Saturday, 20 March 2021

मर्दानी राणी...

घोगरा आवाज आणि अप्रतीम अदाकारी या दोघांचं सुंदर मिश्रण म्हणजेच आजच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. अर्थात आपल्या सर्वांच्या परिचयाच्या, राणी मुखर्जी...

प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांची चुलत बहिण, जेष्ठ निर्माते शशधर मुखर्जी यांची चुलत नात आणि प्रसिद्ध दिग्दर्शक राम मुखर्जी यांची कन्या असल्याने राणी मुखर्जी यांचं चित्रपटसृष्टीशी पहिल्यापासूनच नातं होतं. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या "राजा की आयेगी बारात" या चित्रपटाद्वारे राणी मुखर्जी यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. आपल्या सुरुवातीच्या काळात, "बादल", "हे राम", "मेहेंदी", "कहीं प्यार ना हो जाए", "बस इतनासा ख़्वाब है" अशा चित्रपटांमधून राणी मुखर्जी झळकत राहिल्या. "मेहेंदी" हा चित्रपट सोडला तर इतर चित्रपटांत त्यांना जास्त वाव मिळाला नाही...

राणी मुखर्जी यांच्या घोगऱ्या आवाजामुळे त्या जास्त तग धरू शकणार नाहीत असं काहींचं मत होतं. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या "गुलाम" या चित्रपटात विक्रम भट यांनी राणी मुखर्जी यांना नायिकेची भूमिका दिली खरी, पण त्यांच्या संवादांसाठी voice over घेऊन त्यांनी चित्रपटाची गाडी पुढे नेली. आपल्या आवाजाला प्रयत्नपूर्वक सुधारून राणी मुखर्जी, "कुछ कुछ होता है" या चित्रपटात झळकल्या आणि त्यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. "नायक", "हम-तुम", "साथिया", "बंटी और बबली", "हद कर दी आपने" या चित्रपटांमधून प्रमुख नायिकेच्या भूमिकेत त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली...

"कुछ कुछ होता है" या चित्रपटातल्या टीनाच्या भूमिकेला अनेक अभिनेत्रींनी नाकारलं होतं. तेव्हा त्या भूमिकेसाठी स्वत: शाहरुख़ ख़ान व प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक आदित्य चोपड़ा यांनी राणी मुखर्जी यांचं नाव सुचवलं. याच चित्रपटाच्या चित्रिकरणादर्म्यान राणी मुखर्जी व आदित्य चोपड़ा यांचे संबंध अधिक घट्ट होत गेले. लोकांसमोर ते काही काळापुरतं आपलं नात लपवत राहिले पण अखेर २०१४ साली एका खाजगी समारंभात ही जोडगोळी विवाहबद्ध झाली. हा विवाह एक आश्चर्याचा सुखद धक्काच होता सर्वांसाठी...

सौंदर्यवान नायिका, मुख्य नायिकेसोबतची किंवा नायकाची मैत्रिण, या एकसूरी भूमिका निभावत असताना काहीतरी वेगळं करण्याचा राणी मुखर्जी यांचा ध्यास फळाला आला आणि "चलते चलते", "युवा", "वीर-ज़ारा" या चित्रपटांमधून थोड्या हटके अशा व्याक्तिरेखा साकारताना त्या दिसल्या. राणी मुखर्जी यांच्या कारकिर्दीतला अत्यंत महत्वाचा असा मैलाचा खडक ठरला २००५ साली प्रदर्शित झालेला "ब्लॅक". एका अंध-मूक-बधिर मुलीची कणखर व्यक्तिरेखा राणी मुखर्जी यांच्या वाट्याला आली. एकही संवाद नसताना फक्त अदाकारी आणि देहबोली यांचा वापर करत राणी मुखर्जी यांनी 'मिशेल' ही कठिण व्यक्तिरेखा अत्यंत लीलया पेलली. असं म्हणतात, की या भूमिकेमुळे अमिताभ बच्चन यांची अदाकारीही झाकोळली गेली होती...

यशोशिखरावर विराजमान असताना राणी मुखर्जी यांचे "थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक", "तारा रम पम", "लागा चुनरी में दाग", "कभी अल्विदा ना कहना", "दिल बोले हड़िप्पा", "अय्या" असे एकामागून एक चित्रपट आपटत गेले आणि राणी मुखर्जी यांच्या चढत्या आलेखाला थोडा धक्का बसला. पण त्यानंतर प्रदर्शित झालेल्या "हिचकी", "नो वन किल्ड जेसिका", "मर्दानी" व "मर्दानी २" या वेगळ्या कथानक असलेल्या चित्रपटांनी राणी मुखर्जी यांना वेगवेगळ्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर आणलं आणि पुन्हा यशाच्या वाटेवर नेऊन ठेवलं. "मर्दानी" व "मर्दानी २" या चित्रपटांमधल्या डॅशिंग 'शिवानी शिवाजी रॉय' या व्यक्तिरेखेने तर समस्त प्रेक्षकांना भुरळच पाडली...

