Monday, 9 November 2020

शैलीदार चित्रपटकार...

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी जसे अनेक चित्रपट आहेत तसेच अनेक चित्रपटकारही आहेत. काहींना कथा भावते आणि ते चित्रपट बनवतात. काही चित्रपट आपटतात, काही बऱ्यापैकी यशस्वी होतात तर काही प्रचंड यश मिळवून देतात. या सर्व चित्रपटकारांमध्ये अशी काही नावं आहेत, ज्यांनी त्यांची एक खास शैली तयार केली. त्याच शैलीतले चित्रपट देऊन प्रेक्षकांची प्रशंसा मिळवत असताना, आपल्या चाकोरीबाहेर जाऊन जेव्हा त्यांनी चित्रपट दिले तेव्हा प्रेक्षकांना ते फारसे रुचले नाहीत...


भयकीत आणि तीव्र विक्रम...

तीव्र, अर्थात intense विषयांच्या कथांना थोड्या ग्रे शेडमध्ये प्रस्तुत करणारे अथवा भय या विषयावरच्या चित्रपटांना एक वेगळी ऊंची देणारे चित्रपटकार म्हणजे विक्रम भट...


तीव्र, अर्थात intense कथा, विक्रम भट यांच्या चित्रपटांचा महत्वाचा भाग असायचा. त्यांच्या चित्रपटात विनोदाचा भाग अगदी थोडा किंवा जवळ जवळ नगण्य असायचा. त्याचसोबत चित्रपटातली हाणामारीची दृश्यही फारच थोडी असायची. म्हणजे एकास-एक किंवा फार तर एकास दोन किंवा तीन इतपतच. उगाच ओढून ताणून केलेली हाणामारी त्यांच्या चित्रपटात फारच कमी दिसे. बरं, ती हाणामारीची दृश्य स्लो मोशन पद्धतीने दाखवल्यामुळे अधिक रंगतदार असायची. विक्रम भट यांच्या चित्रपटात unexpected twist या प्रकाराचा जास्त वापर दिसतो. आणि तिथूनच चित्रपट शेवटाकडे वळतो...

विक्रम भट यांच्या चित्रपटात विनोदी दृश्य फार क्वचित असतात. त्यामुळे विनोदी कलावंत चित्रपटात नगण्यच असत. एखाद्या गंभीर दृश्याला थोडं हलकं करण्यासाठी आलेला एखादा संवाद विनोदाची थोडी फवारणी करतो इतकंच. पण एरवी कथेचा प्रवास इतका गंभीर असतो, की त्यात विनोदाला कमीच संधी मिळते. विक्रम भट यांच्या चित्रपटांमध्ये असणाऱ्या रोमँटिक कथानकांनाही गांभीर्याची सोबत असते. टिपिकल गोड गोड प्रेम हे विक्रम भट यांच्या चित्रपटांचा भाग कधीच नसायचं. त्या उलट, प्रेमाला असणारी दुःखाची किनार किंवा विश्वासघाताचा पडदा त्या त्या रोमँटिक दृश्यांसोबत जाणवायचा. अशा प्रकारच्या कथानकासह आलेले, "जानम", "गुलाम", "मदहोश", "कसूर", "फुटपाथ", "ऐतबार" आणि इतर काही चित्रपट चांगले चालले. "गुलाम" या चित्रपटाने तर आमिर खानला एक वेगळी ओळखही दिली. पण विक्रम भट यांना खरं यश लाभलं ते त्यांनी दिलेल्या भयपटांमुळे...

हिंदी भयपटात बिभत्स चेहेरे, कांठळ्या बसणारे आवाज, अक्राळ-विक्राळ आकृत्या, असंच बहुतेक वेळी आपण पाहत आलो. विक्रम भट यांच्या भयपटात नकारात्मक शक्ती जरी असली, तरी त्याला कुठेतरी एक करुण्याची झालर दाखवली जाते. "राज", "१९२०", "शापित", "हॉन्टेड - 3D" हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. या चित्रपटात दाखवलेली भयप्रद दृश्य अंगावर शहारे आणणारी होती. पण बऱ्यापैकी कमी बिभत्सपणा होता त्यात. भय आणि गंभीर प्रेम यांखेरीज विक्रम भट यांच्या चित्रपटात मादक दृश्यांचा चांगलाच भरणा असायचा. पण त्या मादक दृश्यांनाही एखाद्या गाण्यामध्ये किंवा एखाद्या गंभीर दृश्यामध्ये गुंफून समोर आणलं जायचं...

विक्रम भट यांच्या चित्रपटातील कलावंतांबद्दल बोलायचं, तर बिपाशा बसू, इम्रान हाश्मी, आफताब शिवदासानी, आशुतोष राणा, विश्वजीत प्रधान, हे कलाकार प्रामुख्याने दिसायचे. बाकी कलावंतांची निवड त्या त्या व्यक्तिरेखेनुसार विक्रम भट करायचे. कलावंतांसोबत विक्रम भट यांच्या चित्रपटांचे मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपटातली गाणी आणि संगीत. विक्रम भट यांच्या चित्रपटातील गाणी अतिशय श्रवणीय आणि लक्षात राहणारी असायची. सुरुवातीच्या काळात मुख्यत्वे अन्नू मलिक यांच्यावर विक्रम भट यांच्या चित्रपटांच्या संगीताची भिस्त असायची. पण नंतर ती जागा नदीम-श्रवण आणि जतीन-ललित यांनी पटकावली...

गंभीर प्रेम किंवा भयपट, ही शैली सोडून विक्रम भट यांनी काही काळासाठी मसाला चित्रपटांचा रस्ता धरला. पण "आवारा पागल दिवाना" सोडल्यास त्यांनी दिलेले "ऐलान", "जुर्म", "दिवाने हुए पागल" या चित्रपटांना फारसा प्रतिसाद लाभला नाही. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शैलीकडे अर्थात भयपटांकडे वळत "१९२१", "क्रीचर", "गोस्ट", "राज - रीबूट" हे चित्रपट देत विक्रम भट परत प्रकाश झोतात आले. आज २७ जानेवारी. आज विक्रम भट यांचा वाढदिवस. विक्रम भट यांना आजच्या दिवसाच्या भय भरलेल्या गंभीर प्रेमाच्या शुभेच्छा...

शिवकालीन लांजेकर...

छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक चित्रपट होऊन गेले. पण या larger than life व्यक्तिमत्वाला तितक्याच grand scaleवर दाखवणारे चित्रपटकार म्हणजे दिगपाल लांजेकर...


'शिवराज अष्टक' या संकल्पनेतून साकार होणारे दिगपाल लांजेकरांचे चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी दर्शवतात. अदाकारीसोबतच या सर्व चित्रपटांची जमेची बाजू म्हणजे, चित्रपटांचं संगीत आणि पार्श्वसंगीत. देवदत्त बाजी यांनी लांजेकरांच्या चित्रपटांत अप्रतीम संगीत आणि पार्श्वसंगीत देऊन बाजी मारली आहे. ऐतिहासिक चित्रपटांचा बाज लक्षात घेत, त्याच प्रकारची गाणी कथेनुरूप येतात. मुख्य म्हणजे चित्रपटाल्या जवळ-जवळ सर्व कलाकारांवर कुठल्या ना कुठल्या गाण्यातला काही भाग चित्रित होतो किंवा गाण्याच्या वेळी ते कलावंत पडद्यावर दिसतात...

गाण्यांसोबतच लांजेकरांच्या चित्रपटातल्या कलाकारांची निवडही चोख आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, अक्षय वाघमारे, निखिल राऊत, मृण्मयी देशपांडे, रिषभ सक्सेना ही कलावंत मंडळी वेगवेगळ्या व्यक्तीरेखा साकारताना दिसतात. पण मृणाल कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर यांना मात्र राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अढळ स्थान प्राप्त झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू दाखवताना लांजेकरांनी मुकेश ऋषी, अनुप सोनी, राहुल देव आशा अमराठी कलावंतांना समोर आणल्याने ते शत्रू जास्त परिणामकारक ठरले. 'बहिर्जी नाईक' ही अत्यंत महत्वाची व्यक्तीरेखा हरीश दुधाडे यांनी पहिल्या तीन चित्रपटात उत्तम साकारली. पण लांजेकरांच्या पुढच्या चित्रपटात ही भूमिका वेगळ्या कलावंताने साकारलेली प्रेक्षकांना थोडी खटकली...

लांजेकरांच्या चित्रपटात काही मुद्दे अधोरेखित होतात. त्यातला पहिला मुद्दा आहे चित्रपटात येणारी साहसदृश्य किंवा युद्ध अथवा चाकमकीची दृश्य. पडद्यावर ही दृश्य unrealistic भासतात खरी, पण ती रंजक आणि उत्कंठावर्धक असतात हे नक्की. चित्रपटातला दुसरा मुद्दा म्हणजे चित्रपटातले सेट्स आणि प्रकाश योजना. राजमहाल, बुरूज, खिंडी, गावं दाखवताना काही अंशी खऱ्या जागा वापरात आल्या असतील, पण बहुतांशी उभारलेले नेत्रदीपक सेट्स लक्ष वेधून घेतात. प्रकाश योजनेबद्दल म्हणायचं, तर त्या काळाचं योग्य भान ठेऊन प्रकाशाचा वापर केलेला दिसतो. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कॅमेरा. कुठे long shots, कुठे close-up, कुठे wide shots, तर कुठे droneचा वापर, अशा विविध प्रकारे चित्रीकरण झाल्याने ते प्रभावशाली ठरतं...

लांजेकरांच्या खास शैलीत तयार झालेले, "फर्जंद", "फत्तेशिकस्त", "पवनखिंड" हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाले. कलावंत मंडळीत थोडा फेरबदल करून समोर आलेला "शेर शिवराज" सुद्धा यश मिळवून गेला. पण शिवाकालीन इतिहास सोडून थोडं बाहेर जात लांजेकरांनी दिलेले "शिवरायांचा छावा" आणि "संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई" हे चित्रपट फारसे चालले नाहीत. त्यांचे पुढचे चित्रपट पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची महती गातील, आणि चित्रपट पुन्हा यश संपादन करतील हीच आई भवानी चरणी प्रार्थना...

मल्टीस्टारर कोहली...


बदले की आग, गाण्यांचा भरणा, तूफानी हाणामारी आणि सोबत मातब्बर कलावंतांची लांबच लांब रांग, या साऱ्यांची सांगड घालून मसाला चित्रपटांचा नजराणा देणारे चित्रपटकार म्हणजे राजकुमार कोहली...



कोहलींच्या चित्रपटांत बदला किंवा सूड हा मुद्दा मुख्य असायचा. त्या मुद्द्याभोवती पौराणिक काळ, किंवा ऐतिहासिक काळ किंवा आत्ताचा काळ दाखवला जायचा. यांच्या चित्रपटांत संवाद तर दमदार असायचेच, पण गाणीही मुख्यत्वे उडत्या चालींची असायची. एखादं गाणं तरी असं असायचं ज्यात दोनपेक्षा अधिक कलावंत मंडळींचा भरणा असायचा. चित्रपटातलं एखादं गाणं तरी खलनायक किंवा खलनायिकेच्या अड्ड्यावर असायचंच...

