरकत जातं. मध्यंतरापूर्वीचा भाग हा सिद्दी जोहरने पन्हाळ्याला घातलेला वेढा आणि त्या वेढ्यातून सुटण्यासाठी शिवाजी महाराज व बहिर्जी नाईक यांनी आखलेल्या योजनेवर प्रकाश टाकतो. उत्तरार्धात मात्र पन्हाळ्याहून महाराज बांदलांसह निघून विशालगडावर पोहोचेपर्यंतचा कथाभाग दिसतो...
मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, हरीश दुधाडे, अंकित मोहन, अजय पूरकर, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना, समीर धर्माधिकारी, हे नेहमीचे शिलेदार तर आहेतच. पण या वेळी क्षिती जोग, वैभव मांगले, अशा अजून काही कलावंतांनी हजेरी लावलेली आहे. क्षिती जोग यांचे मोजून दोन-तीन सीन आहेत चित्रपटात. पण त्यातही त्यांना मिळालेली व्यक्तिरेखा त्यांनी छान साकारली आहे. अजय पूरकर यांनी तर बाजीप्रभूंची व्यक्तिरेखा जीव ओतून साकारलेली जाणवते. चित्रपटातले संवादही जबरदस्त लिहिले गेले आहेत. काही संवादांमुळे अंगावर काटा येऊन हाताच्या मुठी वळतात, तर काही संवादांमुळे डोळ्यांना अश्रूंची धार लागते...
अजय पूरकर आणि काही मंडळी सकारात्मक भूमिकेत व समीर धर्माधिकारी आणि काही मंडळी नकारात्मक व्यक्तिरेखेत, असाच पायंडा आजवरच्या तीनही चित्रपटांमध्ये पडलेला दिसतो. समीर धर्माधिकारी आणि आस्ताद काळे यांच्या वेशभूषेत, केशभूषेत आणि संवाद फेकीत चांगला बदल केला गेला आहे, पण व्यक्तिरेखा एकसूरी झाल्या आहेत. समीर धर्माधिकारी यांची वेशभूषा आणि देहबोली पाहून, "Pirates of Caribbean" मधल्या Captain Jack Sparrowची आठवण होते. वास्तविक व्यक्तिरेखांमध्ये बदल करताना सकारात्मक व नकारात्मक भूमिकांचाही विचार झाला असता तर परिणाम अधिक चांगला झाला असता असं मला वाटतं...
एक गोष्ट मात्र मला आवडली. "फर्जंद" आणि "फत्तेशिकस्त" प्रमाणे या वेळीसुद्धा केसर आणि किस्ना बहिर्जी नाइकांचे मदतनीस म्हणून दिसतील अशी अपेक्षा होती. पण या दोघांच्या ऐवजी नवा मदतनीस पडद्यावर दिसला. बहिर्जी नाईक ही व्यक्तिरेखा त्याच त्याच मदतनीसांचा वापर करते हेच आधीच्या दोन चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं. पण इथे वेगळा गडी दिसल्याने तो एक सुखद अपेक्षाभंग ठरला. दुसरी गोष्ट जी जाणवली ती म्हणजे, चालू घटनेखेरीज इतर कुठल्यातरी घटनेचा उल्लेख. उधाहरणार्थ "फत्तेशिकस्त"मध्ये एकदम सुरुवातीला पावनखिंडीचा उल्लेख होता आणि या वेळी अधून-मधून पडद्यावर महाराजांच्या हातातली वाघनखं दिसली. पुढचा चित्रपट प्रतापगडचा वेढा आणि अफ़्ज़ल ख़ान या घटेनेवर असू शकेल कदाचित. पण आवडेल पहायला...
या वेळी आधीच्या दोन चित्रपटांच्या तुलनेत महिला कलावंतांचा जास्त भरणा दिसला. महिला कलावंतांमध्ये रंगलेली दृष्य आणि चित्रपटातल्या जोडप्यांची काही हलकी-फुलकी दृष्य पाहताना जे.पी.दत्ता यांच्या "बॉर्डर" आणि "LOC" या चित्रपटांची आठवण होते, जिथे नायक आपापल्या नायिकांसोबतचे काही प्रसंग आपल्या साथिदारांना सांगत असतात. यामुळे उगाचंच चित्रपटाची लांबी वाढल्यासारखी वाटते. उलट सिद्दी जोहर आणि रुस्तम-ए-ज़मान यांच्या पडत असलेली फूट, हा भाग फक्त एकाच दृष्यापुरता दिसला. महाराजांनी निसटण्यासाठी या फुटीचा वापर कसा करून घेतला हे दाखवायला हवं होतं...
चित्रपट "Adult" श्रेणीतला नाही, पण लढायांची दृष्य आणि रक्तपात इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की मुलं कदाचित घाबरू शकतील. पण तरीही, बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशिद आणि बांदलसेना यांची शौर्यगाथा दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखीत, "पावनखिंड" हा चित्रपट नक्कीच पहावा...
@ अनिकेत परशुराम आपटे.