आज २१ मार्च. राणी मुखर्जी यांचा वाढदिवस. या "मर्दानी"ला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

ख़ूब लढ़ो मर्दानी...
बनो फिल्म जगत की रानी...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 13 March 2021

भयाचा फूस झालेला बार...

लग्नासंदर्भात अनेक ठिकाणी अनेक प्रथा रूढ असतात. काही प्रथा कायद्याला धरून असतात तर काही कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या असतात. आता, अशाच एका चिवित्र प्रथेवर आधारलेली एक गोष्ट...

एका आटपाट नगरात एक चिवित्र प्रथा असते. मुलाला जी मुलगी आवडते, त्या मुलीला पळवून तिचं लग्न त्या मुलाशी लावलं जातं. नगरातला एक गुंड आणि त्याचे दोन साथिदार हे पळवा-पळवीचं काम करत असतात. हे दोन साथिदार एकमेकांचे घनिष्ट मित्र असतात. एकदा त्या गुंडाच्या सांगण्यावरून हे दोन साथिदार मित्र एका मुलीला पळवतात. इथे येतो कहानी में ट्विस्ट...

पळवलेल्या त्या मुलीला, लग्नासाठी आसूसलेल्या एका चेटकिणीने भारलेलं असतं. एक भयावह आणि मजेशीर अशा खेळाला सुरुवात होते. जिथे एका घाबरट मित्राला त्या चेटकिणीचं बिभत्स रूप दिसतं तिथे दुसऱ्या मित्राला त्याच चेटकिणीच्या प्रेमळ रूपाचा भास होत राहतो. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आणि त्या मुलीला चेटकिणीच्या पाशातून सोडवण्यासाठी तो घाबरट मित्र उपाय करणार इतक्यात...

कथा आहे मृघदीपसिंह, लांबा आणि गौतम मेहरा लिखीत, "रुही" या चित्रपटाची. भँवरा पांडे, रुही (जान्हवी कपूर) आणि कट्टानी क़ुरेशी या तीन मुख्य पात्रांभोवती कथा पिंगा घालत राहते. मध्ये मध्ये येणाऱ्या इतर चित्रपटांच्या गाण्यांतील काही ओळी कथेत छान रंग भरतात. ती येणारी गाणी जरी रोम्यांटिक असली, तरी त्या गाण्यांमुळे या चित्रपटात विनोद निर्मिती अधिक होते. याउलट, चित्रपटातील नवी गाणी काही खास करतील असं वाटत नाही...

भय दाखवण्यासाठी केलेली वातावरणनिर्मिती आणि धक्कातंत्राचा वापर उत्कंठा निर्माण करण्यात यशस्वी होतात खरे पण ते तेवढ्यापुरतंच राहतं. रोमँटिक दृष्य मग भितीदायक दृष्य आणि नंतर येणारं हलकं-फुलकं विनोदी दृष्य हे समीकरण काही काळासाठी छान वाटतं, पण पुढे पुढे याचा अतिरेक होत जातो आणि मग हेच समीकरण कंटाळवाणं होत जातं. "रुही"च्या आधी प्रदर्शित झालेल्या "स्त्री" या चित्रपटात भयाचा जो प्रभावी वापर दिसला, तसा या चित्रपटात दिसला नाही...

एका ठिकाणी कथानक कमकुवत वाटतं. भँवरा भलेही रुहीच्या प्रेमात पडतो, पण चेटकिणीच्या प्रेमात आंधळा झालेला कट्टानी तितकासा पटत नाही. एखादी चेटकीण अचानक समोर आल्यावर सर्वसाधारण माणसाचा थरकाप उडतो. पण इथे कट्टानीमात्र त्या चेटकिणीला पाहताच तिच्याकडे ओढला जातो. हे थोडंसं अनाकलनीय वाटतं. अर्थात, कथेला एक वेगळं वळण देण्यासाठी हे केलं गेलं हे मात्र खरं...

एक मुद्दा राहतो अदाकारीचा. चित्रपटात इतर कलावंतांच्या भूमिका बऱ्यापैकी वठल्या आहेत. राजकुमार राव व वरूण शर्मा यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत पण जन्हवी कपूरमात्र थोडी कमी पडते. तिला मिळालेल्या व्यक्तिरेखेत जास्त संवाद नाहीत, पण जे आहेत त्यातही भय किंवा विवशता कमी जाणवते. अनेक दृष्यात जान्हवी कपूरला अदाकारीसाठी उत्तम वाव होता पण तिला ती संधी साधता आली नाही. इथे रंगभूषा म्हणजेच मेकपने दोनशे टक्के काम करून योग्य प्रभाव पाडला आहे...

एकंदरीत, हार्दिक मेहता दिग्दर्शित, "रुही" हा चित्रपट म्हणजे विनोदाचं कोंदण लाभलेला भयाचा फुसका बार म्हणावा असाच आहे. तो पहावा की न पहावा, that is the question...

@ अनिकेत परशुराम आपटे.