चित्रपटात कलाकार मंडळींचा पुरेपूर मेळावा असायचा. सुनील दत्त, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, जीतेंद्र विनोद मेहरा, हे नायकांच्या भूमिकेत जास्त दिसायचे. तर अमरीश पुरी, राज बब्बर, रज़ा मुराद ही मंडळी खल किंवा सहायक भूमिकेत असायची. चित्रपटातल्या नायिका, या मुख्यकरून नायकाला जोडीदार किंवा निमित्त मात्र असायच्या ज्यांना हाताशी धरून खलनायक आपले डाव साधायचे. रेखा, रीना रॉय, अनीता राज, या नायिकांच्या रूपात दिसायच्या...

कोहली यांच्या खास शैलीत तयार झालेल्या "नागिन", "जानी दुश्मान", "बदले की आग", "राज तिलक", "इन्सानियत के दुश्मान" या चित्रपटांनी बऱ्यापैकी गल्ला जमवला. आपल्या मुलाला म्हणजेच मोहनीश कोहली अर्थात अरमान कोहलीला पुढे आणण्यासाठी शैलीबाहेर जात राजकुमार कोहली यांनी "विद्रोही", "औलाद के दुश्मन" हे चित्रपट बनवले खरे. पण प्रेक्षकांना ते फारसे आवडले नाहीत. आपल्या शैलीत परतत कोहली यांनी दिलेला "क़हर" बरा चालला. पण त्यांनी मल्टीस्टारर मसाला शैलीत बनवलेल्या "जानी दुश्मन - एक अनोखी कहानी" या चित्रपटाने सडकून मार खाल्ला...

राजकुमार कोहली यांचे चित्रपट हे क्लासिक पठडीतले कधीच नव्हते. पण मल्टीस्टारर एन्टरटेनर म्हणून ते चित्रपट नेहमीच लक्षात राहिले. आज १४ सप्टेम्बर. आज राजकुमार कोहली यांचा जन्मदिवस. आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांचे चित्रपट आजही पाहिले जातात. राजकुमार कोहली यांना आजच्या दिवसाच्या मल्टीस्टारर शुभेच्छा...


छा गये...
छा गये छा गये...
मल्टीस्टाररवाले एन्टरटेनरवाले...
कोहलीजी छा गये...

''वाला रोशन...

'' या अक्षराच्या बाराखडीपासून तयार झालेल्या चित्रपटांची नावं देण्यात पटाईत असलेले चित्रपटकार म्हणजे राकेश रोशन. राकेश रोशन एक कलावंत, पटकथा लेखक आणि निर्माते तर होतेच. शिवाय आपल्या दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी अनेक चित्रपट सजवले...


'फिल्मक्राफ्ट' या बॅनरखाली रोशन यांनी निर्मित केलेला "खूबसूरत" हा चित्रपट यशस्वी ठरला आणि '' हे अक्षर रोशनने उचलून धरलं. रोशन यांनी सर्वस्व पणाला लाऊन निर्मित केलेला आणि दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असलेला "खुदगर्ज" हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि एक दिग्दर्शक म्हणून राकेश रोशन नावारूपाला आले... 

रोशन यांच्या चित्रपटात ऋषि कपूर, अनिल कपूर, शाह रुख़ ख़ान, जॅकी श्रॉफ ही मंडळी नायक म्हणून असायची. तर कादर ख़ान आणि जॉनी लिव्हर विनोदाची बाजू सांभाळायचे. नायिकांमध्ये माधुरी दिक्षीत अग्रेसर असायची आणि त्या खालोखाल रेखाचा नंबर लागायचा. अमरीश पुरी, रणजीत आणि किरण कुमार नकारात्मक भूमिकांची धुरा सांभाळायचे. चित्रपटांतल्या नकारात्मक भूमिका बऱ्यापैकी ताकदीच्या असायच्या. नायक-नायिकेच्या तोडीस तोड, त्यांनाही चित्रपटात स्थान असायचं...

रोशन यांच्या चित्रपटांत संगीत हा एक महत्वाचा घटक असायचा. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांत त्यांचे बंधू राजेश रोशन यांनीच संगीत दिलं आहे. उदासवाणी गाणी चित्रपटांत क्वचितच असायची. बाकी उडत्या चालींवरची गाणी आणि अफलातून नृत्य असल्याने चित्रपटातले नायक-नायिका नृत्य जाणणारे असायचे. चित्रपटाचा विषय कोणताही असो, पण हसीन वादियाँ आणि खुला आसमान यांच्या सानिध्यात एखादं तरी प्रेम-द्वंद्व गीत असायचंच...

चित्रपटात सामाजिक मुद्दे किंवा प्रेम त्रिकोण खूपच कमी समोर यायचे. बाकी मैत्री, बदला, प्रेमी युगुलं यांचा भरणा तर असायचाच, पण या गोष्टी लार्जर दॅन लाईफ दाखवल्या जायच्या. राकेश रोशन यांच्या नेहमीच्या शैलीत बनलेले "ख़ुदगर्ज़", "कोयला", "खून भरी माँग", "काला बज़ार", "किशन-कन्हैया", "करन-अर्जून" हे चित्रपट प्रचंड यशस्वी झाले. पण त्यांच्या चाकोरी बाहेरचे असलेले, "कारोबार", "खेल", या चित्रपटांना फारसं यश संपादन करता आलं नाही. पुढे खचून जाता "कहो ना प्यार है" आणि "कोई मिल गया" सारखे चित्रपट बनवून राकेष रोशन यांनी दणक्यात पुनरागमन केलं...

आज सप्टेंबर. आज राकेश रोशन यांचा ७५वा वाढदिवस. बॉलीवूडच्या '' वाल्या या रोशनला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

"तुमसे बढ़कर दुनिया में...

देखा कोई और जुबान पर...

तेरे लिए बधाई गई..."

भुतांचे बंधू...

रक्तबंबाळ कवटी, तंत्र-मंत्र दाखवणारे तांत्रिक, अतृप्त आत्मे, या सर्वांना मोठ्या पडद्यावर दाखवणारे चित्रपटकार म्हणजे रामसे बंधू...


ते सात भाऊ एकत्र येऊन चित्रपट काढायचे. कोणी दिग्दर्शन सांभाळायचं तर कोणी निर्मिती. कोणी कथा सांभाळायचं तर कोणी कलावंतांच्या निवडीकडे लक्ष द्यायचं. कुमार रामसे, गंगू रामसे, तुलसी रामसे, अर्जून रामसे, केशू रामसे, श्याम रामसे आणि किरण रामसे, अशा या सात भाऊ. रामसे बंधूंचं मुख्य कार्यक्षेत्र हे भयपटांचं असायचं. १९७० ते १९९० ही दोन दशकं रामसे बंधूंच्या चित्रपटांनी गाजवली...

चित्र-विचित्र आवाज, किळसवाणी दिसणारी भुतं, भुताने झपाटल्यावर त्या व्यक्तीचं बिभत्स रूप, भयानक मृत्यू आणि अंधारं शूटिंग, या सर्व रामसे बंधूंच्या ठेवणीतल्या गोष्टी असायच्या. चित्रपटात गंभीर, कौटुंबिक किंवा प्रेम दृष्य फारच कमी असायची. चित्रपटात जास्त भरणा असायचा तो काम प्रसंगांचा (सेक्स सीन्स) आणि वेड्या-वाकड्या भुतांचा. चित्रपटात विनोदी कलावंत आणि विनोदी विनोदी दृष्य असायची, पण फारच कमी. आणि कथेच्या दृष्टीने त्या प्रसंगांना काहीच महत्व नसायचं...

चित्रपटात दाखवली जाणारी भुतं किंवा आत्मे बहुतकरून नकारात्मकच असायचे. शिवाय चित्रपटातलं भूत हे तरूण वयात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचंच असायचं. रामसे बंधूंच्या चित्रपटात असणारी गाणी फार श्रवणीय होती असं नाही. पण दृष्यांमुळे आलेलं दडपण कमी करण्याचं काम ही गाणी करायची. कथेशी या गाण्यांचा काहीही संबंध नसायचा. रामसे बंधूंच्या चित्रपटात गाण्यांचा भरणा नसून जेमतेम दोन किंवा तीन गाणी असायची. त्यातही एक गाणं हमखास अशा वेळी यायचं, ज्यानंतर तो शांत असलेला आत्मा किंवा भूत जागृत व्हायचं...

कलावंतांचं म्हटलं, तर नवीन निश्चल, ओम शिवपुरी, गुलशन ग्रोव्हर, दिपक पराशर, अर्चना पूरणसिंह, काजल किरण, अनिरुद्ध अगरवाल, सत्येन कप्पू, त्रिलोक कपूर, पुनीत इस्सर, हेमंत बिर्जे ही कलाकार मंडळी प्रामुख्याने दिसायची. व्यावसायिक दृष्ट्या नावाजलेले कलावंत फारच कमी समोर यायचे. रामसे बंधूंच्या चित्रपटांची नावंही एखाद्या जागेवरून किंवा वस्तूवरून ठेवलेली असायची. रामसे बंधूंच्या नेहमीच्या शैलीत तयार झालेल्या, "दो ग़ज ज़मीन के नीचे", "तहखाना", "बंद दरवाजा", "पुरानी हवेली", "वीराना", "होटल", "सामरी ३डी", या चित्रपटांनी बऱ्यापैकी गल्ला जमवला होता. पण शैली बाहेर जात रामसे बंधूंनी दिलेले, "खोज", "सबूत", "घूँगरू की आवाज" हे चित्रपट फारसे चालले नाहीत. पुन्हा आपल्या शैलीत परतत रामसे बंधूनी दिलेल्या, "पुराना मंदिर", "सन्नाटा", "महल" अशा चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणलं...

या ठेवणीतल्या चित्रपटांशिवाय, झी टि.व्ही.वर एकेकाळी गाजलेली, "झी हॉरर शो" ही भय मालिका आणि अक्षय कुमारच्या, "खिलाड़ी" मालिकेतील काही चित्रपट रामसे बंधूंनी दिले ज्यांना प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला...

बदलेवाला देशभक्त मेहुल...

तुफान हाणामारी, उडत्या चालीचं संगीत आणि जबरदस्त पार्श्वसंगीत असा तिहेरी संगम देणारे दिग्दर्शक म्हणजे मेहुल कुमार...


मेहुल कुमारच्या चित्रपटात मेलोड्रामाला फारसा वाव नसायचा. पारंपारिक अडी-अडचणीही फार कमी दाखवल्या जायच्या. बदले की आग आणि देशभक्तीची भावना, या दोन गोष्टी प्रामुख्याने मेहुल यांच्या चित्रपटात असायच्या. तिरंगा, क्रांतिवीर, जंगबाज़, कोहराम, मृत्यूदाता हे, आणि असे अनेक चित्रपट मेहुलच्या शैलीत तयार झाले आणि बहरले...

कलावंतांचं म्हणाल, तर राज कुमार, अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, डॅनी डेंग्जाँग्पा, डिंपल कपाडिया अशा भारदस्त कलाकारांची फौज मेहुलच्या चित्रपटात असायची. शिवाय मेहुल कुमार स्वत: त्यांच्या चित्रपटातल्या काही दृष्यांमध्ये एखाद-दुसरा संवाद म्हणताना दिसायचे. मेहुलच्या चित्रपटात प्रेम गीतं किंवा प्रेमकथांना दुय्यम स्थान असायचं. म्हणूनच हाणामारीने भरलेल्या चित्रपटात रोमँटिक क्षण आणि गाणी यांचा समावेष करण्यासाठी हरिश, अतुल अग्निहोत्री आणि ममता कुलकर्णी यांना दाखवलं जायचं...

