चोर आणि पोलीस यांच्यावर बेतलेले प्रसंग आपण अनेक चित्रपटांत पाहतो. बऱ्याच वेळेला हे प्रसंग, चित्रपटच्या मुख्य कथानकाचा एक भाग असतात. पण काही चित्रपट असे असतात, ज्यांत चोर आणि पोलीस यांच्यावर जास्त फोकस दिला जातो. असेच तीन चित्रपट म्हणजे यश राज फिल्म्स या नावाखाली बनलेले "धूम", "धूम २" आणि "धूम ३..."
धूम (२००४)...
शिताफीने चोऱ्या करून सुसाट बाईक्सवर पळून जाणारी कबीर (जॉन एब्राहम) व त्याची गँग, आणि अली (उदय चोपड़ा) या उडाणटप्पू बाइकरच्या मदतीने त्यांचा पिच्छा पुरवणारा ए.सी.पी. जय दिक्षीत (अभिषेक बच्चन), असं कथानक. त्या काळी इतर कथांमध्ये हे कथानक नाविन्यपूर्ण असल्याने चित्रपटाचं अप्रूप होतं. जबरदस्त वेगाच्या बाइक्स या चित्रपटाचा यू.एस.पी. होता. बाईकसोबतची थ्रिलिंग पाठलागाची दृश्य तर अप्रतीम वठली होती...
चित्रपटातली ईशा देवलची भूमिका कथेला छान वळणं देत होती. थोड्याशा ग्रे शेडने नटलेली शीना शेवटी पैसा सोडून प्रेम स्वीकारते हा भागही छान जमून आला. शिवाय, चित्रपटात थोडे वेगळे रंग भरणारी आणि गाणी-घेणी करणारी स्वीटीची (रिमी सेन) व्यक्तिरेखाही छान रंगतदार झाली होती. अर्थात बंगाली भाषेचा वापर, एखादं प्रणय दृश्य आणि गाणी, याखेरीज स्वीटीला कथानकात काहीच वाव नव्हता...
धूम २ (२००६)...
वेगवेगळं वेषांतर व हावभाव करून अशक्यप्राय चोऱ्या करणारा आर्यन (हृतिक रोशन), आणि त्याच्या मागे लागलेले, या वेळी पोलिसात भरती झालेला अली व ए.सी.पी. जय दिक्षीत असं कथानक. हृतिक रोशनचा "धूम २" असा हा चित्रपट ओळखला गेला. याचं मुख्य कारण होतं हृतिक रोशन यांची अदाकारी आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा, ज्या चित्रपटासाठी सर्वात मोठ्या यू.एस.पी. ठरल्या...
कथेत, शोनाली व मोनाली या दुहेरी व्यक्तिरेखा बिपाशा बासूने छान रंगवल्या, पण या दोघींनीही आर्यनला पकडण्यात काही हातभार लावला असं जाणवलं नाही. फक्त उदय चोपड़ा फुकट जाऊ नये म्हणून केलेली ही तरतूद होती असं वाटलं. त्याउलट ऐश्वर्या राय-बच्चन यांनी साकारलेली सुनहरी ही व्यक्तिरेखा कमाल रंगली. मुख्य कथानकाला शेवटपर्यंत वेगवेगळी वळणं देण्यात या व्यक्तिरेखेचा सिंहाचा वाटा होता. रिमी सेनची स्वीटी यावेळी थोडी आऊट फोकस वाटली. चित्रपटाच्या प्रमुख नायकाला नायिका आहे, हे दाखवण्यासाठी फक्त सुरुवातीच्या काही प्रसंगांमध्ये स्वीटीचा वापर केला गेला असं वाटलं...
धूम ३ (२०१३)...
वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बँकेवर सराईत दरोडा घालणारा साहिर (आमिर ख़ान) आणि त्याला रोखण्यासाठी विशेष नेमणूक झालेल्या ए.सी.पी. जय दिक्षीत व अलीने केलेले शर्थीचे प्रयत्न, हे कथानक. तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट त्याच्या आधीच्या दोन भावंडांपेक्षा सरस असला, तरी "धूम ३" विशेष लक्षात राहिला आमिर ख़ान यांच्या जबरदस्त अदाकारीमुळे आणि त्यांनी वापरलेल्या हायटेक बाईकमुळे. हीच बाईक चित्रपटाचा सर्वात मोठा यू.एस.पी. ठरली...
चित्रपटात थरारासोबतच भावनिक गुंतागुंतही बऱ्यापैकी दाखवली गेली होती. भावंडांचं नातं, मैत्रीचं नातं आणि प्रेम, या तीनही आघाड्यांवर आमिर ख़ान यांनी चांगलीच बाजी मारली. एकाच दृश्यात, एकाच व्यक्तीमधून दोन वेगळ्या छटा दाखवताना त्यांनी कमाल केली. शिवाय कतरीना कैफने साकारलेली आलिया ही व्यक्तिरेखादेखील कथेतली भावूकता जपण्यात मोलाची मदत करते. चित्रपटातल्या दोन्हीही नायकांना प्रणय प्रसंग दाखवण्यासाठी काहीच वाव नसल्याने त्यांच्या नायिकांना पूर्ण हद्दपारच केलेलं दिसतं...
