माणसं स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी
मार्गही निवडतात. काही त्या मार्गावर चालून आपली स्वप्न पूर्ण करतात तर काही त्या
मार्गांना घबरून ती स्वप्न पाहणं सोडून देतात. पण काही जण असे असतात जे
परिस्थितीमुळे स्वप्नपूर्तीच्या मार्गावरून लांब फेकले जातात आणि आपल्याच
स्वप्नांना दुरावतात. त्यावेळी अशा व्यक्तीच्या मनाची अवस्था खूप वाईट होते. मनाची
हीच व्यथा आपल्याला दिसते, "गर्दिश"
चित्रपटातल्या "हम न समझे थे... बात इतनी सी..." या सुंदर गाण्यातून...
"हम न समझे थे... बात इतनी सी...
ख्वाब शीशे थे... दुनिया पत्थर की..."
"आरज़ू हमने की तो हम पाये...
रौशनी साथ लायी थी साये...
साये गहरे थे रौशनी हलकी..."
"सिर्फ विरानी सिर्फ तनहाई...
ज़िंदगी हमको यह कहाँ लाई...
हम तो खो बैठे राह मंज़िल की..."
आपल्या घराला, आपल्या माणसांना, आपल्या प्रेयसीला दुरावलेला शिवा विचार करत आहे, "हे काय झालं माझ्यासोबत... माणसात असूनही मी असा बेटासारखा एकटा पडलो आहे. माझं नशीब मला अशा ठिकाणी घेऊन आलं आहे जिथून माझ्या माणसात जाणारी, माझ्या स्वप्नांकडे जाणारी वाटच दिसेनाशी झाली आहे..." इथे पूर्ण निराश झालेला शिवा आपल्याला दिसतो. आपलं दु:ख कोणाकडे बोलावं, कोणाजवळ मोकळं व्हावं हा शिवाचा कोंडमारा आपल्याला जाणवतो आणि गाणं शेवटच्या कडव्याकडे झुकतं...
"क्या कोई बेचे क्या कोई बाँटे...
अपने दामन में सिर्फ हैं काँटे...
और दुकाने हैं सिर्फ फूलों की..."
पुरुषोत्तम साठे आणि शिवा दोघांचीही स्वप्न उध्वस्त झाली आहेत. अंध:काराशिवाय दोघांनाही काहीच दिसत नाही. दोघांच्याही मनात यावेळी एकाच प्रकारचे विचार येऊ लागतात, की "जगात सुख आहे, आनंद आहे, चांगली माणसं आहेत, स्वप्नंही आहेत, पण माझ्या पदरीमात्र, कधीही न संपणारं स्वप्नभंगाचं दु:ख, वाईट माणसं आणि निराशाच आली..."
"गर्दिश" या चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारं हे अप्रतीम गाणं, निराशेच्या दरीत अडकलेल्या व कधीही बाहेर न येऊ शकणाऱ्या पुरुषोत्तम साठे आणि शिवा या पिता-पुत्राच्या मनाच्या अवस्थेचं तंतोतंत वर्णन करतं. 'पंचम'दांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेख चालीवर जावेद अख़्तर यांनी सुंदर शब्दांची उधळण केली आणि यांवर कळस चढवला एस.पी.बालासुब्रमण्यम यांच्या अप्रतीम स्वरांनी. पिता-पुत्राचं नातं, त्यांचा प्रवास आणि त्यांच्या निराश मनाची अवस्था दाखवणारं हे गाणं, चित्रपट संपल्यावरही आपल्या मनात व ओठांवर राहतं...
@ अनिकेत परशुराम आपटे.





No comments:
Post a Comment