मेहुल कुमार यांच्या चित्रपटांचं मुख्य आकर्षण असायचं, चित्रपटातलं पार्श्व संगीत आणि चित्रपटातले संवाद. "ना तलवार की धार से, ना गोलियों की बौछार से, बंदा डरता है, तो सिर्फ परवरदिगार से...", "अच्छाई उतनीही करो जितनी अच्छी लगे...", "आ गये मेरी मौत का तमाशा देखने...", "बोटियाँ नोचनेवाला गीदड़, गला फाडने से शेर नहीं बन जाता...", "अंधे के हाथ बटेर लग जाए तो वह शिकारी नहीं बन जाता..." अशा जबरदस्त संवादांनी मेहुल कुमार यांचे चित्रपट सजले. बहुतांश संवाद राज कुमार किंवा नाना पाटेकर यांच्याकडेच असायचे...

मेहुल कुमार यांच्या चित्रपटात कमी प्रमाणात दिसायचं ते गंभीर किंवा दुख:द दृष्य आणि प्रणय किंवा प्रेम दृष्य. याला कारण एकच, की चित्रपटात मेलोड्रमॅटिक किंवा रोमँटिक व्यक्तिरेखांना जास्त वाव नसायचा. चित्रपटातली गाणी बऱ्यापैकी उडत्या चालींची असायची. त्यातही चित्रपटात एखादं हायलाईट साँग असायचंच. "क्रांतिवीर" मधलं 'लव्ह रॅप...' असो किंवा "तिरंगा" मधलं 'पी ले पी ले...' असो. "मृत्युदाता" मधलं 'ना ना ना ना ना रे...' असो किंवा "कोहराम" मधलं 'हम हैं बनारस के भैंया...' असो. चित्रपटातल्या मुख्य नायकांवर चित्रीत झालेल्या या गाण्यांनी बरीच प्रशंसा मिळवली...

मेहुल कुमार यांचे सर्वच चित्रपट देशभक्तीची भावना दर्शवणारे, व्हिलन्सची 'महाकाल', 'प्रलयनाथ गेंडास्वामी', 'चतुरसिंह चिता' अशी विचित्र नावं असणारे असायचे. आपल्या शैलीला थोडा छेद देत मेहुल कुमारांनी दिलेला "कितने दूर कितने पास" हा प्रेम त्रिकोणावरील चित्रपट फारसा चालला नाही. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शैलीकडे वळत त्यांनी "जागो" सारखा चित्रपट देऊन प्रेक्षकांची वाह वाह मिळवली...

आज १ जुलाय. आज मेहुल कुमार यांचा वाढदिवस. या बदलेवाल्या देशभक्त दिग्दर्शकाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा...

ना गिला करेंगे ना शिकवा करेंगे...
तुम सलामत रहो, यहीं बस दुआ करेंगे...

हलके फुलके ऋषिदा...

हलक्या-फुलक्या चित्रपटांबद्दल जेव्हाही बोललं गेलं, तेव्हा एक नाव नेहमी अग्रस्थानी असायचं. ते नाव म्हणजे ऋषिदा, अर्थात ख्यातनाम लेखक-दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी...

Content based मनोरंजक चित्रपट देण्यात ऋषिदांचा हातखंडा असायचा. धरमजी अर्थात धर्मेंद्रना त्यांच्या ऍक्शन हिरोच्या प्रतिमेतून बाहेर काढत प्रथमच विनोदी चित्रपटात नायक म्हणून सादर करण्यात ऋषिदांचा पहिला नंबर होता. "गुड्डी" या चित्रपटाद्वारे ऋषिदांनी जया भादुरी-बच्चन यांचं यशस्वी पदार्पण तर करवलंच, शिवाय, "आनंद" या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर ओळख मिळवून दिली...

ऋषिदांच्या चित्रपटात भव्यतेचा भपकारा, राजेशाही खानदानं, तडाखेबंद हाणामारी किंवा भडक कपडेपट कधीच नसायचे. ऋषिदांवर मध्यम वर्गाचा पगडा होता. त्याच अनुषंगाने येणारी कथानकं, कपडेपट, गाणी, लोकेशन्स, ऋषिदांच्या चित्रपटात पाहण्यात यायचे. चित्रपटातली गाणीसुद्धा साधं संगीत आणि साधे शब्द असलेली असायची...

ऋषिदांच्या चित्रपटांचे दोन पैलू असायचे. एक गंभीर तर दुसरा विनोदी. त्यांच्या "गुड्डी", "आनंद", "नमक हराम", "मिली", "अभिमान" अशा गंभीर चित्रपटांमध्ये काही विनोदी दृष्य असायची तर, "बावर्ची", "खूबसुरत", "नरम गरम" अशा विनोदी चित्रपटात काही गंभीर दृष्यही यायची. गंभीर दृष्यांची बाजू जिथे ए.के.हंगल, अशोक कुमार हाताळायचे तिथे ओमप्रकाश, उत्पल दत्त, असरानी, केश्तो मुखर्जी, देवेन वर्मा, ही मंडळी विनोदी दृष्यांचा भार सांभाळायची...

"मिली", "अभिमान", "खूबसुरत" हे चित्रपट सोडले, तर ऋषिदांचे चित्रपट नेहमी नायकप्रधान असायचे. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर हे मुख्यत्वे ऋषिदांच्या चित्रपटातले नायक असायचे. शिवाय, शत्रूघ्न सिन्हा, फारुख़ शेख़ यांनीही नायक किंवा सहनायक म्हणून हजेरी लावली. नायिकांमध्ये जया भादुरी-बच्चन, रेखा आणि दिप्ती नवल पडद्यावर जास्त दिसल्या. अजून बऱ्याच नायिका आलटून पालटून चित्रपटात दिसल्या पण या तीन नायिकांसोबत ऋषिदांनी एकापेक्षा जास्त चित्रपट केले...

ऋषिदांच्या बहुतकरून चित्रपटात एक विशिष्ट पार्श्वसंगीत असायचं, जे चित्रपटातल्या विनोदी किंवा आनंदी दुष्यांमध्ये यायचं. शिवाय ऋषिदांच्या चित्रपटातील संगीतही खूप श्रवणीय असायचं. गाण्यातले शब्दही लक्षात राहतील असे साधे सोपे असायचे. साधं राहणीमान, दैनंदिन जीवनातल्या समस्या, ऋषिदांच्या चित्रपटात दिसायचे. ऋषिदांच्या विनोदी चित्रपटातही ओढून-ताणून केलेली विनोद निर्मिती नसायची. पात्रांमधला गोंधळ, दुहेरी व्यक्तिमत्वाचा वेगळ्या प्रकारे केलेला वापर, हे विषय हाताळून कथानकाला समरस असे विनोद समोर यायचे...

१९९८ रोजी प्रदर्शित झालेला, "झूठ बोले कौवा काटे" हा ऋषिदांच्या नेहमीच्या शैलीतला त्यांचा शेवटचा चित्रपट फारसे यश संपादन करू शकला नाही. तिथेच ऋषिदांच्या चाकोरीबाहेरील, "सत्यकाम", "आशीर्वाद", "मझली दीदी" असे चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी ठरले...


भयप्रद फॅक्टरीवाला रामू...

एकेकाळी भयपट म्हटले, की रामसे बंधूंचं नाव समोर यायचं. तिथेच, अंडरवर्ल्ड डॉन हे विषय यायचे, तेव्हा मनमोहन देसाई यांचा उल्लेख व्हायचा. या व्याख्या बदलण्यात रामू, अर्थात रामगोपाल वर्मा यांचा फार मोठा हात होता...

रामूच्या चित्रपटात नायिकेची मध्यवर्ती भूमिका, उर्मिला मातोंडकर यांच्याकडेच असायची. उर्मिलापाठोपाठ अंतरा माळी आणि मनीषा कोयराला याही नायिका म्हणून दिसल्या. नायकांमध्ये एक नाव असं नसायचं. पण फरदीन खान, अजय देवगण आणि नाना पाटेकर ही मंडळी जास्त दिसायची. सहनायक किंवा सहकलावंतांच्या यादीत मनोज बाजपाई, सुशांत सिंह यांची जास्त वर्णी लागायची. नायक-नायिकांची नावंही बऱ्यापैकी मराठमोळी असायची...

रामूच्या चित्रपटात इतर गाण्यांखेरीज आयटम नंबर नामक गाण्याला वेगळं स्थान असायचं. काही विशेष शंब्द असलेली ही आयटम गाणी सादर करणाऱ्या नृत्यांगना मुख्यत्वे नायिकाच असायच्या. रामूच्या चित्रपटांत रोमँटिक गाण्यांना फारच कमी वाव असायचा. सॅड साँग्स क्वचितच किंवा एखादंच असायचं. गंभीर दृष्यांत मेलोड्रामा कधीच नव्हता. उलट कधी कधी खुसखुशीत संवादांमुळे गंभीर दृष्यातही विनोद निर्मिती व्हायची...

विनोदी कथानक किंवा विनोदी चित्रपट हा रामूचा प्रांत नाही. त्यांच्या चित्रपटातील दृष्यांत संवाद आणि त्यांसह आलेल्या हावभावांमधून हलकी-फुलकी विनोद निर्मिती व्हायची. रामूच्या चित्रपटांतील हाणामारीची दृष्य बऱ्यापैकी वास्तवदर्शी असायची. एक हिरो दहा गुंडांना मारतोय किंवा काचा फोडून बाहेर पडतोय असं कधीच दिसलं नाही. रामूच्या चित्रपटातलं पार्श्वसंगीतही वेगळं असायचं. विनोदी किंवा कौटुंबिक पार्श्वसंगीत येता प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत असायचं ज्यातसुद्धा गूढ निर्माण व्हायचं... 

किळसवाणे चेहेरे घेऊन, किंवा नुसतीच धडं असलेली शरीरं, अशी भुतं रामूच्या चित्रपटांत कधीच दिसली नाहीत. मुळात चित्रपटात दिसत असलेल्या भुतांमुळे भय कधीच निर्माण झालं नाही. भूताचं अस्तित्व किंवा भूत जाणवण्याआधीच, वस्तू, पडदे, यांच्या चित्रिकरणामुळे, पार्श्वसंगीतामुळे आणि धक्कातंत्राच्या वापरामुळे भायनिर्मिती व्हायची. याच शैलीतले "रात", "भूत", "कौन" हे चित्रपट चांगलेच गाजले. "डरना मना है" या चित्रपटात भयाला वेगवेगळ्या रूपात सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला. पण "डरना ज़रूरी है" मधलं मुख्य कथानक आणि रामूने स्वत: दिग्दर्शित केलेल्या कथानकाशिवाय बाकी चित्रपटात त्यांना ही किमया साधता आली नाही...