संगीत व पार्श्वसंगीत...
प्रीतम, सलीम-सुलेमान आणि द्वारक वॉरियर या मंडळींनी तीनही चित्रपटांची सांगितिक बाजू छान सांभाळली आहे. अप्रतीम नृत्याविष्कार असलेली उडत्या चालींवरची गाणी असो किंवा तीनही चित्रपटांची signature tune असो, या त्रिकुटाने भन्नाट काम केलं आहे. सर्व गाणी, चित्रपटांच्या वेगाला साजेशी असल्याने, गाण्यांमुळे चित्रपट भरकटले असं कुठेही वाटत नाही...
हाणामारी व साहसदृश्य...
तीनही चित्रपटांमधली साहसदृश्य अत्यंत उत्कंठावर्धक आहेत. द्वंद्वयुद्ध असो किंवा पाठलागाची दृश्य असो, प्रत्येक दृश्य खुर्चीला खिळवून ठेवणारं आहे. तीनही चित्रपटांमधली स्टाईलबाज हाणामारी चर्चेचा विषय बनली. ऍलन अमीन या इसमाने चित्रपटांमधली ही बाजू बखूबी सांभाळली आहे. धिम्या गतीने येणारे पंचेस, किक्स आणि हवेत गटांगळ्या खात जमिनीवर स्थिरावणारे नायक किंवा खलनायक, हे पडद्यावर पाहताना कमाल अनुभव येतो...
लोकेशन्स...
तीनही चित्रपटांसाठी सर्वात मोठी हायलाईट ठरली ती चित्रपटांत वापरलेली सुंदर लोकेशन्स. "धूम"मध्ये मुंबईचे रस्ते व गोव्याचे काही भाग दाखवण्यात आले. "धूम २"मधल्या चोराला जगावर अधिराज्य गाजवायचं असतं. त्यामुळे जगभरातली वेगवेगळी लोकेशन्स दिसली. "धूम ३"ला सुरुवातीला थोडा दाक्षिणात्य टच असल्याने तशा प्रकारची घरं दाखवली गेली पण पुढे पुढे शिकागो व त्याच्या आस-पासची सुंदर लोकेशन्स पडद्यावर येत राहिली...
सिनेमॅटोग्राफी...
प्रत्येक चित्रपटात छायांकन म्हणजेच सिनेमॅटोग्राफीला खूप महत्व असतं. नीरव शाह, विकास शिवरामन आणि सुदीप चॅटर्जी या त्रिकुटाने ही जबाबदारी उत्तम सांभाळली आहे. कॅमेरा एँगल्स म्हणू नका, लाँग शॉट्स म्हणू नका, क्लोज शॉट्स म्हणू नका, एयर शॉट्स म्हणू नका, सगळ्याच बाबतीत तीनही चित्रपटांचं छायांकन उत्तम झालं आहे...
नायक...
कुठल्याही नायकप्रधान चित्रपटात, नायक किंवा हिरो महत्वाचा असतो. त्याच्यावर जास्त फोकस दिला जातो. त्याला जास्त फुटेज दिलं जातं. पण "धूम ट्रिलॉजी"मध्ये चित्र वेगळं दिसलं. तीनही चित्रपटांत प्रमुख नायकाला हळू हळू कमी लेखल्याचं जाणवतं. ए.सी.पी. जय दिक्षीतने "धूम"मध्ये ज्या हुशारीने चोरांना अडकवलं आणि पकडलं, सुरुवातीचा काही वेळ सोडल्यास तसं काही "धूम २"मध्ये जास्त दिसलं नाही. चित्रपटाच्या एकदम शेवटी जय सत्य उघड करतो तेव्हा ते कुठेतरी पुन्हा जाणवलं. "धूम ३"मध्ये तर जयला जवळ जवळ बाजूलाच सारलं गेलं आहे. चोर स्वत: शरण येतो तेव्हा कुठे तो जयच्या हाती लागतो...
खलनायक...
तीनही चित्रपटांत सर्वात दमदार व्यक्तिरेखा जर कोणाच्या असतील तर ते होते चित्रपटातले प्रमुख खलनायक अर्थात चोर. "धूम"मधला कबीर, "धूम २"मधला आर्यन आणि "धूम ३"मधला साहिर, असा चढता ग्राफ आपल्याला दिसतो. कबीर आणि आर्यनला अदाकारीसाठी तितकीशी संधी नव्हती. पण साहिरला मात्र भरपूर वाव होता. तीनही चोरांचे तीनही चित्रपटातले प्रवेश अर्थात एंट्री वेगळ्या होत्या. तिघांचाही अंत मात्र एकाच पद्धतीने, ऊंचावरून खाली पडून झाला. पण जबरदस्त व्यक्तिरेखा लाभलेल्या खलनायकांनी तीनही चित्रपट खाऊन टाकले हे नक्की...
एकंदरीत, यश राज फिल्म्सच्या पोतडीतून निघालेल्या "धूम", "धूम २" व "धूम ३" या तीनही चित्रपटांनी लोकप्रियता मिळवत, प्रचंड गल्ला जमवत चोर-पोलिसचा भन्नाट खेळ रंगवला...
@ अनिकेत परशुराम आपटे.














