Tuesday, 26 January 2021

चॉकलेट बॉय इक़्बाल...

"हे गाव माझं... ही माणसं माझी... माझं नाव लक्षात ठेव... बाजी...", "आपल्याशी जो नडेल... तो नरकात जळेल..." हे दमदार संवाद आहेत "बाजी" या चित्रपटातले. चित्रपट कसाही असो, पण मध्यवर्ती भूमिका साकारणारा श्रेयस तळपदे नेहमीच लक्षात राहतो...

अभिनेत्री जयश्री टी. आणि अभिनेत्री मीना टी. या आपल्या मावशांकडून श्रेयस तळपदे यांना घरातच अभिनयाचं बाळकडू मिळालं होतं. त्याचं चीज करत, “आभाळमाया”, “दामिनी”, “अवंतिका”, “बेधुंद मनाची लहर” अशा दर्जेदार मालिकांमधून विविध भूमिका निभावत श्रेयस तळपदे यांनी छोटा पडदा गाजवला. "आभाळमाया" या मालिकेसंदर्भात ऐकलेली एक मजेशीर गोष्ट आठवली...

“आभाळमाया” या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान श्रेयस तळपदे यांची कॉलेजची दृश्ये जिथे चित्रीत झाली, तिथेच त्यांची दीप्ती यांच्याशी भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात होऊन ही जोडीगोळी लग्नाच्या बेडीत अडकली. श्रेयस तळपदे यांना विवाहापश्चात बऱ्याच मालिका मिळत गेल्या. पण रुपेरी पडद्यावर त्यांचं पहिलं पाऊल पडलं १९८९ साली प्रदर्शित झालेल्या “एक गाडी बाकी अनाडी” या चित्रपटातल्या एका गाण्यातून. लक्ष्मीकांत बेर्डे आणि काही मुलांवर चित्रीत झालेल्या "नाचुया, खेळुया, गाऊया वाऱ्यासवे..." या गाण्यात ते नाचताना दिसतात...

पुढे २००४ साली प्रदर्शित झालेल्या महेश कोठारे दिग्दर्शित “पछाडलेला” या चित्रपटात नायक म्हणून झळकण्याची संधी त्यांना मिळाली. या संधीचे सोने करत “सावरखेड एक गाव”, “आई शप्पथ”, “पोष्टर बॉईज”, “बाजी” अशा चित्रपटांमधून विविध भूमिकेतून श्रेयस तळपदे यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. श्रेयस तळपदे मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी होतेच पण हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांचा वेगळा असा ठसा उमटवला. “इक़्बल”, “अपना सपना मनी मनी”, “डोर”, “ओम शांति ओम”, “गोलमाल रिटर्न्स”, “गोलमाल ३”, “जोकर”, "गोलमाल अगेन" अशा अनेक चित्रपटांमधून श्रेयस तळपदे यांना वेगवेगळ्या भूमिका मिळत गेल्या आणि त्यांचा अभिनय बहरत गेला...

हिंदी चित्रपटसृष्टीत श्रेयस तळपदे यांनी पदार्पण केले ते २००२ साली प्रदर्शित झालेल्या “आंखे” या चित्रपटातल्या छोट्या भूमिकेद्वारे. संपूर्ण चित्रपटात परेश रावलसोबत पाच मिनिटांच्या एका छोट्या दृष्यात ते झळकले होते. माझ्या मते श्रेयस तळपदे यांच्या अभिनय कारकीर्दीतली सर्वोत्तम भूमिका होती २००५ साली प्रदर्शित झालेल्या नागश कुकनूर दिग्दर्शित "इक़्बाल" या चित्रपटातली त्यांनी साकारलेली मूक-बधीर क्रिकेटप्रेमी व खेळाडूची भूमिका. नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाडसारखे दिग्गज समोर असतानाही नुसते हाव-भाव देत श्रेयस तळपदे यांनी सुंदर अभिनय केला होता...

आज २७ जानेवारी. अभिनेते श्रेयस तळपदे यांचा जन्मदिवस. या चॉकलेट बॉय इक़्बालला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

@ अनिकेत परशुराम आपटे.

Saturday, 9 January 2021

मनाची व्यथा सांगणारा संगीतमय नजराणा...