भयासोबत मुंबईची काळी बाजू, अर्थात मुंबई अंडरवर्ल्डचा जवळ जवळ खरा चेहेरा समर्थपणे दाखवण्यात रामूचा हातखंडा होता. मोठमोठाले सेट्स, डॉनचा आलिशान अड्डा, गुंडांचे गणवेश, असं काही दाखवता, कमी प्रकाश योजना, साधे कपडेपट, मुंबईतल्या चाळी, छोट्या-मोठ्या जागा किंवा फ्लॅट अशा गोष्टीचा वापर करत रामू मुंबई अंडरवर्ल्डचं छान चित्र उभं करायचे. रामूच्या चित्रपटातली नकारात्मक व्यक्तिमत्व कधीच लार्जर दॅन लाईफ दाखवली गेली नाहीत. त्यांच्या सामन्य भासणाऱ्या नकारात्मक व्यक्तिरेखा काही चित्रपटात नायकालाही मागे टाकून गेल्या. "सत्या", शिवा", "दौड़", "अब तक छप्पन", "सरकार" हे चित्रपट चांगलेच यशस्वी ठरले पण "एक हसीना थी", "कंपनी", "डी" या चित्रपटांना तितकीशी ऊंची गाठता आली नाही...

ल्या चाकोरीबाहेर जात प्रेमा कहाण्या आणि थरारपटांमध्येही रामूने हात आजमावला. पण "रंगीला", "जंगल", "गायब" अशा काही हिट चित्रपटांखेरीज,  "नाच", "मस्त", "नि:शब्द", "डार्लिंग" अशा अयशस्वी चित्रपटांची लांबच लांब रांग लागली. "राम गोपाल वर्मा की आग" या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या लुकची खूपच चर्चा होती. पण "शोले" या माईलस्टोन चित्रपटावर आधारलेल्या रामूच्या या चित्रपटाने सपाटून मार खाल्ला आणि आता काही रामू परत येत नाही असंच वाटू लागलं. त्यानंतर "सरकार राज", "फूँक", "डिपार्टमेन्ट" असे चित्रपट देत रामू त्यांच्या शैलीत परत आले आणि यशस्वी उसळी घेतली...


रहस्यमय अब्बास-मस्तान...

गूढ रहस्य, स्टाईलबाज सादरीकरण, जे नायक-नायिका तेच कधी कधी खलनायक-खलनायिका आणि जे खलनायक-खलनायिका तेच काही अंशी नायक-नायिका अशी चक्रावणारी कथानकं... या सर्वांची एकत्रित गुंफण जेव्हा दिसते तेव्हा तो चित्रपट नक्कीच अब्बास-मस्तान या दिग्दर्शक द्वयींचा suspense thriller असतो...


अब्बास
-मस्तान यांच्या चित्रपटात रहस्य थराराला जितकं महत्व असतं तितकंच महत्व विनोदालाही असतं. चित्रपटांत दिसणारे विनोद हे जवळ जवळ चित्रपटातल्या नायकाइतकेच महत्वाचे असतात. विनोदाचा बाज सांभाळणाऱ्या अनेक विनोदवीरांपैकी, जॉनी लिव्हर हे अग्रस्थानी असतात. कधी भुलक्कड़ तर कधी नारळवाला, कधी चष्मिश तर कधी गुप्तहेर अशा विविधरंगी विनोदी भूमिका निभावणाऱ्या जॉनी लिव्हर यांच्या विनोदांमधूनच कथेत नवं वळण आणणारा एखादा प्रसंग रंगायचा...

अक्षय कुमार, बॉबी देवल, अक्षय खन्ना या कलावंतांचा जास्त भरणा असलेल्या अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांत प्रमुख नायकाचं नाव नेहमी राज असायचं तर नायिका ही प्रिया किंवा सोनिया असायची. यांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ठ्य असायचं. काही चित्रपटांत, जसे की "बाज़ीगर", "हमराज़", "दरार", “ऐतराज”, प्रेक्षकांना आधीच रहस्य समजलेलं असतं पण कथानकात त्या रहस्याची उकल होत असताना ते पहायला छान वाटतं. "सोल्जर", "रेस" किंवा "बादशाह"सारख्या चित्रपटांत रहस्यांची उकल तर होते, पण त्याच रहस्यांत लपलेलं एक वेगळंच रहस्य असतं जे शेवटी समोर येतं...

कथेला लाभलेली अनपेक्षित कलाटणी आणि एकदम शेवटी शेवटी झालेली रहस्याची उकल, हे देखील अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांचं अजून एक विशेष आहे. "खिलाड़ी", "३६ चायना टाऊन", "नक़ाब" या चित्रपटांमध्ये अशी कथानकं पहायला मिळाली. या चित्रपटांमध्ये एक वेगळी गोष्ट अशी असायची की खरा गुन्हेगार समोर आल्यावर त्या व्यक्तीबद्दल प्रेक्षकांनी विचारही केलेला नसतो. कथानकाशिवाय दोन गोष्टी ज्या कथेत रंग भरायच्या त्या होत्या चित्रपटांचं संगीत आणि साहसदृष्य...

कौशल-मोसिस आणि शाम कौशल हे साहसदृष्य दिग्दर्शक असलेल्या अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांतली साहस आणि हाणामारीची दृष्य दोन वेगवेगळ्या वेगात आपल्या समोर यायची. काही दृष्य वेगवान आणि हलत्या कॅमेऱ्यासमोर असायची तर काही दृष्य संथ आणि स्लो मोशन कॅमेऱ्याद्वारे टिपली जायची.वेगवान साहस हाणामारी दृष्यांमध्ये तितकंच वेगवान पार्श्वसंगीत असायचं तर संथ दृष्यांमध्ये बहुतांश करून काहीच पार्श्वसंगीत नसायचं. फक्त फाईट्सचे, पडण्याचे, गोळीबाराचे ओरडण्याचे आवाज प्रितिध्वनीस्वरूपात (Echo...) ऐकायला मिळायचे...

अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांचं संगीतही कथांना सुयोग्य असंच असायचं. अन्नू मलिक किंवा हिमेश रेशमिया हे प्रामुख्याने अब्बास-मस्तान यांच्या चित्रपटांचं संगीत द्यायचे. एखादं sad song किंवा love duet इकडे तिकडे असेल, पण बहुतांश गाणी उडत्या चालींवरची आणि नृत्यांना पोषक अशी असायची. चित्रपचातले सर्व मुख्य कलावंत पडद्यावर दिसतील असं एकतरी गाणं सर्वच चित्रपटांत असायचंच...

थ्रिलर हॉलिवूडपटांच्या कथानकांवर बेतलेले चित्रपट देत अब्बास-मस्तान या द्वयींनी Suspense Thrillers देऊन यश मिळवलं खरं, पण त्यांच्या शैलीबाहेरचे, "चोरी चोरी चुपके चुपके", "अग्निकाल", "मशीन", "प्लेयर्स", "किस किसको प्यार करूँ" हे चित्रपट फारशी कमाल करू शकले नाहीत. अर्थात, "अजनबी"सारखा थ्रिलरपट देऊन अब्बास-मस्तान ही जोडी पुन्हा प्रगतीपथावर आली...

तोडफोड रोहित...

भारतीय चित्रपटांतल्या अशक्यप्राय action sequenceविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला दाक्षिणात्य चित्रपटांची हमखास आठवण होते. पण हिंदी चित्रपटांतही अशी दृष्य देणारे कोणी असतील तर ते आहेत रोहित शेट्टी...

पोलीस-हाणामारी-विनोद असा तिहेरी संगम रोहित शेट्टींच्या जवळ जवळ सर्वच चित्रपटांत दिसतो. चित्रपटांत विनोदाची अप्रतीम आतिषबाजी असते. रोहित शेट्टी यांच्या चित्रपटातले दोन मुख्य घटक आहेत पोलिसी व्यक्तिरेखा आणि विनोदी कथानकं. आलटून पालटून या दोघांवर भिस्त ठेवलेली दिसते. म्हणजे रोहित शेट्टी यांच्या पोलिसांवर बेतलेल्या चित्रपटांत विनोदाला फारसा वाव नसतो, तर त्यांच्या विनोदी चित्रपटांत पोलिसही विनोद करताना दिसतो...

अजय देवगण, मुकेश तिवारी, अर्शद वारसी आणि जीतू वर्मा यांची प्रामुख्याने हजेरी असणाऱ्या रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांत इतर अनेक कलावंतांची रेलचेल असते. अजय देवगण एकमेव नायक असलेल्या चित्रपटांत सबकुछ अजय देवगणच असतात. पण ज्या चित्रपटांत अजय देवगण सहनायक किंवा विशेष भूमिकेत असतात त्यांत मात्र कहानी में ट्विस्ट आणणारं एखादं दृष्य अजय देवगण यांना केंद्रस्थानी ठेऊनच समोर येतं...

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांतली गाणी आणि नायिका यांना चित्रपटांत तितकं महत्वाचं स्थान नसतं. तरी पण चित्रपटांतली काही गाणी ही मराठी चित्रपटांतल्या लोकप्रिय  गाण्यांच्या चालींवर बेतलेली असतात. रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांत एकाहून अधिक मुख्य नायक असतात, पण मुख्य नायिका मात्र एकच असते. बाकीच्या अभिनेत्री सहनायिकेच्या भूमिकांमध्ये दिसतात. शिवाय प्रमुख नायिका नेहमी बिंधास्त आणि क्लृपत्या करणारी असते...

रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांचा सर्वात भक्कम आधार म्हणजे चित्रपटांतली हाणामारीची आणि साहसदृष्य. चित्रपटांत हाणामारीची दृष्य सादर होत असताना एका वेगात पुढे सरकत असतात आणि लगेचंच, त्याच दृष्यांचा पुढचा भाग स्लो मोशनमध्ये येतो ज्यामुळे अशी दृष्य रंगतदार होतात. अशक्यप्राय साहसदृष्यही काही कमी नाहीत. एखाद्या मेरी-गो-राऊंडच्या सर्वात वरच्या थराला उभा राहणारा नायक काय, उलट्या दिशेने म्हणजे रिव्हर्समध्ये गाडी चालवून शर्यत जिंकणे काय किंवा दरीच्या तोंडावर सी-सॉ करणाऱ्या गाडीवर उभे असलेले नायक काय... सर्वच दृष्य उत्कंठावर्धक असतात... 

रोहित शेट्टीच्या चित्रपटांतली अजून एक लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे चित्रपटांतलं पार्श्वसंगीत. विनोदी असो किंवा साहसदृष्य असो, तिथे वापरलेलं पार्श्वसंगीत त्या त्या दृष्यांना वेगळीच उभारी देतं. साहस आणि हाणामारी दृष्यांच्या स्लो मोशन इफेक्टच्या वेळी एक विशेष आवाज ऐकायला मिळतो, जसे की एखादी काच पडून फुटली आहे. शिवाय चित्रपटांत वापरल्या गेलेल्या पिस्तुलांचा आणि बंदुकींचा आवाजही बऱ्याच अंशी वेगळा जाणवतो. वेगवेगळ्या गाड्यांची, रचून ठेवलेल्या भांड्यांप्रमाणे केलेली तोडफोड तर बघण्यासारखी असते...

