Wednesday, 24 February 2021

सुखाचा कवडसा लाभलेली शोकांतिका...

अनेक हिंदी चित्रपटांच्या कथा, या शोकांतिका असतात. पण काही चित्रपट असे येतात, ज्यात शोकांतिकेसोबतच सुखाचा एक हलकासा कवडसा पण असतो. असाच एक चित्रपट होता, १९९७ साली प्रदर्शित झालेला, "दर्मियाँ - इन बिटवीन..."

चित्रपटाची कथा होती झ़ीनत (किरण खेर) आणि इम्मी या आई आणि मुलाची. एक अत्यंत प्रतिभावान आणि यशस्वी कलावंत म्हणून झ़ीनत प्रसिद्ध असते. तिचा मुलगा इम्मी, एका शारीरिक व्यंग्यामुळे पुरूष असूनही पुरूष नसतो. या एका तृटीमुळे झ़ीनत इम्मीला तिचा मुलगा म्हणून नाही तर भाऊ म्हणून जगासमोर आणते. एकीकडे झ़ीनत लोकप्रियतेची एकेक पायरी चढत आनंददायी व विलासी आयुष्य जगत असते तर दुसरीकडे तिचा भाऊ म्हणवणाऱ्या तिचा मुलाच्या, इम्मीच्या (आरीफ़ झ़कारिया) वाट्याला मात्र सततचे टोमणे, मानहानी, अवहेलना यांनी भरलेलं जगणं येतं...

चित्रपट उत्तरार्धात पोहोचतो आणि झ़ीनतच्या अधोगतीला सुरुवात होते. वयाने वाढणाऱ्या झ़ीनतची लोकप्रियता, तिचं सौंदर्य कमी होत असताना यशाची हवा डोक्यात गेलेल्या झ़ीनतला मात्र हे मान्य नसतं. आपल्याहून अधिक सुंदर आणि लोकप्रिय कोणीच नाही या भ्रमामुळेच झ़ीनत अधिक उद्धट होत जाते. जुगार आणि मद्यपानाच्या नादात झ़ीनत घर, पैसा सगळं गमावून बसते आणि एकीकडे पैशाची तजवीज करायची तर दुसरीकडे झ़ीनतला पुन्हा यशाच्या मार्गावर न्यायचं, ही दुहेरी जबाबदारी इम्मीवर पडते. झ़ीनतला काम मिळवून देण्यासाठी जिथे इम्मी अनेकांचे हात-पाय जोडतो तिथेच पैशासाठी चंपा (सयाजी शिंदे) नावाचा म्होरक्या असलेल्या एका तृतियपंथियांच्या समुहात तो दाखल होतो...

आपल्याच समुहाकडून आणि बाहेरच्या समाजाकडून मिळणारी वागणूक इम्मीच्या जिव्हारी लागते आणि तो पळ काढतो. इम्मीच्या या दु:खी-कष्टी आयुष्यात एक हलकासा कवडसा त्याला दिसतो. तो कवडसा म्हणजे इम्मीला कचऱ्यात सापडलेलं एक बाळ. त्या बाळाच्या पालन-पोषणासाठी शरीराने कमकुवत असलेला इम्मी मनानेे कणखर बनून आणि समाजाशी लढा देतो. सर्व रस्ते बंद झाल्यावर, बाळाला इंदर (शाहबाज़ खान) आणि चित्रा (तब्बू) या जोडप्याकडे सोपवून, मानसिक संतुलन ढळलेल्या त्याच्या आईकडे इम्मी परत जातो...

१९४६ ते १९६० हा काळ दर्शवणाऱ्या, अतिशय हृदयद्रावक अशा या चित्रपटाचं संगीत भूपेन हज़ारिका यांनी दिलं आहे. गाणी बऱ्यापैकी उडत्या चालीवरची आणि प्रणयगीतं असं मिश्रण असलेली आहेत. पण त्यातले शब्द आणि संगीत १९४६ ते १९६०चा काळ दर्शवतात. चित्रपटात बऱ्याच ठिकाणी एक आलाप वापरला गेला आहे. प्रत्येक वेळी हा आलाप ज्या ज्यावेळी चित्रपटात येतो तेव्हा तेव्हा एखादा गंभीर प्रसंग समोर उभा राहतो. तो प्रसंग आणि आलाप एकत्रित आले, की पार्श्वसंगीत अधिक प्रभावी होतं आणि अंगावर काटा येतो...

चित्रपटात झ़ीनत व तिच्या नवऱ्याचं, जावेद खानचं (विहंग नायक) नातं स्पष्ट नाही होऊ शकलं. काय असं घडलं की जावेद आणि झ़ीनत वेगळे राहत होते ते कळू शकलं नाही. याखेरीज चित्रपटात बरेच छोटे-मोठे कलावंत होते, पण standout performances म्हणावं तशी किरण खेर, आरीफ़ झ़कारिया आणि सयाजी शिंदे या तिघांची कामं अप्रतीम झाली आहेत. नीच नाही पण पाषाणहृदयी चंपा, शारिरिक कमतरतेमुळे मनाने खचलेला पण तरीही थोडासा विद्रोही इम्मी आणि यशाच्या शिखरावर असताना ते यश सांभाळू न शकलेली उद्धट व आत्मघातकी झ़ीनत, या तीनही व्यक्तिरेखा म्हणजे चित्रपटाचे तीन आधारस्तंभ आहेत...

