Friday, 14 May 2021

धकधक गर्ल...

सर्वांच्या दिलांची धड़कन असणारी आणि आजही आपल्या मधाळ हास्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच आपल्या सर्वांच्या परिचयाची, माधुरी दिक्षीत-नेने...


१९८४ साली प्रदर्शित झालेल्या "अबोध" या चित्रपटातून माधुरी दिक्षीत-नेने यांनी रुपेरी पडद्यावर आपलं पहिलं पाऊल ठेवलं. चित्रपट फारसा चालला नाही पण माधुरीच्या अभिनयाची मात्र स्तुती झाली. त्यांचा सुरुवातीचा काळ बऱ्यापैकी खडतर होता. "अबोध" नंतर, "आवारा बाप", "मानव हत्या", "स्वाती", "उत्तर दक्षिण" अशा अयशस्वी चित्रपटांची जणू रांगच लागली होती. माधुरी दिक्षीत-नेने यांच्या अदाकारीला तर दाद मिळत होती पण म्हणावं तेवढं यश मिळत नव्हतं...


अखेर, १९८८ साली एक चमत्कार घडला. "तेज़ाब" प्रदर्शित झाला. हा चित्रपट अनिल कपूरने पूर्ण खाऊनच टाकला होता पण त्यातल्या "एक दो तीन..." या गाण्याने माधुरी दिक्षीत-नेने यांना रातोरात स्टार पदावर नेऊन बसवलं. माधुरी दिक्षीत-नेने यांची अदाकारीही अनिल कपूर यांच्या तोडीसतोड वठली. पुढे "राम लखन", "दिल", "परिंदा", "त्रिदेव", "किशन कन्हैया" असे अनेक हिट चित्रपट देत माधुरी दिक्षीत-नेने, एक कमर्शियल लीड ऍक्ट्रेस म्हणून लोकप्रिय झाल्या...

एका बाजूला, "प्यार का देवता", "खतरों के खिलाड़ी", "दयावान", "वर्दी", "ज़िंदगी एक जुआ", "जीवन एक संघर्ष" असे चित्रपट एकामागून एक आपटत असताना दुसरीकडे "बेटा", "राजा", "प्रहार", "थानेदार", "खलनायक" या चित्रपटांनी माधुरी दिक्षीत-नेने यांचं अग्रस्थान टिकवून ठेवलं. पर पिक्चर अभी बाकी थी दोस्तो... माधुरी दिक्षीत-नेने यांच्या अभिनयाने सजलेले दोन सर्वात यशस्वी चित्रपट अजून यायचेच होते. ते चित्रपट होते, १९९४ सालचा "हम आपके हैं कौन...!!!" आणि १९९७चा "दिल तो पागल है..."


खान त्रिकूटापैकी दोघं, म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांची चलती असतानाही या दोन चित्रपटांत माधुरी दिक्षीत-नेने यांनी आपल्या अभिनयाने जबरदस्त छाप पाडली. सॉरी सल्लू भाई, पण आजही "हम आपके हैं कौन...!!!" लक्षात राहतो तो माधुरी दिक्षीत-नेने यांच्या अफलातून अदाकारीमुळेच. "साजन" असो किंवा "अंजाम", "देवदास" असो किंवा "दिल तेरा आशिक़", माधुरी दिक्षीत-नेने यांनी आपल्या सहज सुंदर अदाकारीने चित्रपट व प्रेक्षकांवर वेगळाच ठसा उमटवला...


नायकासोबत फिरणारी नायिका, हसणारी-बागडणारी नायिका या भूमिका साकारताना, "प्रेमग्रंथ", "मृत्यूदंड", "गुलाब गँग", "बकेट लिस्ट" अशा वेगळ्या धाटणीच्या काही चित्रपटांमधून त्यांच्या वाट्याला आलेल्या वेगळ्या भूमिकाही माधुरी दिक्षीत-नेने यांनी लीलया वठवल्या. "बकेट लिस्ट" हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असूनही माधुरी दिक्षीत-नेने यांनी तो छान पेलला. "बकेट लिस्ट"च नाही, तर "कलंक" या चित्रपटातली त्यांची चरित्र व्यक्तिरेखाही बऱ्यापैकी वाखाणली गेली होती...


नायिका व सहनायिका म्हणून ७०हून अधिक चित्रपटांत झळकताना माधुरी दिक्षीत-नेने यांना अजून एक वेगळी ओळख मिळाली. ती ओळख होती बहारदार नृत्यांगनेची. अनेक गाणी त्यांच्यावर चित्रीत झाली, पण "एक दो तीन...", "मेरा पिया घर आया...", "अखियाँ मिलाऊँ कभी अखियाँ चुराऊँ...", "बड़ी मुश्किल बाबा बड़ी मुश्किल...", "चोली के पीछे क्या है...", "के सरा सरा...", "दिदी तेरा देवर दिवाना..." अशा गाण्यांना माधुरी दिक्षीत-नेने यांच्या दिलखेचक नृत्याविष्कारांचा टच मिळाल्यामुळे त्यांनी वेगळीच ऊंची गाठली...