हिंदी चित्रपटांत सीक्वेल सहसा लोकप्रिय होत नाहीत. रोहित शेट्टी यांनी या सीक्वेल्सची परिभाषाच बदलली. वेगळी कथानकं घेत तेच कलावंत आणि त्यांच्या व्यक्तिरेखांची नावं तशीच ठेवत रोहित शेट्टी यांनी दमदार चित्रपट दिले. त्यांच्या खास शैलीत तयार झालेले, "सिंघम -", "बोल बच्चन", "गोलमाल --" हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय यशस्वी झाले खरे, पण थोडेसे चाकोरीबाहेरचे असलेले, "संडे", "दिलवाले", "गोलमाल अगेन" हे चित्रपट जरासे मागे राहिले. पण वह आखिर रोहित शेट्टी है | "सिम्बा" आणि "सूर्यवंशी"सारख्या चित्रपटांमुळे ते पुन्हा मुसंडी मारून वर आले...


मनोरंजक सचिन...

महाग्रू अर्थात महागुरू ही पदवी मिळालेले कलावंत म्हणजेच अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर. अनेक मराठी-हिंदी चित्रपट व मालिकांमधून त्यांनी काम केलं. पण ते जास्त लक्षात राहतात, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या धमाल विनोदी चित्रपटांमुळे...

मराठी चित्रपटप्रेमींना निखळ मनोरंजन देणाऱ्या काही चित्रपटकारांमध्ये सचिन पिळगावकर यांचं नाव घेतलं जातं. आपल्या चित्रपटांत अनेकांना प्रथम प्रवेश अर्थात डेब्यू मिळवून देणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी सचिन पिळगावकर एक आहेत. "अश्विनी ये ना..." या गाण्याचे गायक किशोर कुमार, "गम्मत जम्मत" व "नवरी मिळे नवऱ्याला" या चित्रपटांच्या नायिका, अनुक्रमे वर्षा उजगावकर व सुप्रिया पिळगावकर, अशा डेब्यूंसाठी सचिन पिळगावकर प्रसिद्ध असायचे...

कथेसोबत संगीत व पार्श्वसंगीत या सचिन पिळगावकरांच्या चित्रपटांच्या जमेच्या बाजू असायच्या. चित्रपटांत बहुतकरून उडत्या चालींवरची गाणी अधिक असायची. चित्रपटांतल्या सर्व नायक व नायिकांवर एखादं गाणं किंवा कुठल्यातरी गाण्यातलं एखादं कडवं चित्रित व्हायचंच. गाण्यांसोबतच सचिन पिळगावकरांच्या चित्रपटांमधलं पार्श्वसंगीतही धमाल असायचं. एक विशिष्ट धून हमखास चित्रपटांत यायची. मुख्यत: चित्रपटातील पात्रांचा उडालेला गोंधळ दाखवण्यासाठी ही धून वापरली जायची...

चित्रपटांत येणारी साहसदृष्य किंवा हाणामारीची दृष्यही एक निराळीच मजा आणायची. हाणामारीच्या दृष्यांत शस्त्रांचा क्वचितच वापर असायचा आणि द्वंद्व युद्धावर अधिक भर दिला जायचा. जास्तीत जास्त दहा मिनिटं लांबीची आणि बहुतकरून चित्रपटाच्या उत्तरार्धात येणारी ही हाणामारीची किंवा साहसदृष्य विनोदाचा बाज सांभाळणारी अधिक असायची. जी गत हाणामारीच्या दृष्यांची तीच गत साहसदृष्यांची. सचिन पिळगावकरांच्या चित्रपटांतली साहसदृष्य किंवा पाठलागाची दृष्य, उत्कंठावर्धक कमी पण विनोदी पद्धतीने अधिक दाखवली जायची... 

अशोक सराफ, स्वत: सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, बिपिन वर्टी, विजू खोटे, जयराम कुलकर्णी ही कलावंत मंडळी सचिन पिळगावकरांच्या चित्रपटांत हमखास असायचीच. त्याचसोबत वर्षा उजगावकर, सुप्रिया पिळगावकर, किशोरी शहाणे-वीज, हे कलावंतही आलटून-पालटून हजेरी लावायचे. सचिन पिळगावकरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात फक्त ते आणि लक्ष्मीकांत बेर्डे कधीच दिसले नाहीत. पण फक्त अशोक मामांसोबत सहनायक म्हणून मात्र त्यांनी चित्रपट केले. चित्रपटांत स्वत: सचिन जरी मुख्य नायकांच्या फळीत असले, तरी एखादा प्लॅन करणे, शक्कल लढवणे, या गोष्टी नेहमी अशोक मामांकडे असायच्या...

 

आपल्या खास विनोदी शैलीत, "गम्मत जम्मत", "आयत्या घरात घरोबा", "भुताचा भाऊ" असे अनेक यशस्वी चित्रपट देणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी, "कुंकू", "आत्मविश्वास" असे गंभीर विषयांवरचे चित्रपटही लेकप्रिय करून दाखवले. पुन्हा आपल्या शैलीत परतत, "नवरा माझा नवसाचा", "आम्ही सातपुते", "आयडियाची कल्पना" या विनोदी चित्रपटांसह सचिन पिळगावकरांनी त्यांची दुसरी इनिंग सुरू केली. अर्थात या इनिंगने तितकंसं यश मिळवलं नाही म्हणा, पण सचिन पिळगावकर पुन्हा यशस्वी चित्रपट देऊन विनोदी चित्रपट दिग्दर्शकांचे महागुरू होतील हे नक्की...

पारंपारिक संगीतमय सूरज...

परंपरा आणि रिवाज दर्शवणाऱ्या कौटुंबिक कथा आणि जोडीला सुंदर सांगितिक नजराणा असलेले चित्रपट समोर असतील, तर एकच नाव आठवतं. ते म्हणजे, 'राजश्री प्रोडक्शन्स' या संस्थेमधून नानाविध कौटुंबिक चित्रपट देणारे सूरज बरजातिया...


अजिबात नाही किंवा कमी हाणामारी असलेले
, संथगतीने चालणारे सूरज बरजातिया यांचे चित्रपट, 'फॅमिली ड्रामा' म्हणूनच प्रसिद्ध असायचे. चित्रपटात दाखवलेली एक किंवा दोन कुटुंब आणि त्यातल्या सदस्यांचे छोटे छोटे प्रसंग दाखवत हे चित्रपट पुढे जायचे. अदाकारीसोबतच या सर्व चित्रपटांची जमेची बाजू असायची, चित्रपटांचं संगीत. राम-लक्ष्मण या संगीतकार जोडीला हाताशी धरत सूरज बरजातियांनी त्यांच्या चित्रपटांत अप्रतीम संगीत दिलं...

एकही आयटम साँग किंवा डिस्कोचं एखादं गाणं न घेताही सूरज बरजातिया यांच्या चित्रपटातलं संगीत बहारदार व्हायचं. चित्रपटांत उडत्या चालींवरची गाणी जरी असली, तरी त्यांत एक हळुवारपणा असायचा. मुख्य म्हणजे चित्रपटाल्या जवळ-जवळ सर्व कलाकारांवर कुठल्या ना कुठल्या गाण्यांतला काही भाग चित्रित व्हायचा. प्रत्येक चित्रपटात एखादं तरी गाणं असायचंच ज्यात सर्व कलाकार नाचताना आणि गाताना दिसायचे...

गाण्यांसोबतच चित्रपटातल्या कलाकारांची निवडही चोख असायची. मोहनीश बहल, हिमानी शिवपुरी, अजित वास्वानी, सतीश शाह, रीमा लागू, ही मंडळी वरचेवर असायचीच, पण सूरज बरजातियांचे दोन लकी मॅस्कॉट्स अलोक नाथ आणि सलमान खान हमखास असायचे. सलमान खान त्यांच्या इतर चित्रपटांत, उघड्या छातीने हाणामारी करताना, नाच करताना किंवा आपले सिक्स पॅक दाखवताना दिसायचे पण सूरज बरजातियांच्या चित्रपटांत सलमान खान यांची शांत स्वभावी भूमिका असायची...

सलमान खानप्रमाणेच अलोक नाथ यांनाही एकाच पठडीतली भूमिका आलटून-पालटून मिळायची. म्हणजे एखाद्या चित्रपटात ते गरीब दाखवले गेले तर पुढच्या चित्रपटात ते श्रीमंत दाखवले जात. तसंच, एखाद्या चित्रपटात ते नायक किंवा नायिकेचे वडील दाखवले गेले, तर येणाऱ्या चित्रपटात ते काका दिखवले जात. त्यांच्याबाबतीतली खात्रीलायक गोष्ट म्हणजे चित्रपटात येणारी 'मुसीबत की घड़ियाँ' नेहमी अलोक नाथ प्रमुख असलेल्या कुटुंबातच यायची...

या सर्वांखेरीज, सूरज बरजातिया यांच्या चित्रपटांत तीन गोष्टी नेहमी असायच्या. पहिली गोष्ट होती "जी" हा शब्द. संवादात "जी" हा शब्द पुढे-मागे नेहमीच यायचा. उदाहरणार्थ, "जी हमारे वह दोस्त तहाँ हैं...", "जी आप भी चलिये..." यामुळे ते संवाद छान रंगायचे. चित्रपटातली दुसरी गोष्ट म्हणजे 'प्रेम' हे नाव. चित्रपटाचा नायक सलमान खान असो किंवा नसो, पण चित्रपटातल्या एखाद्या नायकाचं किंवा सहनायकाचं नाव 'प्रेम' असायचंच...

चित्रपटातली तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात दाखवलेलं मैत्रीचं नातं. नायक आणि त्याचा मित्र असो किंवा कुटुंब प्रमुख आणि त्याचा मित्र असो, हे मैत्रीचं नातं, सलमान खान किंवा अलोक नाथ भोवती रचलं जायचं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे किंवा अनुपम खेर हे कलावंत त्या दोस्ताची भूमिका निभावताना दिसायचे. कथेला कलाटणी देणारे संवाद किंवा दृष्य त्या दोस्तावर चित्रित व्हायचे... 

सूरज बरजातिया यांच्या शैलीतले "मैंने प्यार किया", "हम आपके हैं कौन", "हम साथ साथ हैं" हे चित्रपट तुफान यश संपादन करून गेले. पण जरा वेगळे असलेले "मैं प्रेम की दिवानी हूँ" आणि "प्रेम रतन धन पायो" हे चित्रपट मात्र खास कमाल करू शकले नाहीत. नंतर, आपल्या शैलीत परत येत, "एक विवाह ऐसा भी" आणि "विवाह" हे चित्रपट देऊन सूरज बरजातिया यांनी लौकिकास साजेशी खेळी केली...

आज २२ फेब्रूवारी. सूरज बरजातिया यांचा जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांना मनापासून शुभेच्छा. "जी आपकी फिल्मों का इंतज़ार रहेगा सूरजजी..."

स्टाईलबाज संजय...

अनेक चित्रपटांत आपण पाहतो, नायकाला कपड्यांची विशिष्ट स्टाईल दिलेली असते किंवा खलनायकाची वागण्या-बोलण्याची वेगळी स्टाईल असते. पण संपूर्ण चित्रपट जेव्हा स्टाईल व ग्लॅमरने भरलेला असतो, तेव्हा तो चित्रपट हमखासच संजय गुप्ता यांचा असतो...