माणसं स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मार्गही निवडतात. काही त्या मार्गावर चालून आपली स्वप्न पूर्ण करतात तर काही त्या मार्गांना घबरून ती स्वप्न पाहणं सोडून देतात. पण काही जण असे असतात जे परिस्थितीमुळे स्वप्नपूर्तीच्या मार्गावरून लांब फेकले जातात आणि आपल्याच स्वप्नांना दुरावतात. त्यावेळी अशा व्यक्तीच्या मनाची अवस्था खूप वाईट होते. मनाची हीच व्यथा आपल्याला दिसते, "गर्दिश" चित्रपटातल्या "हम न समझे थे... बात इतनी सी..." या सुंदर गाण्यातून...

"हम न समझे थे... बात इतनी सी...
ख्वाब शीशे थे... दुनिया पत्थर की..."


गीतकार म्हणतो
, "माझ्या लक्षातच नाही आलं, की जी स्वप्न मी पाहत होतो ती खूप तकलादू होती आणि या समाजानेच त्यांचा चक्काचूर केला..." इथे आपल्याला हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम साठे (अमरीश पुरी) दिसतात, ज्यांनी आपल्या मुलाला शिवाला (जॅकी श्रॉफ) पोलीस इंस्पेक्टर बनवायचं स्वप्न पाहिलं असतं. पहिल्या कडव्याकडे आपण वळतो तेव्हा, त्यांचं ते स्वप्न धुसर होत आहे हे आपल्याला समजतं...

"आरज़ू हमने की तो हम पाये...
रौशनी साथ लायी थी साये...
साये गहरे थे रौशनी हलकी..."


पुरुषोत्तम साठे म्हणतात
, "मी एक आशा केली होती शिवाला इंस्पेक्टर बनवण्याची. पण शिवाच्या वाईट कृत्यांचा अंधारच इतका मोठा आहे की माझी ही छोटीशी आशा त्याच्या मागे पूर्ण झाकोळली गेली. हा सल मनात ठेऊन पुरुषोत्तम साठे दु:ख करत बसतात खरे. पण खरा आघात झाला तो शिवावर ज्याची प्रचिती आपल्याला पुढच्या कडव्यात येते...

"सिर्फ विरानी सिर्फ तनहाई...
ज़िंदगी हमको यह कहाँ लाई...
हम तो खो बैठे राह मंज़िल की..."


आपल्या घराला, आपल्या माणसांना, आपल्या प्रेयसीला दुरावलेला शिवा विचार करत आहे, "हे काय झालं माझ्यासोबत... माणसात असूनही मी असा बेटासारखा एकटा पडलो आहे. माझं नशीब मला अशा ठिकाणी घेऊन आलं आहे जिथून माझ्या माणसात जाणारी, माझ्या स्वप्नांकडे जाणारी वाटच दिसेनाशी झाली आहे..." इथे पूर्ण निराश झालेला शिवा आपल्याला दिसतो. आपलं दु:ख कोणाकडे बोलावं, कोणाजवळ मोकळं व्हावं हा शिवाचा कोंडमारा आपल्याला जाणवतो आणि गाणं शेवटच्या कडव्याकडे झुकतं...

"क्या कोई बेचे क्या कोई बाँटे...
अपने दामन में सिर्फ हैं काँटे...
और दुकाने हैं सिर्फ फूलों की..."


पुरुषोत्तम साठे आणि शिवा दोघांचीही स्वप्न उध्वस्त झाली आहेत. अंध:काराशिवाय दोघांनाही काहीच दिसत नाही. दोघांच्याही मनात यावेळी एकाच प्रकारचे विचार येऊ लागतात, की "जगात सुख आहे, आनंद आहे, चांगली माणसं आहेत, स्वप्नंही आहेत, पण माझ्या पदरीमात्र, कधीही न संपणारं स्वप्नभंगाचं दु:ख, वाईट माणसं आणि निराशाच आली..."


"गर्दिश" या चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारं हे अप्रतीम गाणं, निराशेच्या दरीत अडकलेल्या व कधीही बाहेर न येऊ शकणाऱ्या पुरुषोत्तम साठे आणि शिवा या पिता-पुत्राच्या मनाच्या अवस्थेचं तंतोतंत वर्णन करतं. 'पंचम'दांनी संगीतबद्ध केलेल्या सुरेख चालीवर जावेद अख़्तर यांनी सुंदर शब्दांची उधळण केली आणि यांवर कळस चढवला एस.पी.बालासुब्रमण्यम यांच्या अप्रतीम स्वरांनी. पिता-पुत्राचं नातं, त्यांचा प्रवास आणि त्यांच्या निराश मनाची अवस्था दाखवणारं हे गाणं, चित्रपट संपल्यावरही आपल्या मनात व ओठांवर राहतं...

@ अनिकेत परशुराम आपटे.