एक माणूस आपल्या बायकोसह तिच्या माहेरी येतो. तिथे एक भूत त्याच्या मानगुटीवर बसतं. एका बाजूला घरच्यांची त्रेधा आणि झपाटलेल्या त्या माणसाचं विक्षिप्त व जगावेगळं वागणं, आणि दुसरीकडे त्या अतृप्त आत्म्याचं ध्येय, अशा कात्रीत सापडलेला तो माणूस स्वत:ला कसं सोडवतो... सोडवतो का अजून अडकतो... हे कथानक...
ही कथा आहे २०२० साली प्रदर्शित झालेल्या राघव लॉरेंस लिखीत "लक्ष्मी" या चित्रपटाची. २०११ साली, "कंचना" हा दाक्षिणात्य चित्रपट येऊन गेला. "कंचना"ने त्यावेळी प्रचंड धुमाकूळ घातला होता. नऊ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा घेऊन, राघव लॉरेंस यांनी "लक्ष्मी" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी नाही, पण बऱ्यापैकी चांगलं पदार्पण केलं आहे...
कथा तशी यथा तथाच आहे. म्हणजे अतृप्त आत्मा, आत्म्याचं लक्ष आणि झपाटलेली व्यक्ती असा सरधोपट फॉर्म्यूला आहे खरा, आत्मा आणि त्याचं एकेकाळचं शरीर, हाच काय तो वेगळेपणा. चित्रपटात एखाद-दोन गाणी आहेत. गाण्यांच्या शब्दांपेक्षा संगीत आणि तालावर दिसणारी नृत्य जास्त भावतात. चित्रपटात असलेल्या हाणामारीच्या सर्व दृष्यांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांची झलक दिसून येते...
कियारा अडवाणी यांची वेषभूषा (costumes) आणि रंगभूषा (make-up), याशिवाय चित्रपटात त्यांना जास्त वाव मिळालेला नाही. अर्थात, कथानकाचाही हा परिणाम असेल कदाचित. अक्षय कुमार यांना मिळालेली रंगभूषा आणि वेषभूषा मात्र चित्रपटावर अप्रतीम प्रभाव पाडते. चित्रपटात बघण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. त्या म्हणजे अक्षय कुमार आणि शरद केळकर यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा...
एक गोष्ट मला वैयक्तिक रित्या खटकली. भूतपटांत आपण पाहतो की आत्म्याच्या आधीच्या शरीराचे जे गुणधर्म असतात, जशी देहबोली असते तेच सगळं झपाटलेल्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसतं. अक्षय कुमारला झपाटलेलं भूत घरातल्या लोकांना आपल्या तीन छटा दाखवतं. तिसरी जी गुंड प्रवृत्तीची छटा दिसते, तशी व्यक्ती चित्रपटात दिसत नाही. किंबहुना एक व्यक्ती आहे, पण तिची देहबोली, भुताने दाखवलेल्या तिसऱ्या छटेची देहबोलीपेक्षा वेगळी वाटते...
चित्रपटात वापरलेले स्पेशल इफेक्ट्स आणि प्रकाश योजना कमाल करून जातात. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीखेरीज चित्रपटात असलेले राजेश शर्मा, आयेशा मिश्रा, मनू चढ्ढा आणि अश्विनी कळसेकर यांनी त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्या व्यक्तिरेखाही या छान वठवल्या आहेत...
एकंदरीत, भयापेक्षा विनोद जास्त असलेला, 'हॉरर कॉमेडी' या पठडीत बसणारा राघव लॉरेंस लिखीत व दिग्दर्शित, "लक्ष्मी" हा चित्रपट, वन टाईम वॉचच आहे, असं मला तरी वाटतं...
@ अनिकेत परशुराम आपटे.