संजय गुप्ता यांच्या चित्रपटांचं चित्रिकरणच वेगळं असायचं. रंगांची उधळण, विविध कपडेपट किंवा उजेडच उजेड असं काही दिसायचं नाही. उलट चित्रपटाची प्रत्येक फ्रेम राखाडी किंवा पिवळ्या रंगात असायची. शिवाय चित्रिकरणही थोडं अंधारलेलं असायचं. संजय गुप्ता यांच्या चित्रपटात अभिनेते संजय दत्त हे प्रामुख्याने दिसायचे. कथानक संजय दत्तच्या भोवती विणून इतर कलावंतांना त्यात सामिल केलं जायचं...

संजय गुप्ता यांचे चित्रपट हे नेहमी मल्टीस्टारर असायचे. फक्त एक किंवा दोन नायक न दिसता, तीन ते चार नायकांचा भरणा त्यांत असायचा. नायिका किंवा महिला कलावंतांना चित्रपटात फारसा वाव नसायचा. एखाद-दोन दृष्य आणि गाणी इतकंच. संजय गुप्ता यांच्या चित्रपटातली गाणीही वेगळी असायची. म्हणजे पावसात किंवा तलावाशेजारी असलेलं द्वंद्व गीत किंवा एखाद्या पार्टीमधलं डिस्को गीत, अशी गाणी समोर नाही आली कधी. उलट कॅब्रेची गाणी आणि backgroundला वाजणारी गाणी जास्त दिसायची...

या चित्रपटांत अजून एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे अभिनेते संजय दत्त यांना दिलेल्या विविध स्टाइली... कधी विशिष्ठ प्रकारची दाढी तर कधी सोन्याचे दात, कधी एखादी खास बंदूक तर कधी हाताच्या बोटात असलेल्या अंगठ्या असायच्या. पण सर्व चित्रपटांत पाहिलं तर त्यांचे कपडेपट काळ्या रंगाचे आणि कोट-पँटवालेच असायचे. या खेरीज, संजय दत्त यांनी चित्रपटांत वापरलेले गॉगल्सही चर्चेत असायचे... 

चित्रपटांतली हाणामारीची दृष्य आणि चित्रपटांतलं पार्श्वसंगीत हे देखील तितकेच स्टाईलबाज असायचे. चार-पाच गुंडांना नायक नुसत्या हातांनी धुऊन काढतोय असं काही नसायचं. उलट द्वंद्व युद्ध जास्त दिसायची आणि ती दृष्य कलावंतांमधूनच एक-दोघांत रंगायची. इतर हाणामारीच्या दृष्यांत automatic पिस्तुली, मशीन गन किंवा लांब नळ्यांच्या पिस्तुलांचा वापर दिसायचा. गोळ्यांचे व स्फोटांचे आवाजही एका खास शैलीत असायचे.


संजय गुप्ता यांचे चित्रपट, बदले की आग, प्यार में जुदाई या मिलन किंवा पारिवारीक संघर्ष, या सर्वांपासून हटके असायचे. चित्रपटात एखादा कट किंवा शोध दाखवला जायचा आणि त्या कटाला किंवा शोधाला तडीस नेणारी कथा समोर दिसायची. Action thriller या पठडीत मोडणारे संजय गुप्ता यांचे, "काँटे", "मुसाफ़िर", "ऍसिड फॅक्टरी", "ज़िंदा", हे चित्रपट तूफन यशस्वी झाले. पण त्यांच्या शैलीबाहेरचे, "पंख", "हमेशा", "दस कहानियाँ", असे चित्रपट फारसे यश संपादन करू शकले नाहीत. तरीही मुसंडी मारत, "शूटआऊट ऍट लोखंडवाला", "जज़्बा" हे चित्रपट देत संजय गुप्ता पुन्हा लोकप्रिय झाले...

हसवता रडवता इंद्र...


पोट धरून हसवणं आणि तितक्याच तनमयतेने रडवणं या दोन्ही गोष्टी जेव्हा एकाच चित्रपटात पहायला मिळायच्या तेव्हा तो चित्रपट इंद्र कुमार यांचाच असायचा...

अतिरंजित हाणामारीची दृष्य, थरार दृष्य, हे मुद्दे इंद्र कुमार यांच्या चित्रपटांत नसायचेच. आमिर ख़ान, माधुरी दिक्षीत, अनिल कपूर, अजय देवगण, टिकू तल्सानिया, दिलीप ताहिल या कलावंतांचा जास्त समावेश असलेल्या इंद्र कुमार यांच्या चित्रपटांच्या कथा, "प्रेम" या एकाच गोष्टीवर आधारित असायच्या. प्रेमाच्या ओघातच येणारे 'टकरार-इनकार-इकरार', 'अमीरी-गरिबी', 'मिलना-बिछड़ना' या गोष्टींवर जास्त भर दिला जायचा. इंद्र कुमार यांच्या चित्रपटांचे दोन भाग असायचे. एक विनोदी आणि एक गंभीर. खरंतर अतिविनोदी आणि अतिगंभीर असं म्हटलं तरी वावगं ठरू नये...

चित्रपटांचा विनोदी कथाभाग हा साधारणत: पूर्वार्धात असायचा. पोट धरून हसायला लावणारे विनोद किंवा विनोदी प्रसंग यांचा यात भरणा असायचा. मुख्य कलावंतांसोबत कथेशी संबंधित नसलेले काही कलाकारही या विनोदी कथाभागात दिसायचे. या विनोदी कथाभागात एखादं हाणामारीचं किंवा साहस दृष्य असलं तरी ते विनोदी ढंगाने पार पडायचं. बरं, विनोद आता जास्त झाला, बस करा आता असाही प्रकार दिसला नाही कधी. उलट गंभीर दृष्य संपता संपता चित्रपटांच्या शेवटी येणारा एखादं विनोदी प्रसंगही वातावरणात हास्याची कारंजी फुलवायचा...

इंद्र कुमार यांच्या चित्रपटातला गंभीर कथाभाग हा बहुतकरून उत्तरार्धात असायचा. पूर्वार्धात थोडे-फार गंभीर प्रसंग असायचे पण जास्त भिस्त ही उत्तरार्धावर असायची. या गंभीर कथाभागाची सुरुवात व्हायची ती मुख्यत्वे अमीरी-गरीबीच्या वैमनस्यातून. त्यातून अंकूर फुटायचा नात्यांमधल्या गैरसमजाला आणि मग ही गंभीर दृष्य रंगात यायची. नायक-नायिकेचं दु:खात बुडून जाणं, मग एखादं विरह गीत. हा प्रवास असायचा इंद्र कुमार यांच्या चित्रपटांतल्या गंभीर कथाभागाचा. ते दु:खद गीत संपल्यावर हा गंभीर कथाभाग थोडा नरम व्हायचा आणि चित्रपट शेवटाकडे झुकायचा...

इंद्र कुमार यांच्या चित्रपटांत अदाकारीला जितका वाव असायचा तितकाच संगीतालाही असायचा. नोकझोकवालं उडत्या चालीवरचं गाणं, प्रेमाची कबूली देणारं आणि प्रेम स्वीकारल्यानंतरचं गाणं, दुरावा दाखवणारं विरहगीत, अशी वेगवेगळ्या रसांच्या गाण्यांचा नजराणा इंद्र कुमार यांच्या चित्रपटांत असे. त्यांच्या सर्व चित्रपटांत एक झाड दिसायचं आणि चित्रपटातल्या सर्व गाण्यांपैकी एखाद्या गाण्याचा किमान एक अंतरातरी या झाडाभोवती चित्रीत व्हायचा...

इंद्र कुमार यांच्या चित्रपटशैलीचा अजून एक नमूना म्हणजे चित्रपटांची नावं. साधारण दोन, तीन किंवा चार अक्षरी शब्दांची अशी ही चित्रपट नावं असायची. शिवाय 'मल्टीस्टारर चित्रपट' हा इंद्र कुमार यांच्या चित्रपटाचा प्रांत कधीच नव्हता. त्यांनी सुरुवात केली एक नायक व एक नायिका घेऊन. एकलकोंड्या जोडीचे, "दिल", "बेटा", "राजा" हे चित्रपट तुफान गाजले आणि इंद्र कुमार एक पायरी पुढे सरकले...

दोन मुख्य नायक-नायिकेच्या जोड्या दाखवणारा "इश्क़" यशस्वी झाला आणि इंद्र कुमार मल्टीस्टारर चित्रपटांकडे वळले. इंद्र कुमार यांनी चाकोरीबाहेर जात, काही कमरे खालचे विनोद आणि प्रसंग असलेला "मस्ती" हा यशस्वी चित्रपट दिला खरा, पण पुढे आलेले मस्तीचे सीक्वेल, "धमाल" व त्याचे सीक्वेल काही फारसा जोर धरू शकले नाहीत. अर्थात, या सर्व चित्रपटांत काही गंभीर प्रसंगांमध्ये आपला खास इंद्र कुमार टच देत त्यांनी प्रेक्षकांच्या मनातील त्यांचे स्थान टिकवून ठेवले आहे...

सही रे केदार...

कधी खळखळून हसवणारे प्रसंग तर कधी डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग, दृष्यातील पात्रांच्या हालचालींचं अफलातून टायमिंग आणि जरासे कमरेखालचे वाटतील असे पण तरीही साधे असणारे विनोद आणि इकडे-तिकडे थोडीफार हाणामारी... ही वैशिष्ठ्य होती केदार शिंदे यांच्या चित्रपटांची... 

एखादा चमत्कार आणि त्या चमत्कारामुळे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल व त्या बदलामुळे चित्रपटातल्या इतर पात्रांसोबत घडलेले विनोदी अगर गंभीर प्रसंग, या सूत्रांवरच्या केदार शिंदे यांच्या "अगंबाई अरेच्चा", "खो-खो", "श्रीमंत दामोदरपंत" या चित्रपटांनी चांगलीच धमाल उडवली होती. या चमत्कारांशिवाय, एखादी घटना आणि त्या अनुषंगाने येणारे विनोदी-गंभीर प्रसंग, हे गणित दाखवणारे, "ऑन ड्यूटी चोवीस तास", "जत्रा", "यांचा काही नेम नाही", असे चित्रपटही चांगले चालले...

भरत जाधव, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, क्रांती रेडकर हे कलावंत केदार शिंदे यांच्या चित्रपटांत जास्त दिसायचे. सिद्धार्थ जाधव यांना मिळालेल्या व्यक्तिरेखा तर अप्रतीम होत्या. "यांचा काही नेम नाही", "जत्रा", "खो-खो" या चित्रपटातल्या सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका खास करून लक्षात राहिल्या. "खो-खो" चित्रपटातली त्यांची भूमिका तर त्या चित्रपटाची जान होती. एकही शब्द न उच्चारता चेहेऱ्यावरचे हावभाव, देहबोली आणि garbage language या तीन गोष्टींचा वापर करून कथा व नायक या दोघांनाही मागे टाकत सिद्धार्थ जाधव यांची भूमिका विशेष रंगली...

केदार शिंदे यांच्या चित्रपटांतली गाणीही श्रवणीय व उडत्या चालींची जास्त असायची. एखादं प्रणयगीत जरी असलं तरी त्यात नृत्य हे असायचंच. शिवाय एक आयटम साँग चित्रपटात हमखास असायचं. त्या आयटम साँगात अंकुश चौधरी, भरत जाधव, रेशम टिपणीस किंवा क्रांती रेडकर यांपैकी कोणी ना कोणी नक्कीच दिसायचे. गाण्यांव्यतिरिक्त, केदार शिंदे यांच्या चित्रपटांतला एक महत्वाचा घटक होता कथांचा वेग. वेगवान कथानकं आणि काही दृष्यांमध्ये पात्रांच्या विशेष हालचाली या दोन्ही गोष्टी केदार शिंदे यांच्या चित्रपटांच्या यशाच्या आधारस्तंभ असायच्या...