तब्बूला या चित्रपटात जास्त वाव मिळाला नाही पण किरण खेरसोबतचा त्यांचा एक सीन कमालीचा वठला आहे. आपल्यामुळे झ़ीनतआपाचं काम गेलं हा सल मनात ठेऊन चित्रा झ़ीनतला भेटायला येते. झ़ीनतने, तिला काही वाटलं नाही असं खोटं सांगितल्यावर मात्र चित्रा थोडी खूश होते. या दृष्यात अपराधी भावना दाखवणारी तब्बूची अदाकारी छान झाली आहे. आरीफ़ झ़कारियाबद्दल म्हणायचं झालं तर इतकी मोठी भूमिका कदाचित एकमेवंच असेल, जी त्यांच्या वाट्याला आली. शाहरुख़ ख़ान यांच्याकडे जाणारी इम्मीची व्यक्तिरेखा आरीफ़ झ़कारिया यांनी उत्तम साकारली. रस्त्याच्या कडेला सापडलेलं एक बाळ जवळ धरून रडणारा इम्मी, चंपाच्या तावडीतून बाळाला सोडवणारा इम्मी आणि चित्राकडे बाळाला सोपवताना "बाळाचा सांभाळ करा" असं सांगणारा इम्मी, ही तीन, आरीफ़ झ़कारिया यांची चित्रपटातली सर्वोत्तम दृष्य आहेत असं मला वाटतं...

एकंदरीत, वेगळ्या धाटणीवर आधारलेल्या, काळीज पिळवटून टाकणाऱ्या शोकांतिकेचा अनुभव घ्यायचा असेल, तर सागर गुप्ता लिखित व कल्पना लाजमी दिग्दर्शित, "दर्मियाँ - इन बिटवीन" हा चित्रपट नक्कीच पहायला हवा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Tuesday, 16 February 2021

चक्रावणारा समय...

"आपकी आँख़ें तो अच्छी हैं, मगर नज़र कमजोर है..." या वाक्याचा पुरेपूर अर्थ दर्शवणारी आणि काळ व वेळ एकत्र आले की मृत्यू अटळ असतो हे दाखवणारी उत्कंठावर्धक शोधकथा म्हणजेच २००३ साली प्रदर्शित झालेला रॉबी ग्रेवालचा, "समय... When time strikes..."


ए.सी.पी. मालविका चौहान (सुष्मिता सेन) एक विधवा व दहा वर्षाच्या मुलीची, अंजलीची (बरखा मेनन) आई आणि एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आहे. दिसणाऱ्या पुराव्यांच्याही पलिकडे जाऊन वेगळा विचार करणाऱ्या मालविकासमोर एक केस येते. एका मोठ्या उद्योगपतीची त्याच्याच घरात हत्या झालेली असते. No witnesses, no evidence, no weapon अशी ती perfect murder केस असूनही तिथे काही दुवे पेरलेले मालविकाला आढळतात. त्या दुव्यांचा माग काढत केसचा तपास करतानाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा खून होतो...

मागच्या खुनाप्रमाणेच यावेळीही पुरावे सापडत नाहीत पण पुन्हा काही दुवे पेरलेले आढळतात. हे दोन्ही खून एकाच माणसाने केले असल्याचं मालविकाच्या लक्षात येतं. संशयित खुन्यापर्यंत मालविका पोहोचते खरी पण त्याचाच खून झाल्याचं दिसताच ती चक्रावते. अचानक तिला एक महत्वाचा धागा सापडतो. चौथा खून कोणाचा आणि किती वाजता होणार हे मालविकाला समजतं व खुन्याला पकडायला मालविका सज्ज होते. मालविका चौथा खून थांबवून खुन्याला पकडू शकेल का... हे चित्रपट पाहिल्यावरच समजतं...

चित्रपटात धक्कातंत्राचा सुरेख वापर केलेला दिसतो. संदीप चौटा यांनी दिलेलं पार्श्वसंगीत कथेतलं रहस्य टिकवण्यात व प्रेक्षकांची उत्कंठा वाढण्यात मोलाची भूमिका बजावतं. मालविका आणि त्या खुन्यामध्ये रंगलेला उंदरा-मांजराचा खेळ दाखवण्यासाठी पॅकमॅन या व्हिडियो गेमचा चित्रपटभर प्रभावी वापर झाला आहे. एका बाजूला मालविका त्या खेळातली एक लेव्हर हारते तिथेच दुसरीकडे तो खूनी तीच लेव्हल जिंकतो. हा प्रसंग पाहताना खूनी मालविकाच्या वरचढ आहे हे पुरेपूर जाणवतं...

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे सुष्मिता सेन यांचा दमदार अभिनय. सुष्मिता सेन यांनी मालविका चौहान ही गंभीर व्यक्तिरेखा सुंदर वठवली आहे. बोलण्यातील ठेहराव, आवाजाची पातळी, देहबोली, या गोष्टी त्यांनी उत्तम साकारल्या आहेत. पोलीस अधिकारी आणि आई या दोघींमधला वागण्या-बोलण्यातला फरक सुश्ष्मिता सेन यांनी छान दर्शवला आहे. एक कडक पोलीस अधिकारी आणि शिस्तप्रिय पण प्रेमळ आई या दोन्ही व्यक्तिरेखा सुष्मिता सेन यांनी चोख वठवल्या आहेत. त्यांच्याखेरीज सुशांत सिंह, तुषार दळवी, राजेश खेरा, दिनेश लांबा या कलावंतांनीही सहायक व्यक्तिरेखेत सुष्मिता सेनची उत्तम साथ दिली आहे...

एकंदरीत, पुढे काय होईल याची उत्सूकता पदोपदी शिगेला पोहोचवणारा आणि अखेरच्या क्षणी कथा वेगळ्याच वळणावर नेणारा रॉबी ग्रेवालचा "समय... When time strikes..." हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे...

@ अनिकेत परशुराम आपटे.