"बेटा" चित्रपटातल्या "दिल धक धक करने लगा..." या गाण्यातल्या माधुरी दिक्षीत-नेने यांच्या अदांनी तर त्यांना 'धकधक गर्ल' हे बिरूदच मिळवून दिलं. मनमोहक हसू असणाऱ्या, 'कथ्थक' या नृत्यप्रकाराची उत्तम जाण असणाऱ्या आणि अनेकांच्या हृदयातल्या एका कोपऱ्यात कायमचं स्थान मिळवणाऱ्या या अप्सरेचा आज वाढदिवस. 'धकधक गर्ल' माधुरी दिक्षीत-नेने यांना आजच्या दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...


"बहुत प्यार करते हैं... तुमको सनम...
क़सम चाहे लेलो... ख़ुदा की क़सम..."

@ अनिकेत परशुराम आपटे.

Monday, 3 May 2021

भय इथले कळतच नाही...

दोन समांतर कथानकं आणि त्यांना जोडणारा एक दुवा, म्हणजे भय. हीच पार्श्वभूमी आहे २०१८ साली प्रदर्शित झालेल्या राहुल भाटणकर दिग्दर्शित, "भय" या चित्रपटाची...

गोकूळ (अभिजीत खांडकेकर) आणि मीरा जोशी (स्मिता गोंदकर) हे एक सुखवस्तू कुटुंब. एका बाजूला जिथे मीरा गरोदर असते तिथे दुसऱ्या बाजूला गोकूळ एका मानसिक आजाराने ग्रस्त असतो. Paranoid Schizophrenia या आजाराच्या विळख्यात अडकलेला गोकूळ सतत कसल्या ना कसल्या भितीच्या सावटाखाली वावरत असतो. याच भितीपोटी गोकूळच्या हातून असं काहीतरी घडतं, की तो पुरता हादरतो आणि त्याचा मानसिक तोल ढासळतो...

दुसरीकडे मंत्री जगतापच्या (उदय टिकेकर) सांगण्यावरून भरत टांगे (विनीत शर्मा) नावाचा एक गुंड एका बिल्डरच्या भावाला भर रस्त्यात गोळ्या घालून ठार करतो. आता आपण यातून वाचत नाही हे समजल्यावर भरत त्या मंत्र्याचीच मदत मागतो. त्याच वेळी ही केस हाताळणाऱ्या इं. विश्वासला (सतीश राजवाडे) भरतची खबर लागते आणि आपल्या साथिदारांसह तिथे अचानक धाड टाकून इं. विश्वास भरतचा एन्काऊंटर करतात...

दोन्ही कथानकं एकसारखीच वेगवान आहेत. पण चित्रपटातला कच्चा दुवा म्हणजे चित्रपटाची पटकथा. दोन्ही कथानकं पहिल्यापासून शेवटपर्यंत समांतर चालत राहतात पण ही कथानकं एकत्र येतील किंवा एकमेकांत गुंततील असं कुठेच दिसत नाही. दोन्हीही कथानकांना एकत्र आणणारा एक प्रसंग चित्रपटात येतो खरा, पण त्या प्रसंगाचा चित्रपटात काहीच उपयोग झालेला नाही...

चित्रपटात जर गोकूळचा आजार आणि त्यामुळे घडत गेलेले प्रसंग यांचा वापर केला असता किंवा भरत टांगे विरुद्ध इं. विश्वास इतकाच कथाभाग दाखवला गेला असता, तर एक साकोलॉजिकल थ्रिलर किंवा कॉप थ्रिलर म्हणून हा चित्रपट नक्कीच उजवा ठरला असता. दोन्हीही कथानकं एकत्र दाखवायच्या नादात, लेखकाला काय म्हणायचं आहे तेच समजलं नाही...

पटकथेप्रमाणेच चित्रपटाचं संगीतही मनोरंजनापेक्षा स्पीडब्रेकरचं काम जास्त करतं. चित्रपटात तीन गाणी आहेत. कथानकांतला वेग आणि उत्कंठा पूर्णच घालवण्याचं काम ही गाणी करतात. चित्रपटात येणारं पहिलंच गाणं, कथेशी काडीचा संबंध नसताना तिथे का आलं, हेच एक न सुटणारं कोडं आहे...

चित्रपटात बघण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. पहिली आहे चित्रपटातली साहसदृष्य आणि दुसरी आहे अभिजीत खांडकेकर यांची अदाकारी. गोंधळलेल्या, भेदरलेल्या, कोलमडलेल्या गोकूळची व्यक्तिरेखा अभिजीत खांडकेकरांनी छानच वठवली आहे. एकंदरीत, गोंधळलेल्या पटकथेत गुंतलेला, नितीन सुपेकर लिखीत, "भय" हा चित्रपट, वन टाईम वॉच म्हणून ठिक आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.