अर्थात, थोड्या धीम्या गतीचे, "इरादा पक्का", "यंदा कर्तव्य आहे" आणि नेहमीचे कलावंत नसलेला, "रंगीला रायबा" हे चित्रपट यशस्वी होते पण केदार शिंदे यांच्या शैलीबाहेरील हे चित्रपट, त्यांच्या इतर चित्रपटांसारखे यश संपादन करू शकले नाहीत. नाटकातल्या कथेला चित्रपटात आणून त्यांना खास केदार शिंदे टच देत पडद्यावर आलेले चित्रपट मात्र चांगलेच लोकप्रिय झाले. त्याचं “सही रे सही” हे नाटकमात्र, “पुन्हा सही रे सही” या नावानिशी revive झालं. जर या नाटकाचा चित्रपट आला तर भरपूर काही करण्याचा वाव आहे. मराठीत असो किंवा हिंदीमध्ये, पण भारत जाधव यांनी साकारलेली चौरंगी भूमिका, अभिनेते परेश रावल सुंदर वठवतील...

गोंधळ्या प्रियदर्शन...

 

"गोंधळाला या रे बघ्यांनो गोंधळाला या..." हे उद्गार आपण ज्या चित्रपटांबद्दल काढू शकतो ते म्हणजे प्रियदर्शन दिग्दर्शित धम्माल चित्रपट... 

विनोदी नाही म्हणालो कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत विनोदच विनोद असं प्रियदर्शन यांच्या चित्रपटात नसायचंच. उलट काही प्रसंगांमुळे गंभीर झालेल्या वातावरणाला शांत करण्यासाठी विनोदी संवाद किंवा दृष्य असायचे. 'गोंधळ' हा प्रियदर्शन यांच्या चित्रपटातला महत्वाचा घटक असायचा. पात्रांमधला गोंधळ, नावांमधला गोंधळ, एखाद्या दृष्यात पात्रांच्या ठराविक वेळेला येण्या-जाण्याने निर्माण झालेला गोंधळ, असं सहसा गोंधळांचं स्वरूप असायचं...

पु.ल.देशपांडे यांच्या 'रावसाहेब' या व्यक्तिचित्रणात ज्या पद्धतीने रावसाहेब व त्यांच्या अड्ड्याबद्दल सांगितलं होतं, तसंच काहीसं प्रियदर्शन यांच्या चित्रपटातील पात्रांबद्दलही सांगता येईल. म्हणजे अक्षय कुमार-सुनील शेट्टी अदाकारी सादर करून जायचे, राजपाल यादव एखादी चक्कर टाकून जायचे, शक्ति कपूर-असरानी चावटपणा करून जायचे, ओम पुरी भुणभूण लावायचे पण सर्वात मोठा दंगा असायचा परेश रावल यांचा...

प्रियदर्शन यांच्या चित्रपटात परेश रावल यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या. त्या भूमिकांसाठी परेश रावल यांनी केलेल्या वेगवेगळ्या रंगभूषा व वेशभूषा, संवाद म्हणताना त्यांनी वापरलेला विशिष्ठ लेहेजा खासकरून लक्षात राहिला. त्यांनी साकारलेल्या सगळ्याच पात्रांची नावं लक्षात राहतीलच असं नाही पण 'बाबूराव गणपतराव आपटे' हे पात्र परेश रावल यांनी चित्रपट इतिहासात अजरामर केलं असं मला वाटतं. परेश रावल यांना दिलेले संवाद आणि देहबोली, प्रियदर्शन यांच्या चित्रपटांची जान असायचे. परेश रावल हे प्रियदर्शन यांच्या चित्रपटांचा हुकमी एक्काच होते खरंतर...

श्टोऱ्या म्हणाल तर एकसूरी श्टोऱ्या कधीच नसायच्या. एखादं कथानक घेऊन त्यात गाणी, अदाकारी, हे रंग भरून मग गोंधळ निर्माण करणारे प्रसंग देऊन चित्रपट तयार व्हायचा. प्रियदर्शन यांच्या चित्रपटात श्रीमंतीचा जास्त बडेजाव जसा नव्हता तसाच गरीबीतली दैनाही जास्त नसायची. चित्रपटांत, कुठेही येणारी पळापळीची, पाठलागांची, हाणामारीची दृष्य ही प्रियदर्शन यांच्या चित्रपटातली सर्वात धमाल दृष्य असायची. दहा-बारा मिनिटांची ही दृष्य सुरू असताना एक खास धुन ऐकू यायची. ही धावती धुन आणि ती दृष्य एकत्र आल्यावर चित्रपटांचा नूरच पालटला जायचा...

गोंधळ आणि विनोद हे एकत्रित combination वापरून, "हेरा फेरी", "हंगामा", "मालामाल वीकली", "यह तेरा घर यह मेरा घर", "हलचल", असे अनेक यशस्वी चित्रपट जिथे प्रियदर्शन यांनी दिले, तिथेच त्यांच्या शैलीबाहेरच्या, "सात रंग के सपने", "खट्टा मीठा", "आक्रोश", "डोली सजाके रखना" हे चित्रपट तेवढे तग धरू शकले नाहीत. पण पुन्हा उसळी मारत, "भूल भुलैया", "भागम् भाग", "चुप चुपके" असे चित्रपट देत प्रियदर्शन यांनी प्रक्षकांचं मन जिंकलं...

मल्टीस्टारर म्यूझिकल राजीव...


नजिकच्या काळातले मल्टीस्टारर हाणामारीपट ज्यांनी दिले, ते होते त्रिमूर्ती फिल्म्सचे राजीव राय. दोन किंवा तीन नायक आणि तेवढ्याच नायिका घेऊन एक विषय हाताळायचा यात त्यांचा हातखंडा होता...

श्टोरी साधीसरळ असायची. म्हणजे कोणे एकेकाळातला नामचीन गुंड किंवा डाकू पुढे जाऊन समाजातला एक प्रतिष्ठीत व्यक्ती बनायचा. त्या व्हिलनने चित्रपटातल्या नायक किंवा नायिकांचं नुकसान केलेलं असायचं. बदला घेण्यासाठी हे नायक-नायिका एकत्र येऊन त्या प्रतिष्ठीत व्यक्तीचा म्हणजे व्हिलनचा खात्मा करायचे. चित्रपटात एक मुख्य व्हिलन असायचा आणि त्याच्या सोबतीला इतर व्हिलन्सची फौज असायची. या व्हिलनचा एक खास अड्डा असायचा जो चित्रपटाच्या शेवटी नेस्तोनाबूत व्हायचा...

राजीव राय यांच्या चित्रपटातल्या व्हिलन्सची नावं एकदम खतरनाक वगैरे असायची. म्हणजे गामा मातीन, भुजंग, अजगर जुर्राट अशी नावं धारण केलेले व्हिलन हे नायकांच्या तोडीस तोड असायचे. व्हिलनच्या फौजेत दोन जणं तर असायचेच. एक म्हणजे सफेदपोश मंत्री तर दुसरा असे भ्रष्ट पोलीसवाला. यांना हाताशी धरून वेगवेगळ्या खेळी खेळून नायक-नायिकांना अडकवण्याचा प्रयत्न असायचा. अमरीश पुरी, रज़ा मुराद, तेज सप्रू, नसिरुद्दीन शाह, सोनम, राजेश विवेक, शरद सक्सेना, हे कलाकार राजीव राय यांच्या चित्रपटात जास्त दिसायचे...

नायक मंडळींपैकी कोणीतरी एक पोलीसात असायचा तर एखादा गुन्हेगार असायचा. नायिकांपैकी एखादी, व्हिलनची किंवा मंत्र्याची नातेवाईक, बहुतकरून मुलगीच असायची. राजीव राय यांच्या हरएक चित्रपटात नायकांच्या द्वंद्वाचं एक हाणामारी दृष्य असायचंच असायचं आणि या द्वंद्वातला एक नायक हा नेहमी पोलीस असायचा. त्या द्वंद्वानंतरच नायकांना त्यांची खरी ओळख पटायची आणि मग सगळे एकत्र यायचे...

राजीव राय यांच्या चित्रपटांमधली अजून एक जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचं संगीत आणि पार्श्वसंगीत. चित्रपटात, कधी धिम्या तर कधी उडत्या चालीची अशी सुंदर श्रवणीय गाणी असायची. आधीच्या काळात कल्याणजी-आनंदजी ही संगीतकार जोडी असायची पण कालांतराने ती जागा विजू शाह यांनी घेतली. चित्रपटातल्या सर्व नायक-नायिकांमध्ये गाणी समान विभागली जायची. या गाण्यांमध्ये एक खासियत असायची. एक गाणं असं असायचं ज्यात जास्तीत जास्त नायक-नायिका व्हिलनच्या अड्ड्यावर एकत्र व्हायचे आणि हे गाणं त्यांच्यावर चित्रित व्हयचं...

गाण्यांप्रमाणेच चित्रपटाचं पार्श्वसंगीतही दमदार असायचं. नायक-नायिकांच्या गंभीर संवादांच्या वेळी एक धुन आणि व्हिलनच्या एंट्रीच्या वेळी दुसरी धुन वाजायची. एक खास धुन किंवा आवाज असायचा जो संपूर्ण चित्रपटभर जाणवत रहायचा. हा आवाज नेहमी व्हिलनशी संबंधीतच असायचा. हाच फॉर्म्यूला वापरून, "युद्ध", "त्रिदेव", "विश्वात्मा", "मोहरा" असे जबरदस्त चित्रपट राजीव राय यांनी दिले. त्यांच्या शैलीबाहेरील "प्यार इश्क़ और मोहब्बत" हा प्रेम त्रिकोण दर्शवणारा चित्रपट आणि स्लो मिस्ट्री म्हणजे रहस्यपट उलगडणारा "असंभव" या चित्रपटांनी सपाटून मार खाल्ला...

"गुप्त" चित्रपटाच्या वेळीही 'रोमँटिक थ्रिलर' या प्रकाराचा प्रयोग राजीव राय यांनी केला होता. पण त्यात इतर मालमसाला तसाच असल्याने चित्रपट भन्नाट यशस्वी झाला...


मसालेदार मनमोहन...

सबकुछ असलेले कुठले चित्रपट असतील तर ते होते मसाला चित्रपट. काही पदार्थांचे पुंजके एकत्र करून जसा मसाला नामक एक प्रकार तयार होतो, तसेच, हाणामारी, प्रेम, मेलोड्रामा, रहस्य, भय अशा अनेक प्रकारांचे तुकडे एकत्र गुंफून उदयास येतो सुप्परहिट मसाला चित्रपट...

मनमोहन देसाई यांचा अशा प्रकारात हातखंडा असायचा. "अमर अक़बर अँथनी", "नसीब", "कूली", "परवरीश"  "देशप्रेमी", "सुहाग", "धरमवीर" असे एकसे एक यशस्वी चित्रपट मनमोहन देसाईंच्या हातून तयार झाले. अमिताभ बच्चन, निरुपा रॉय, परवीन बाबी, नीतू सिंह, शबाना आज़मी, कादर ख़ान, अमजद ख़ान, जीवन, रणजीत ही मंडळी बहुत करून या मसाला चित्रपटांमध्ये असायची...

या मसाला चित्रपटात वेगवेगळी छोटी छोटी कथानकं जोडून एक श्टोरी तयार व्हायची. या मुख्य कथेत दोन गोष्टी फिक्स असायच्या. पहिली म्हणजे एक पीडित किंवा सोशिक आई आणि दुसरी असायची मिलने-बिछड़ने की दास्तान. दोन भाऊ, दोन बहिणी, भाऊ-बहिण, बाप-मुलं, आई-मुलं, नवरा-बायको अशा या दास्तानी एकतर चित्रपटभर तरी असायच्या किंवा मुख्य कथेशी जोडलेलं उपकथानक तरी असायच्या...

या चित्रपटांतली गाणी तर सुंदरच होती त्यात वादच नाही, पण या गाण्यात एक वैशिष्ठ्य असायचं. चित्रपटांत द्वंद्वगीते असायची, विरहगीते असायची, व्हिलनच्या अड्ड्यावरची नृत्यगीते असायची. पण एक गाणं हमखास असायचं ज्यात सर्व मुख्य कलावंत एकत्र येऊन गात व नाचत असत. लांबीला जरा जास्त असलेली ही गाणी त्या त्या चित्रपटांची जानच होती असं म्हणायला हरकत नाही...

या चित्रपटांतली हाणामारीचा दृष्यही छान रंगायची. कलाकार कितीही असो, एक द्वंद्व असायचंच. मग ते दोन नायकांचं असू देत किंवा नायक आणि एखाद्या गुंडाचं असू देत, पण ३-४ मिनिटांची ही दृष्य चित्रपटांत असायचीच. चित्रपटातलं फायनल हाणामारी एखाद्या ठरलेल्या ठिकाणी असायची. व्हिलनचा अड्डा म्हणावा अशी एखादी जुनाट इमारत, पडका वाडा, दगड-धोंड्यांनी भरलेली एखादी निर्मनुष्य जागा असायची जिथे चित्रपटातली बहुतांश मंडळी जमून अंतिम हाणामारी रंगात यायची...

छोट्या कथांना एकत्र गुंफून तयार झालेली एक कथा आणि अशा कथा वेगवेगळ्या पद्धतीने वापरून साकार झालेले अनेक मल्टीस्टारर मसाला चित्रपट देऊन मनमोहन देसाई यांनी आपला चाहतावर्ग तर वाढवत नेलाच शिवाय प्रचंड लोकप्रियताही मिळवली. या लोकप्रियतेला छेद दिला मनमोहन देसाई यांनी दिलेल्या "तूफान", "अनमोल" सारख्या त्यांच्या शैलीबाहेरील चित्रपटांनी. हे काही अपवाद वगळले तर मसाला सुपरहिट चित्रपटांसाठी आजही मनमोहन देसाई यांचं नाव घेतलं जातं...

डॅम इट महेश...

भय, हाणामारी, रहस्य आणि जोडीला विनोद, अशी चौघांची उत्तम सांगड घालून मसालेदार चित्रपट मराठीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे चित्रपटकार म्हणजे महेश कोठारे...

महेश कोठारेंच्या चित्रपटांमध्ये एक सरळसोट श्टोरी लाईन असायची. म्हणजे एक व्हिलनचा जाच आणि त्याचा नायनाट करणारे नायक. या श्टोऱ्यांमध्ये मग थोडफार वैविध्य असायचं. कधी व्हिलन दरोडेखोर असायचा तर कधी मंत्री असायचा, कधी एखादा अपराधी असायचा तर कधी चक्क भूत असायचा. बरं व्हिलन क्रूर व गंभीर न दाखवता विनोदीपद्धतीने समोर यायचे. सगळ्या व्हिलन्सचा अड्डा उघड्यावर असला तरीही तो पोलीसांना सापडणार नाही अशा ठिकाणी असायचा. फायटिंगच्या वेळी मशीनगन किंवा बॉम्बचा वापर क्वचितच व्हायचा आणि पिस्तूल व हातापायाची हाणामारी जास्त दिसायची...

स्वत: महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी-सराफ, दिपक शिर्के, बिपीन वर्टी, अंबर कोठारे, विजय चव्हाण या मंडळींचा जास्त वापर चित्रपटात दिसत असे. चित्रपटाचा नायक बहुतकरून लक्ष्मीकांत बेर्डेच आणि महेश कोठारे सहनायकाच्या भूमिकेत, असं दाखवण्याचा प्रयत्न असायचा. पण प्रत्यक्ष चित्रपटात उलटं चित्र दिसायचं. म्हणजे चित्रपटांची मुख्य नायिका आणि जवळ जवळ सर्व हाणामारीची व साहस दृष्य महेश कोठारेंकडे असायची तर आचरटपणा, वेंधळेपणा, घाबरट स्वभाव आणि यामुळे निर्माण होणारे विनोद लक्ष्मीकांत बेर्डेंच्या वाट्याला यायचे...

चित्रपटात नायकांची नाव ठरलेली असायची. म्हणजे महेश कोठारेच्या व्यक्तिरेखेचं नाव महेश तर लक्ष्मीकांत बेर्डेंच्या व्यक्तिरेखेचं नाव असायचं लक्ष्या. सर्व व्हिलन्सची नावं मात्र एकदम वेगळी आणि मजेशीर असायची. महेश कोठारेंच्या चित्रपटांतले संवाद सर्वसाधारणच होते पण, "डॅम इट" हे शब्द अगदी न चुकता सर्वच चित्रपटांमध्ये यायचे. चित्रपटातल्या गाण्यांची खासियत अशी, की कथा कोणतीही असो पण देव-देवतांची भक्ती दर्शवणारं एक गाणं चित्रपटात हमखास असायचं ज्यात सगळे नायक-नायिका सामील व्हायचे. शिवाय एखादंतरी अंताक्षरी टाईप गाणं असायचं जे लक्ष्मीकांत बेर्डें व त्यांच्या नायिकेवर चित्रीत व्हायचं... 

"धुमधडाका", "दे दणादण", "थरथराट", "धडाकेबाज", "झपाटलेला", असे पाच अक्षरी मसाला सुपरहिट चित्रपट देणाऱ्या महेश कोठारेंनी जेव्हा "जिवलगा", "चिमणी-पाखरं", "शुभमंगल सावधान" असे त्यांच्या चाकोरीबाहेरील गंभीर चित्रपट दिले, तेव्हा ते प्रक्षकांच्या पसंतीस फारसे उतरले नाहीत. पण नंतर, "खतरनाक", "पछाडलेला", "खबरदार", "जबरदस्त" हे चित्रपट देत महेश कोठारेंनी पुव्हा त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी साकारली...

विनोद्या डेविड...

अचाट गाणी आणि क्षणोक्षणी येणारी विनोदी दृष्य, ही खासियत असायची डेविड धवन यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांची. प्रत्येक दृष्यागणिक येणारे विनोद आणि संवादांमधला आचरटपणा, हे धमाल कॉम्बिनेशन प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं... 

कथा कुठलीही असो, म्हणजे इश्टेटीच्या वादाची कथा, प्रेम त्रिकोण, दोन मित्रांची कथा, पण मांडणी मात्र विनोदी असायची. डेविड साहेबांच्या चित्रपटांत गोविंदा, संजय दत्त, करीश्मा कपूर, सलमान ख़ान, कादर ख़ान, शक्ति कपूर यांची वर्णी जास्त लागायची. एखाद-दुसरं गंभीर दृष्य वगळलं तर पूर्ण कथानक विनोदी शैलीने दाखवणारे "जुड़वा", "जोड़ी नं. १", "आँख़ें", "कूली नं. १", "दिवाना मस्ताना", "मुझसे शादी करोगी" असे अनेक चित्रपट डेविड साहेबांच्या लिश्टीत आहेत...

या चित्रपटांत साधारण दोन नायक-नायिका असायचे खरेपण एका नायकाला किंवा नायिकेला जास्त फुटेज दिलं जायचं. सर्व मुख्य दृष्य आणि बहुतांश गाणी या एका नायकाच्या किंवा नायिकेच्या वाट्याला असायची आणि एखादं गाणं व एखादं-दुसरं महत्वाचं दृष्य, दुसऱ्या नायक किंवा नायिकेला मिळायचं. अभिनेते कादर ख़ान यांना अशा चित्रपटांत नेहमी विनोदी भूमिकाच असायची. ते नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका जास्त वठवायचे. एकसूरी भूमिका असल्या तरी प्रत्येक वेळी त्यांना दिलेला पेहेराव किंवा बोलण्याचा लेहेजा वेगळा असायचा. पण त्यांच्या भूमिकेचा बाज मात्र विनोदीच रहायचा...

या चित्रपटांतली गाणी काही औरच असायची. रोमँटिक प्रणय गीत किंवा शांत मधुर गाणं असं नसायचं. उलट नायक-नायिकेवर चित्रीत होणारं द्वंद्वगीतही उडत्या चालीवरचं आणि नृत्याला पोषक असायचं. चित्रपटातल्या सर्व गाण्यांमध्ये एखादं गाणं असायचं जे थोडंसं अश्लील वाटावं. पण ते तेवढ्यापुरतंच, गाणं संपताच पुन्हा एखादा विनोदी प्रसंग आपली वाट पाहत असायचा. गरीब-श्रीमंतीमधला भेदभाव, बाप-बेटे की टक्कर असे गंभीर विषय फारसे या चित्रपटांच्या वाट्याला यायचे नाहीत. आलेच तरी फारफार तर एखाद्या दृष्यासाठी...

या चित्रपटांत हाणामारी जास्त नसायची. "आँख़ें", "लोफर" असे गिनेचुने चित्रपट सोडले, तर बहुतेक चित्रपटात हाणामारीची दोन किंवा जास्तीत जास्त तीन दृष्य असायची. तीही खेचून खेचून पाच-दहा मिनिटांची. बरं, त्या हाणामारी दृष्यांमध्येसुद्धा अधून-मधून विनोदी प्रसंग यायचेच यायचे. डेविड धवन यांच्या चित्रपटांत येणाऱ्या हाणामारीच्या किंवा साहस दृष्यात एक ठराविक आवाज असायचा. एखादा कलाकार हाणामारी करताना खाली पडलेला दाखवताना हमखास हा आवाज यायचा...

गंभीर, रहस्य, प्रेमकहाणी अशी कुठलीही कथा असो, पण विनोदी ढंगातल्या आपल्या खास शैलीत ती कथा सादर करत डेविड धवन यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. ‘डबल रोल हा प्रकार तर हमखासच वापरला जायचा. एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती किंवा त्यांचा आभास निर्माण करून विनोदी प्रसंगात भर पडायची. डेविड धवन यांच्या शैलीबाहेरील, "आग का गोला", "गोला-बारूद", "आँधियाँ", "स्वर्ग" हे काही चित्रपट तितकेसे यशस्वी झाले नाहीत, पण हे अपवाद सोडले तर विनोदी चित्रपट देण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकला नाही...

@ अनिकेत परशुराम आपटे.